लक्ष्मण झुल्यावर नग्न व्हीडिओ शूट करणाऱ्या महिलेला अटक

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

उत्तराखंड राज्यातील हृषिकेश इथल्या प्रसिद्ध लक्ष्मण झुल्यावर नग्नावस्थेत व्हीडिओ काढल्याप्रकरणी फ्रेंच महिलेला अटक करण्यात आली आहे.

हा व्हीडिओ त्या महिलेने सोशल मीडियावर पोस्टही केला होता.

इंटरनेट नियमानुसार या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषी आढळल्यास तिला तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असं एएफपी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

दरम्यान या महिलेला जामिनावर सोडण्यात आलं असून, हा व्हीडिओ ज्वेलरी उद्योगाच्या प्रमोशनसाठी तयार केल्याचं या महिलेनं सांगितलं.

फ्रान्समधील या गोष्टी आक्षेपार्ह मानल्या जात नाहीत. हृषिकेश हे पवित्र ठिकाण आहे. लक्ष्मण झुला या ठिकाणी हिंदू देव राम, त्यांचे बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता यांनी गंगा नदी पार केली होती. त्यामुळे लक्ष्मण झुला हे पवित्र ठिकाण आहे असं पोलीस स्थानकाचे प्रमुख आर.के.साकलानी यांनी स्पष्ट केलं.

या महिलेची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिसांना या व्हीडिओबाबत कळताच त्यांनी गुरुवारी या महिलेला अटक केली.

चौकशीदरम्यान आपणच नग्नावस्थेत हा व्हीडिओ केल्याचं त्या महिलेनं मान्य केलं. मात्र भारतात असं करण्याला परवानगी नसल्याचं माहिती नाही असंही तिने सांगितलं. बेड-नेकलेस ज्वेलरी उद्योगाच्या प्रमोशनसाठी हा व्हीडिओ आणि फोटोशूट करण्यात आलं असं तपास अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

पुढील काही महिने याप्रकरणाची चौकशी सुरू राहील.

गंगा नदीवरील लक्ष्मण झुला हे पवित्र स्थान मानलं जातं. देशातून तसेच विदेशातून हजारो पर्यटक याठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)