भारत-चीन सीमा वाद: तणावकाळात दोन देशांत संवाद सुरू ठेवणारी 'हॉटलाइन' काय असते?

फोटो स्रोत, Getty Images
भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली.
जून महिन्यात गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे. गेल्या चार दशकांत प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला. 45 वर्षांत दोन्ही देशांमध्ये इतके तणावपूर्ण संबंध कधीच नव्हते.
राजकीय पातळीवरील बोलणी अयशस्वी ठरल्याने मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, यातून मार्ग निघाला नाही तर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना मध्यस्थी करावी लागेल. पण कित्येक महिन्यांपासून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये संवाद नाही.
सीमेवरील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन अनेकदा दोन्ही देशांमधला संवाद बंद असतो. पण एक माध्यम असे आहे जिथला संवाद कधीच बंद होत नाही. तिथे कायम बोलणे सुरू असते. ते म्हणजे 'हॉटलाईन'
हॉटलाईन म्हणजे काय?
तणावाच्या काळात दोन्ही देशांमध्ये हॉटलाईनवर चर्चा झाली अशी हेडलाईन अनेकदा आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो. याचा अर्थ शांततापूर्ण वातावरणात हॉटलाईनवरील संवाद बंद असतो असे नाही.
हॉटलाईन हे दोन देशांच्या सैनिकांसाठी थेट संवादाचे एक माध्यम आहे. सामान्य भाषेत आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते. दोन्ही देशांच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांमध्ये संवादाचे हे साधन आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील हॉटलाईनची संपूर्ण यंत्रणा मिलिटरी ऑपरेशन्सच्या महासंचालकांच्या अखत्यारित म्हणजेच डीजीएमओ यांच्या अंतर्गत काम करते. हॉटलाईनवर संदेश पाठवण्याची विशिष्ट यंत्रणा आहे.
निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी भारताचे डीजीएमओ म्हणून काम केले आहे. बीबीसीशी बोलताना त्यांनी हॉटलाईन कशा प्रकारे काम करतात हे सविस्तर सांगितले.
सध्या भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच ठिकाणी हॉटलाईन कार्यरत आहेत.
- पूर्व लडाख सीमेजवळील दौलत बेग ओल्डी आणि स्पांगूर येथे हॉटलाईन आहे.
- सिक्कीम सीमेवर नथुलाजवळ आहे.
- अरुणाचल प्रदेशातील बुमला पास आणि तिबेटजवळ
हॉटलाईनचा वापर कसा करतात?
हॉटलाईन ही एक फोन लाईन आहे जी दोन देशांतील सैनिकांना सीमेवर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मदत करते.
हॉटलाईनवर अधिकाऱ्यांची नियमीत ड्युटी लागते. हॉटलाईनवर फोन खणखणताच तो फोन सीमेच्या पलीकडून आला आहे हे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना समजते. मेसेज घेणाऱ्याला संदेश पाठवला जातो आणि दुस-या बाजूचे सैनिक हॉटलाईवरुनच त्या संदेशाला प्रतिसाद देतात.
भारतात नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या लष्करी पथकाच्या कमांडरला हॉटलाईनवर संदेश पाठवण्याची अधिकृत जबाबदारी देण्यात आली आहे.
हॉटलाईनवर कोणत्या प्रकारचे संदेश पाठवता येतात याचे एक उदाहरण नुकतेच अरुणाचल प्रदेश सीमेवरुन समोर आले. यानंतर माध्यमांमध्ये हॉटलाईनची चर्चा सुरू झाली.
गेल्या रविवारी (6 सप्टेंबर) अरुणाचल प्रदेश सीमेवरून पाच भारतीयांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला. एका पत्रकाराने ट्विटरवर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, भारतीय सेनेने हॉटलाईनवर संदेश पाठवला आहे. त्याच्या उत्तराची वाट पाहत आहोत.

