कोरोना व्हायरस: भारतासमोरच्या अडचणी आपल्याला वाटतात त्यापेक्षा मोठ्या का असू शकतात?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीचा नववा महिना लवकरच सुरू होईल. भारतातली कोव्हिडची एकूण रुग्णसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे. अमेरिकेपाठोपाठ भारतात जगातील सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 83 हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत.

कोरोनाच्या संसर्गाच्या भारतातल्या केसेस झपाट्याने वाढत असल्याचं एका सरकारी शास्त्रज्ञानं मला सांगितलं. फक्त मृत्यूदर काहीसा दिलासादायक आहे. सध्याचा भारतातला 16.3% मृत्यूदर हा जगभरातल्या कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर अनेक देशांपेक्षा कमी आहे.

टेस्टिंगचं प्रमाण वाढल्यानेही काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली आहे. पण ज्या वेगाने हा विषाणू पसरतोय, त्यामुळे जाणकार चिंतेत आहेत.

भारतामध्ये हा विषाणू आल्याच्या 170 दिवसांनी देशाने 10 लाखांची रुग्णसंख्या गाठली. पण 40 ते 50 लाख रुग्णसंख्येचा आकडा भारताने फक्त गेल्या 11 दिवसांत ओलांडला. एप्रिलमध्ये देशात दररोज सरासरी 62 रुग्ण आढळत होते. सप्टेंबरमध्ये ही संख्या 87,000 पेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी भारतात 90,000 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले तर रोज 1,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले. देशातल्या 7 राज्यांमध्ये संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. या राज्यांतली लोकसंख्या देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 48% आहे.

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतोय तर दुसरीकडे ऑफिसेस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रेस्टॉरंट्स, जिम या गोष्टी पुन्हा सुरू केल्या जात आहेत. अर्थव्यवस्थेतमध्ये सध्या झालेली घसरण ही गेल्या काही दशकांतली सर्वात मोठी घसरण आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी कामकाज पुन्हा सुरू करण्यात येतंय.

जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन भारतात लावण्यात आला. या काळात लोक घरात होते, उद्योग बंद होते आणि असंघटित क्षेत्रातल्या कोट्यवधी कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पायी चालत वा बस आणि ट्रेननी प्रवास करत गावी परतावं लागलं.

पण एकीकडे संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णसंख्या वाढत असताना अर्थव्यवस्थेचं कामकाज सुरू करणं हे लॉकडाऊनचा बसलेला फटका दर्शवणारं असल्याचं नोमुरा इंडिया बिझनेस रिडम्पशन इंडेक्स म्हणतो.

संसर्गग्रस्तांचा आकडा असू शकतो बराच अधिक

आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त भारतीयांची कोरोनासाठीची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि दररोज देशभरात 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. पण तरीही जगाच्या तुलनेत चाचण्यांचं हे प्रमाण कमी आहे. Epidemiologist म्हणजे जागतिक साथीच्या आजारांच्या तज्ज्ञांच्या मते भारताल्या संसर्गग्रस्तांची संख्या प्रत्यक्षात बरीच जास्त असण्याची शक्यता आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

सरकारने केलेल्या अँटीबॉडी टेस्टवर आधारित पाहण्यांनुसार मेच्या सुरुवातीला 64 लाख संसर्गग्रस्त देशात होते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण याकाळात नोंदवण्यात आलेली रुग्णसंख्या मात्र 52,000 आहे.

मिशिगन विद्यापीठातले बायोस्टॅस्टिस्टिक्स आणि एपिडेमओलॉजी (Epidemiology) च्या प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी या जागतिक साथीचा अभ्यास केलाय. त्यांच्या मॉडेल्सवरील आकडेवारीनुसार भारतात सध्याच्या घडीला 10 कोटी संसर्गग्रस्त आहेत.

त्या सांगतात, "मला वाटतं भारत हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जातोय. मास्क वापरणं किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं यासारख्या गोष्टींकडे लोक गांभीर्याने घेतायत का याविषयी मला शंका आहे. कदाचित हे सवयीमुळे असू शकतं, किंवा या आजाराचं पुरेसं गांभीर्य माहित नसल्याने, वैताग आल्याने, किंवा यातलं काहीच न पटल्याने असं होण्याची शक्यता आहे. रोजचे हजार मृत्यू हे नॉर्मल वा सवयीचे झाल्यासारखं वाटतंय."

भारतातलं कोव्हिडच्या चाचण्यांचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

लोकसंख्येतल्या बहुसंख्य जणांना एखाद्या विषाणूची लागण होऊन गेली की त्यांच्यामध्ये त्यासाठीची रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि परिणामी या विषाणूचा प्रसार मंदावतो, याला हर्ड इम्युनिटी म्हणतात.

जोपर्यंत संसर्ग झपाट्याने पसरतोय, तोपर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार नाही. हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणेवरचा वाढीव ताण कायम राहील.

