जालना : बैलपोळ्याच्या वादातून जमावाकडून मारहाण, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

    • Author, अमेय पाठक
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

28 वर्षांच्या रामेश्वर बोरुडे यांचं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त झालं. त्यांना जमावानं केलेल्या हल्ल्यात आपल्या सख्ख्या तरुण भावांना गमवावं लागलं आहे.

ही घटना आहे जालना शहरालगत असलेल्या पानशेंद्रा शिवारातील. इथं जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे, तर तिसरा भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या खळबळजनक घटनेमुळे पानशेंद्रा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

पानशेंद्रा येथील बोरुडे बंधूंसोबत पोळ्याला गावातील काही लोकांसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी बोरुडे बंधूंचं गावकऱ्यांसोबत याच वादातून भांडण झालं. पाहतापाहता या भांडणाचं पर्यवसान हाणामारीत झालं. जमावानं लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडनं केलेल्या बेदम मारहाणीत राहुल बोरुडे (25 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप बोरुडे (23वर्षे ) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या मारहाणीत तिसरा भाऊ रामेश्वर बोरुडे (वय-28) हा देखील गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यानंतर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

न्यायालयानं याप्रकरणी 11 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

रामेश्वर बोरुडे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना म्हटलं, "मी, माझी आई, पत्नी, मुलगी आणि दोन भावांसह पानशेंद्रा शिवारातील वस्तीत राहतो. मिळालेल्या गायरान जमिनीवर आम्ही उदरनिर्वाह करतो. 18 ऑगस्ट म्हणजेच पोळ्याच्या दिवशी आम्ही आमचे बैल आमच्या घरासमोर सजवले. या बैलांना निळा रंग लावला. यानंतर शेजारीच राहत असलेल्या वाघ, पवार आणि गायकवाड कुटुंबीयांचेही बैल समोरून आले. या लगबगीत वाघ कुटुंबातील भगवान वाघ यांना प्रदीप बोरुडेच्या बैलाचा धक्का लागला आणि ते खड्ड्यात पडले आणि वादाला सुरुवात झाली."

यानंतर याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या आणि स्थानिक पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांवर कलम 324 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली. यानंतर शमलेला हा वाद चार सप्टेंबर रोजी जीवघेणा ठरला.

याविषयी रामेश्वर पुढे सांगतात, "असं काही होईल याची कधीही कल्पना नव्हती. शेजारी राहत असलेल्या वाघ यांनी गुरुवारी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी भंडारा घातला. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळच्या सुमारास याच मंडळींनी आमच्या कुटुंबावर हल्ला केला. यात प्रदीप आणि राहुल यांना घराजवळच्या मोकळ्या जागेत लाठ्याकाठ्यांनी मारण्यात आलं, तर मी हल्ल्यानंतर दोन तास बेशुद्ध होतो.

"आई शेजारच्या घरात पळाल्यानं त्यांचा जीव वाचला. मी आणि माझी मुलगी घरात लपून बसल्यानं आमचाही जीव वाचला," असं रामेश्वर यांच्या पत्नी वर्षा बोरुडे यांनी सांगितलं.

"या प्रकरणाचा तपास सुरू असून एवढ्या गंभीर घटनेमागं नेमकं काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्यापपर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने या सर्वांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे," असं जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय लोहकरे यांनी सांगितलं.

स्थानिक दलित कार्यकर्ते विजय लहाने सांगतात की, "या संपूर्ण घटनेनंतर दलित संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून, योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिला आहे. बोरुडे यांच्यावर जमावानं केलेल्या हल्ल्यानंतर स्थानिक दलित समाज हा सुरक्षित नसल्याची भावना झाली आहे.या हल्ल्यामागे कुठला जातीयवादी कट असण्याची देखील शक्यता आहे."

दरम्यान, या वादाबद्दल आम्ही वाघ कुटुंबीयांशीही बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)