फोटो स्रोत, KIRN RIJIJU
पाच भारतीयांना शोधून चिनी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले. कधीकधी सीमेवर पाळीव प्राणी बेपत्ता असले तरी अशा प्रकार संदेश पाठवून शोध घेण्यात येतो.
अशा प्रकरणांमध्ये हॉटलाईनची महत्त्वाची भूमिका असते. दोन्ही देशांच्या सीमेवर फार उंच भिंती नसल्यामुळे अनेकदा प्राणी आणि कधीकधी लोक चुकून सीमा ओलांडतात.
अशा वेळी सीमेच्या दुस-या बाजूला असलेल्या हॉटलाईनवर संपर्क साधून असे विषय सोडवले जातात.
लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांच्या मते, शांततेच्या काळात ही हॉटलाईन सेवा अधिक महत्त्वाची असते. सीमा व्यवस्थापनासाठी हॉटलाईनवर समन्वय साधणे सोपे जाते.

फोटो स्रोत, BBC/MAXAR
डिसएंगेजमेंट म्हणजे काय?
सीमेवर ध्वज बैठक निश्चित करणे हे या हॉटलाईनचे दुसरे महत्त्वाचे काम. परस्पर वाद मिटवण्यासाठी दोन देशांमध्ये वेळोवेळी ध्वज बैठका घेतल्या होतात. बैठक केव्हा, कुठे आणि किती काळ होणार हेदेखील अनेकदा हॉटलाईनवर ठरवले जाते.
काही वेळेला सीमेवर बर्फवृष्टी होत असते. येण्या-जाण्यासाठी गैरसोय होते. अशा वेळी अधिकारी व्यस्त असताना ध्वज बैठ रद्द करण्याचा आणि ती पुढे ढकलण्याचा निरोपही हॉटलाईनवर दिला जातो.
ध्वज बैठकीसाठी ठरलेली जागा सीमेच्या दोन्ही बाजूला आहे.

फोटो स्रोत, ANI
पण या हॉटलाईनवर डिसएंगेजमेंट आणि डिएस्कलेशनवरही चर्चा होऊ शकते का ? यावर बोलताना लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया सांगतात की, या दोन्ही विषयांवर चर्चा ही समोरासमोर बसून केली जाते. हॉटलाईनवर केवळ त्यासाठीची बैठक ठरवली जाते.
सीमेवरील डिसएंगेजमेंट याचा अर्थ समजावून सांगताना ते म्हणतात की, सीमेवरील फ्लॅश पॉइंटवर सेना एकमेकांसमोर असताना त्या जागेवरुन सैन्य मागे हटवण्याला डिसएंगेजमेंट म्हटले जाते.
दोन्ही देशांचे सैनिक परस्पर नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी गस्त घालतात आणि जर कोणतेही सैन्य दुस-याच्या सीमेत शिरले तर त्यांना आधीच सतर्क केले जाते. काही वेळा सैनिक चूक मान्य करत माघार घेतात. पण काही वेळेला सैन्य माघार घेत नाहीत आणि परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते.
डिएस्कलेशनचा अर्थ काय ?
मे महिन्यापासून पूर्व लडाख सीमेवर सध्या जशी परिस्थिती आहे तसा तणाव काही वेळेला अधिक काळ राहतो. अशा वेळी ध्वज बैठकीच्या माध्यमातून डिसएंगेजमेंट म्हणजेच प्लॅश पॉईंटवर सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा होते. ही बैठक हॉटलाईनवरच ठरवली जाते.
डिएस्कलेशन म्हणजे सैन्य कमी करणे. नियंत्रण रेषेवर तणाव असताना आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही बाजूला सैन्य वाढवले जाते.
जेव्हा दोन्ही देश डिसएंगेजमेंटसाठी तयार होतात. म्हणजेच सीमेवरील फ्लॅश पॉईंटवरुन सैन्य मागे घेण्याचे मान्य करतात तेव्हा डिएस्कलेशन केले जाते.

फोटो स्रोत, YAWAR NAZIR/GETTY IMAGE
लेफ्टनंट जनरल विनोद भाटिच्यानुसार ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
सीमेवर जेव्हा डिसएंगेजमेंट आणि डिएस्कलेशन होते त्यानंतर शेवटची प्रक्रिया ही डिइंडक्शनची असते.
डिइंडक्शन म्हणजे सैन्याला आपापल्या बेस कॅम्पमध्ये परतायचे आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























