You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: सुपर ओव्हरच्या थरारात बेंगळुरूची मुंबईवर मात
सुपर ओव्हरच्या थरारात बेंगळुरूने मुंबईवर मात करत सनसनाटी विजयाची नोंद केली.
बेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 201 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इशान किशन आणि कायरेन पोलार्ड यांनी धुवांधार बॅटिंग करत मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या बॉलवर 5 रन्स हव्या असताना पोलार्डने चौकार लगावला आणि मॅच टाय झाली.
मुंबईने सुपर ओव्हरमध्ये 7 रन्स केल्या. नवदीप सैनीने ही ओव्हर टाकली. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स जोडीने हे आव्हान पेललं.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना झटपट गमावलं. पाठोपाठ हार्दिक पंड्याही तंबूत परतला. 4 बाद 78 अशा स्थितीतून इशान किशन आणि कायरेन पोलार्ड यांनी पाचव्या विकेटसाठी 51 बॉलमध्ये 119 धावांची अविश्सनीय भागीदारी केली.
इशानने 58 बॉलमध्ये 99 धावांची खेळी करत मुंबईला जिंकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याने 2 चौकार आणि 9 षटकार लगावले. कायरेन पोलार्डने 24 बॉलमध्ये 60 रन्स करत त्याला पुरेपूर साथ दिली. त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले.
दरम्यान पहिल्या इनिंग्जमध्ये एबी डीव्हिलियर्सचं वादळी अर्धशतक आणि त्याला शिवम दुबेने दिलेली साथ यांच्या बळावर बेंगळुरूने दोनशे धावांचा डोंगर उभारला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय बेंगळुरूच्या पथ्यावर पडला. आरोन फिंच आणि देवदत्त पड्डीकल जोडीने 81 धावांची सलामी दिली. फिंचने 35 बॉलमध्ये 52 रन्सची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
कर्णधार विराट कोहलीला या मॅचमध्येही सूर गवसला नाही तो आणि राहुल चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने 3 रन्स केल्या.
डीव्हिलियर्स-पड्डीकल जोडीने 62 रन्सची भागीदारी केली. देवदत्तने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 रन्सची खेळी केली.
देवदत्त आऊट झाल्यानंतर एबीने फटक्यांची पोतडी उघडत मुंबईच्या बॉलर्सना निष्प्रभ केलं. एबीने 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 55 रन्सची खेळी केली.
शिवम दुबेने 10 बॉलमध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 27 धावांची खेळी करत एबीला चांगली साथ दिली. या जोडीने 17 बॉलमध्ये 47 रन्सची भागीदारी करत बेंगळुरूला दोनशेचा टप्पा गाठून दिला.
बेंगळुरूने शेवटच्या चार ओव्हर्समध्ये 65 रन्सची लयलूट केली.
मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्या चार ओव्हर्समध्ये 42 धावा कुटल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)