You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारतात मे महिन्यातच 64 लाख जणांना लागण - ICMR #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कोरोना व्हायरस : भारतात मे महिन्यातच 64 लाख जणांना लागण - ICMR
देशात लॉकडाऊन लागू असलेल्या मे महिन्यात 64 लाख नागरिकांना म्हणजेच देशातील बिगरअल्पवयीन 0.73 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पहिल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणाच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
हे सर्वेक्षण 11 मे ते 4 जून या काळात करण्यात आले. त्या अंतर्गत 21 राज्यांतील 28 हजार जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. एकूण 64 लाख 68 हजार 388 नागरिक कोरोनाबाधित झाले होते.
हे सर्वेक्षण ग्रामीण भागांमध्ये अधिक केले गेल्यामुळे या भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. बाधितांचं प्रमाण ग्रामीण भागांमध्ये 69.4 टक्के, शहरी झोपडपट्टय़ांमध्ये 15.9 टक्के, शहरी उर्वरित भागांत 14.6 टक्के असे होते.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
वयोमानाप्रमाणे 18 ते 45 वयोगटात संसर्गाचे प्रमाण 43.3 टक्के, 46-60 वर्षे वयोगटात 39.5 टक्के, तर 60 वर्षांवरील वयोगटात 17.2 टक्के होते.
2. JEE परीक्षेचा निकाल जाहीर
JEE मेन- 2020 या परीक्षेचा निकार जाहीर करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
वृत्तसंथ्या PTIच्या बातमीनुसार, या परीक्षेत 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यांतील 8 विद्यार्थी तेलंगणातील आहेत.
विद्यार्थी आपला निकाल jeemain.nta.ac.in वर पाहू शकतात.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टॉपर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी म्हटलं, "मी जेईई परीक्षेत सहभागी झालेल्या आणि टॉप केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. तसंच 4 दिवसांत परीक्षेचा निकाल लावलेल्या यंत्रणेचंही स्वागत करतो."
जवळपास 8.58 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशातल्या 660 केंद्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
3. ग्लोबल इकॉनॉमिक्स फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 100 मधून बाहेर
ग्लोबल इकॉनॉमिक्स फ्रीडम इंडेक्स 2020मध्ये भआरत 26 स्थानांनी घसरुन 105व्या स्थानी पोहोचला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
याचा अर्थ भारतातील आर्थिक व्यापार आणि व्यावसायिक वातावरण गेल्या वर्षीपेक्षा वाईट स्थितीत गेलं आहे.
2019च्या रिपोर्टनुसार भारत 79व्या स्थानी होता. यंदा मात्र 105व्या स्थानी पोहोचला आहे.
जागतिक स्तरावरील व्यापार स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवसाय नियमन यांसारख्या कसोट्य़ांवर देशाची स्थिती चांगली नसल्यामुळे रँकिंग घसरली आहे.
4. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश हा पर्याय - शरद पवार
सरकारी नोकऱ्या तसंच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी (9 सप्टेंबर) तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असं मत व्यक्त केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
त्यांनी म्हटलं आहे, "मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश काढणे हा मार्ग असू शकतो. कायदेशीर सल्लागारांनी हे संमत केले तर कोणी आंदोलन करण्याची भूमिका घेईल, असे मला वाटत नाही. मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.''
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा!, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले यांनी ट्वीट केलं की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.
पुण्यात गरज पडल्यास पुन्हा जनता कर्फ्यू - अजित पवार
पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली होती.
राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे गरज भासल्यास पुण्यात जनता कर्फ्यू लागू करणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जनता कर्फ्यू लावणार असाल तर नागरिक, व्यापारी यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असंही ते म्हणाले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)