अनंत चतुर्दशी: पुणे गणपती विसर्जन मिरवणुकीवर आली होती दोन संकटं

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES/GETTY
- Author, मंदार लवाटे
- Role, इतिहास अभ्यासक, पुणे
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आज ( 1 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन आहे. यंदा कोरोनामुळे नेहमीप्रमाणे जल्लोषात विसर्जन मिरवणुका होणार नाहीत. इतिहासात असे दोन प्रसंग आहेत जेव्हा पुण्याच्या ऐतिहासिक मिरवणुकीवर संकटं आली होती.
महाराष्ट्रात गेले अडीचशे ते तीनशे वर्षे गणपती उत्सव साजरा होत आहे. अगदी छोट्या खेड्यातही गौरी-गणपती बसवत असल्याच्या व मिरवणुकीने विसर्जन करत असल्याच्या विश्वसनीय नोंदी आहेत.
बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे शनिवार वाड्यात मोठ्या थाटाने हा उत्सव साजरा करू लागले. त्याचे अनुकरण सरदार व इतर श्रीमंत मोठ्या लोकांनीही केले. पुढे इंग्रजी राज्य सुरू झाले. सरदारांकडे व सामान्य लोकांकडे उत्सव सुरूच होता.
दुसरे बाजीराव ब्रह्मावर्त अर्थात बिठूर येथे गेले. तेथे ही ते मोठ्या थाटामाटाने उत्सव साजरा करीत.
1893 साली पुण्यात सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करण्यात आला. केसरी अर्थात लोकमान्य टिळकांनी यास पाठिंबा दिल्याने दुसऱ्याच वर्षी सार्वजनिकरीत्या 100 ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला. यात स्वतः टिळकांनीही गणपती बसवला.

फोटो स्रोत, PIB
सार्वजनिक असो वा घरातला कितीही संकटे आली तरी गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राहिली आहे. घरात एखादी व्यक्ती ऐन उत्सवाच्या तोंडावर गेली तरी गणपती बसविला जातो व सुतक असल्याने पुरोहित अथवा इतर कोणाकडून पूजा केली गेल्याची उदाहरणेही ऐकवयास मिळतात.
पुण्यातील जगविख्यात गणेशोत्सवावर 1897 साली आलेली प्लेगची भीषण साथ, त्यानंतर पहिले महायुद्ध व त्यामुळे खडतर झालेले आयुष्य, 1997 सालची फ्ल्यूची साथ अशी संकटे आली परंतु उत्सवात खंड पडला नाही. तो उतरोत्तर वाढतच राहिला.
आजच्या पार्श्वभूमीवर, अशीच एके वर्षी कठीण काळ आला होता त्याची आठवण होते. ते वर्ष होते 1942.
तसे पुण्याचे वातावरण नेहमी शांत असते. परंतु त्या वर्षी कायदेभंग चळवळीमुळे ते कमालीचे अस्थिर झाले होते. परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. सभा, मिरवणुका, झेंडावंदन, जाळपोळ, तोडफोड आदी मिळेल त्या मार्गाने ब्रिटींशांविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत होता.
शक्य त्या गोष्टींवर बंदी आणून ब्रिटीश ही चळवळ दडपण्याचे प्रयत्न करत होते. चळवळीत भाग घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत होती. या चळवळीत महिला व महविद्यालयीन युवती ही मागे नव्हत्या.

