IPL 2020: हैदराबादने गुणांचं खातं उघडलं; दिल्लीवर 15 धावांनी विजय

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

खेळपट्टीचा अंदाज घेत केलेली सावध बॅटिंग आणि अचूक टप्प्यावरची बॉलिंग या सूत्राच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्लीला नमवत गुणांचं खातं उघडलं.

हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना 162 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीला 147 रन्सचीच मजल मारता आली.

हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो जोडीने 77 रन्सची सलामी दिली. अमित मिश्राने वॉर्नरची खेळी संपुष्टात आणली. मनीष पांडे केवळ तीन रन्स करून आऊट झाला. मात्र यानंतर बेअरस्टोला केन विल्यमसनची साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 रन्सची भागीदारी केली.

आततायीपणे धोकादायक फटके खेळण्याचा मोह या दोघांनी टाळला. रबाडाने बेअरस्टोला आऊट करत ही जोडी फोडली. विल्यमसनने चौकार आणि एकेरी-दुहेरीची सांगड घालत बॉलमध्ये 41 रन्सची खेळी केली. आयपीएल पदार्पण करणाऱ्या अब्दुल समदने 7 बॉलमध्ये 12 धावा केल्या. दिल्लीकडून कागिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉला झटपट गमावले. भुवनेश्वर कुमारने त्याला आऊट केलं. रशीद खानच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा श्रेयस अय्यरचा प्रयत्न अब्दुल समदच्या हातात जाऊन विसावला. शिखर धवन-ऋषभ पंत जोडीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. रशीद खाननेच शिखर धवनला चकवलं. त्याने 34 रन्स केल्या.

भुवनेश्वरने शिमोरन हेटमायरला आऊट करत दिल्लीच्या डावाला ब्रेक लावला. रनरेटचं दडपण वाढत असताना ऋषभला रशीद खानने आऊट केलं. त्याने 32 रन्स केल्या. मार्कस स्टॉनिस नटराजनच्या यॉर्करवर एलबीडब्ल्यू झाला. दिल्लीच्या एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही.

हैदराबादसाठी रशीदने तीन तर भुवनेश्वर कुमारने दोन विकेट घेतल्या. अभिषेक शर्माने सलग चार ओव्हर टाकताना शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना मोकळेपणे बॅटिंग करू दिली नाही. नटराजनने यॉर्कर कसे टाकावेत याचा वस्तुपाठ सादर केला. रशीदला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हैदराबादने तिसऱ्या मॅचमध्ये भरवशाच्या केन विल्यमसनला खेळवलं. 41 रन्सची खेळी करत कठीण खेळपट्टीवर कसं खेळावं याचा आदर्श संघसहकाऱ्यांसमोर ठेवला. मोहम्मद नबीच्या जागी केनला घेण्यात आलं. वृद्धिमान साहाऐवजी अब्दुल समदला संधी देण्यात आली.

आक्रमक फटकेबाजी आणि लेगब्रेक बॉलिंगसाठी प्रसिद्ध अब्दुल जम्मू काश्मीरचा आहे. आयपीएल स्पर्धेत खेळणारा अब्दुल हा जम्मू काश्मीरचा चौथा खेळाडू आहे. याआधी परवेझ रसूल, मन्झूर दर, रसीख सलाम हे आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)