दिल्लीतल्या पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनाथ सांगतात, "संसर्गाला जिथून सुरुवात झाली त्या उगमापासून आता संसर्गाचीही लाट बाहेरच्या दिशेने सरकतेय आणि ती इतक्यात ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीत."

संसर्गाचं प्रमाण का वाढतंय?

"लोकांचं घराबाहेर पडण्याचं वाढणारं प्रमाण, सोशन डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क वापरातली टाळाटाळ, स्वच्छता यासगळ्या बाबींमुळे व्हायरस पुन्हा डोकं वर काढेल," डॉ. मुखर्जी सांगतात.

एकत्र कुटुंबात राहणारे जेष्ठ नागरिक गंभीररित्या आजारी पडून हॉस्पिटलमध्ये येण्याचं प्रमाण वाढल्याचं मला राजस्थानातल्या जोधपूरमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितलं.

डॉक्टर्स गेले काही महिने अथक काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

तर भारतामध्ये या जागतिक साथीची प्रचंड मोठी लाट येणार असल्याचा इशारा डॉ. टी. जेकब जॉन या साथीच्या विकारतज्ज्ञांनी मार्च महिन्यातच दिला होता. देशामधली आरोग्य यंत्रणा खिळखिळी असताना रुग्णसंख्येत वाढ होणं अटळ असल्याचं ते आता सांगतात. पण तरीही इतकी मोठी रुग्णसंख्या टाळणं शक्य झालं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. चुकीच्या वेळी करण्यात आलेल्या लॉकडाऊनला ते याचा दोष देतात.

देशभरात लॉकडाऊन लावण्यापेक्षा ज्या शहरांमध्ये संसर्गाला सुरुवात झाली आहे, तिथे लॉकडाऊन लावून तो चांगल्या प्रकारे हाताळणं जास्त फायद्याचं ठरलं असतं असं बहुतेक जाणकारांचं मत आहे.

कोरोना
लाईन

जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बासू सांगतात, "लॉकडाऊन अपयशी ठरला, कारण लॉकडाऊनमुळे जे होणं अपेक्षित नाही, नेमकं तेच घडलं. देशभरात लाखोंच्या संख्येने लोक घरी पोहचण्यासाठी पायी चालत निघाले. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आणि विषाणू संसर्ग पसरतच राहिला."

पण या लॉकडाऊनमुळे काही आयुष्यं वाचल्याचंही डॉ. रेड्डींसारखे तज्ज्ञ म्हणतात.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

"लॉकडाऊन लावण्यात आला तो काळ योग्य होता की नाही, हे ठरवणं कठीण आहे. कारण यूकेमध्ये लॉकडाऊन लवकर लावला असता तर अनेकांचा जीव वाचला असता असं म्हणत लॉकडाऊन उशिरा लावल्याबद्दल टीका होतेय."

लॉकडाऊन किती परिणामकारक ठरला याची चर्चा एकीकडे होत असतानाच या काळात व्हायरसबद्दलची माहिती लोकांना मिळाली आणि उपचारांसाठीच्या पद्धती आणि मार्चपर्यंत अस्तित्त्वात नसलेली यंत्रणा उभारण्यासाठी यामुळे अवधी मिळाल्याचं तज्ज्ञ सांगतात.

देशात आता कोव्हिडवर उपचार करणारी 15 हजारांपेक्षा जास्त केंद्र आहेत आणि 10 लाखांपेक्षा जास्त आयसोलेशन बेड्स आहेत.

मास्क, संरक्षक उपकरणं वा व्हेंटिलेटर्सचा मार्चमध्ये तुटवडा होता, पण आता अशी परिस्थिती नाही. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात काहीसा अडथळा निर्माण झालेला आहे.

"कोव्हिड 19वर उपचार करणारी केंद्र आणि आरोग्य यंत्रणेला मजबूत करणं यामुळे देशातला मृत्यूदर कमी राखायला मदत झाली आहे," डॉ. मुखर्जी सांगतात.

पण सतत काम करण्याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर येऊ लागलाय. डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी गेले काही महिने अथक काम केलंय.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

"हे आव्हान आहे आणि आम्ही थकलेलो आहोत," डॉ. रवी दोशी सांगतात. इंदौरमधल्या त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. मार्चपासून आपण दररोज 20 तासांपेक्षा अधिक काम करत असल्याचं ते सांगतात.

शहरांमधला हा संसर्ग आता गावांमध्येही पोहोचला आहे.

आता भारताने दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करणं गरजेचं असल्याचं डॉ. भ्रमर मुखर्जी सांगतात. भारतात रुग्णांचं प्रमाण जरी वाढत असलं तरी मृत्यूदर हा आशा देणारा असल्याचं त्या म्हणतात. कोव्हिड 19झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत या रोगामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या कमी आहे.

"जरी मृत्यूदर 0.1% असला, आणि भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 50% जणांना जरी हा संसर्ग झाला तरी त्याचा अर्थ 6,70,000 जणांचा बळी जाईल. आणि हा फक्त आकडा नाही. यातल्या प्रत्येक मृत्यूला कोणाच्यातरी जिवलगाचा चेहरा असेल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)