'फेक न्यूजमुळे स्थलांतर' या केंद्रीय मंत्र्यांच्या बोलण्यावर काय म्हणतात कामगार?

कोरोना, स्थलांतर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय 15 सप्टेंबर रोजी लोकसभेत म्हणाले होते की, लॉकडाऊननंतर फेक न्यूजला ऊत आला आणि या फेकन्यूजमुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे हजारो मजूर आपल्या घराकडे पायी रवाना झाले.

लॉकडाउननंतर हजारो स्थलांतरित मजूर पायीच आपापल्या घरी रवाना झाले होते. यामागचं कारण काय? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार माला रॉय यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना नित्यानंद राय यांनी हे वक्तव्य केलं.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, "लॉकडाऊनच्या कालावधीसंबंधी ज्या फेक न्यूज पसरल्या त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या संख्येने प्रवासी मजुरांचं पलायन सुरू झालं. शिवाय लोकांना विशेषतः प्रवासी मजुरांना अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होतील की नाही, याची काळजी लागून होती.

मात्र, अपरिहार्य लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र सरकार सजग होतं आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावलंही उचलली होती."

फेक न्यूज, स्थलांतर

फोटो स्रोत, NURPHOTO / CONTRIBUTOR

फोटो कॅप्शन, घरी परतणारे कामगार

केंद्र सरकारतर्फे संसदेत हे वक्तव्य करण्यात आल्यानंतर बीबीसीने स्थलांतरित मजुरांशी बातचीत केली.

स्थलांतरित मजुरांचं काय म्हणणं आहे?

भारतात लॉकडाऊनच्या काही दिवस आधीपासूनच मजुरांचं स्थलांतर सुरू झालं होतं. पुढे अनेक महिने हे स्थलांतर सुरू होतं.

लॉकडाऊनपूर्वी रस्त्यांवर अगदी दोन-चार मजूर आपलं सामान आणि मुलबाळं घेऊन जाताना दिसायचे. मात्र, लॉकडाऊननंतर महामार्ग असो की आतले रस्ते, इतकंच नाही तर रेल्वे ट्रॅकवरूनसुद्धा हजारो मजूर पायीच आपापल्या राज्यात परतत असताना दिसले.

जून आणि जुलै महिना उलटल्यानतंरही अनेक लोक ट्रक किंवा अशाच इतर मोठ्या वाहनांमध्ये अमानवीय पद्धतीने प्रवास करत असल्याचं दिसत होतं.

बीबीसीच्या प्रतिनिधींनी यापैकी अनेक मजुरांसोबत पायी चालत त्यांच्या व्यथा वाचकांपर्यंत पोहोचवल्या होत्या.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या वक्तव्यानंतर यापैकीच काही मजुरांनी आपण शहर सोडून आपल्या गावी का परतलो, त्यामागचं कारण काय, हे पुन्हा एकदा सांगितलं.

फेक न्यूज, स्थलांतर

फोटो स्रोत, NURPHOTO / CONTRIBUTOR

फोटो कॅप्शन, स्थलांतरित बालक

पूजा सांगतात, "माझ्या खोलीत खायला काहीच शिल्लक नव्हतं. तीन दिवस आम्ही साखरेचं पाणी करून प्यायलो. डाळ-तांदुळ काहीच नव्हतं. माझं गॅस सिलेंडरही संपलं होतं. मग आम्ही 100 नंबरवर कॉल केला. त्यांनी जो हेल्पलाईन नंबर सुरू केला होता त्यावर कॉल केला. ते म्हणाले की आम्ही जेवण घेऊन येतोय.

नवऱ्यासोबत दिल्लीत राहणाऱ्या पूजा कुमारी यांनी लॉकडाऊनच्या काळात जे काही सोसलं ते विसरणं त्यांना कधीच शक्य होणार नाही. लॉकडाऊनपूर्वी त्यांचे पती दिल्लीतच काम करायचे.

आम्ही ठिक आहे म्हटलं. त्यानंतर धान्य तर मिळालं नाहीच. पण सात नंबर गल्लीत तयार करण्यात आलेलं जेवण घेऊन आले होते. आम्ही जेवायला जात असताना पोलिसांनी माझ्या नवऱ्याला काठी मारून पाडलं.

"म्हणजे जेवायलाही जाऊ दिलं नाही. कसेतरी तीन दिवस काढले. त्यानंतर परिस्थिती इतकी वाईट झाली होती की काय सांगायचं. मग घरी परत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात आधार कार्ड आणि पत्ता वगैरे दिला. मात्र, मोबाईलवर कुठलाच कॉल किंवा मेसेज आला नाही. मेसेज येत नव्हता.

जेवायला खोलीत काहीच नव्हतं. घरमालकही भाडं मागत होता. मग ठरवलं की काही झालं नाही तर पायीच घरी जाऊ. बरंच लांब पायी चाललो. नोएडाहून मोदीनगरला पोहोचलो. तिथे प्रशासनाने आम्हाला रोखलं. लाठीमार केला आणि आम्हाला ज्या शहरांमधून आलो तिथे परत जायला सांगितलं.

"आम्ही त्यांना म्हणालो की खोलीत का परत जायचं? घरमालक भाडं मागतोय. काय करायचं आम्ही?"

त्यानंतर पूजा कुमारी आणि त्यांचे पती त्यावेळी सुरू करण्यात आलेल्या स्पेशल ट्रेनने अनेक अडचणी पार करत झारखंडच्या आपल्या घरी परतले.

अशीच काहीही कहाणी विमला देवी यांचीही आहे. त्यांनी नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. गरोदर असतानाच त्या दिल्लीहून पायीच आपल्या गावी जायला निघाल्या होत्या.

फेक न्यूज, स्थलांतर

फोटो स्रोत, NURPHOTO / CONTRIBUTOR

फोटो कॅप्शन, स्थलांतरितांची व्यथा

त्या सांगतात, "आम्ही तिथून (दिल्ली) तेव्हा निघालो जेव्हा आमच्याजवळ कुठलंच काम नव्हतं. खाण्या-पिण्याच्या अडचणी येत होत्या. भाड्याची खोली होती. खर्च निघत नव्हता. ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या होत नव्हत्या. शिवाय, बाळंतपणही होणार होतं. सर्वच खूप अवघड होऊन बसलं होतं.

घरी परतण्यासाठी कुठलंच साधनही दिसत नव्हतं. त्यामुळे मग पायीच निघालो. रस्त्यात एका ट्रक चालकाने मदत केली. त्यामुळे घरी पोहचू शकलो."

मात्र, पायीच घरी चालत निघालेले काही मजूर प्रसारमाध्यमं आणि यंत्रणेवर नाराज आहेत.

पायी चालताना मृत्यू ओढावलेले रणवीर सिंह यांच्यासोबत दिल्लीहून पायी निघालेले मनोज सिंह या विषयावर काहीही बोलायला तयार नााहीत.

स्थलांतराचे चटके अनुभवलेले सिट्टू कुमार लॉकडाऊनच्या काही दिवस आधीच कामाच्या शोधात बिहारहून दिल्लीला गेले होते.

दिल्लीत त्यांना काम मिळालंसुद्धा. मात्र, काम सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले होते आणि लॉकडाऊन सुरू झाला.

फेक न्यूज, स्थलांतर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

सिट्टू कुमार सांगतात, "तिथे काम बंद होतं. माझ्याकडे खाण्या-पिण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. शेवटी आम्ही पायीच निघालो. मी पहिल्यांदाच गेलो होतो. थोडं काम करून दोन पैसे गाठीशी पडतील, असं वाटलं होतं.

दोनच दिवस काम केलं आणि लॉकडाऊन सुरू झाला. आता काय सांगायचं… दिल्लीहून ट्रेनने बिहारला पोहोचलं. पोटात अन्नाचा एक कण नव्हता."

या कहाण्या काही मोजक्या प्रवाशी मजुरांच्या आहेत जे हातातलं काम सुटल्यामुळे आणि अन्न-पाणीही नसल्याने आपापल्या गावी परतले होते. मात्र, असेही काही मजूर आहेत ज्यांना पायी गावी परतून गावातही काम मिळालं नाही. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा दिल्ली-मुंबई सारख्या महानगरांची वाट धरली.

पुन्हा दिल्लीत परतलेले सलमान सांगतात, "मी आधी बवानाला रहायचो. तिथून मी पायी गाजीयाबादला गेलो. तिथूनही कुठलीच गाडी मिळाली नाही.मग तिथून आम्ही नोएडा एक्सप्रेसवेला गेलो. तिथे प्रसार माध्यमाच्या काही लोकांनी आम्हाला मदत केली.

आम्ही निघालो त्यावेळी आमच्याजवळ खाण्या-पिण्यासाठी काहीच नव्हतं. लोकही मदत करू शकत नव्हते आणि म्हणूनच मी पायी गावी निघालो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)