फोटो स्रोत, ANAND PENDHARKAR
जोगेश्वरीसमोर झेंडा लावला म्हणून दोन महिलांना प्रदीर्घ कारावासाची शिक्षा देण्यात आली. तरीही महिलांचा सहभाग कमी झाला नाही. विरोधाचे वातावरणात इतके तुफान होते की समाज बेभान झाला होता.
13 ऑगस्ट 1942 ला एका समूहाने मंडईची पोलीस चौकी जाळली व त्यामागील तोफ लक्ष्मी रस्त्यावर आणून टाकली. यानंतर ही चौक्या जाळणे तोडफोड करणे हे सत्र सुरू राहिले. अल्पावधीत रस्त्यावरचे 800 दिवे फोडण्यात आले.
यामुळे ब्रिटिशांनी सभा, मिरवणुकांवर बंदी या लहानसहान उपायांवर न थांबता पुण्यात सात दिवसांकरिता सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सातपर्यंत संचारबंदी जाहीर केल. पुढे ही संचारबंदी चौदा दिवसापर्यंत वाढविण्यात आली. हे आंदोलन दडपून टाकण्यास पुण्यात 10 चिलखती रणगाडे आणण्यात आले. आप्पा बळवंत चौक, विश्रामबाग वाडा, आनंदाश्रम, जोगेश्वरी, सेवासदन, कॉंग्रेस हाउस, स. प. महाविद्यालय या ठिकाणी या गाड्यांवर बसविलेल्या माशिगनमधून जमावावर गोळीबार ही करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनानंतर वातावरण काहीसे निवळले व गणेशोत्सव आला त्या काळात मेळे, कीर्तन, शारीरिक कसरती, गायन वादन हे गणेशोत्सवाचे प्रमुख भाग होते. मेळ्यांमध्ये निरनिराळी गाणी समूहाने म्हटली जात असत. ही गाणी आधी मंजुरीसाठी पाठवावी, तसेच सर्व कार्यक्रमांची आगाऊ परवानगी घ्यावी, असा हुकुम ब्रिटिशांनी काढला. नंतर ऐन उत्सवाच्या काळात सर्व कार्यकर्मांवर बंदी घातली.
या सर्वांवर कळस म्हणजे 23 सप्टेंबर रोजी असणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली. प्रत्येक गणपती मंडळाने पोलीस सांगतील त्या वाटेने व पोलीस सांगतील तेवढीच माणसे घेऊन विसर्जन करावे असे सांगण्यात आले.
गणेशोत्सव सुरू झाला त्या 1893 सालापासून अशी समस्या कधीच उद्भवली नव्हती. यावर विचार करण्यासाठी त्या काळात सर्व मंडळांची 'गणेश मंडळ' म्हणून शिखर संस्था होती तिची बैठक बोलविण्यात आली. गणपती उत्तरपूजा करून अक्षता टाकून तेथेच ठेवावा व परवानगी मिळेल तेव्हा एकत्रित मिरवणुकीने जावे असे या बैठकीत ठरविण्यात आले.
ज्यांना गणपतीची मूर्ती ठेवण्यास जागा नाही त्यांनी केसरी वाड्यात मूर्ती ठेवावी असे आवाहन करण्यात आले. या आवाहनानुसार 250 पैकी 248 मंडळांनी मूर्ती तशाच ठेवल्या व दोन मंडळांनी सांगितलेल्या मार्गानुसार विसर्जन केले.

30 सप्टेंबर 1942 रोजी गणेश मंडळाची पुन्हा बैठक भरून अश्विन शुद्ध चतुर्दशी, 23 ऑक्टोबरला मिरवणुकीस परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. पुढचे तीन आठवडे सर्व जण वाट पहात होते व गणपतीही तसेच ठेवले होते. परंतु 23 ऑक्टोबरलाही परवानगी देता येणार नाही गणपती स्वतंत्रच पोचवावे असे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने सांगितले.
खूप काळ वाट बघूनही परवानगी न मिळाल्याने शि. वि. केळकर यांनी रास्ता पेठ गणपतीचे परवानगी न घेता विसर्जन केले. या प्रसंगी धर्मवीर विश्वासराव डावरे यांनी भाषण केले. या 'अपराधा'बद्दल या दोघानाही स्थानबद्ध करण्यात आले. पुढे 19 डिसेंबरपर्यंत हे दोघेही अटकेतच होते.
यानंतर दहा दिवसांनी अचानक मिरवणुकीस परवानगी देण्यात आली व सर्व मंडळांचा एकत्रित परवाना गणेश मंडळाचे रामभाऊ दंडवते यांच्याकडे देण्यात आला. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता टिळक चौक येथून मिरवणुकीस सुरुवात झाली.
90 गणपती मंडळं या मिरवणुकीत सहभागी झाली. मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त नव्हता. या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण दशमीला विसर्जनाची मिरवणूक निर्विघ्न पार पडली.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

3 नोव्हेंबरला अचानक परवानगी मिळाल्याने बाहेरगावचं लोक या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. विसर्जन एवढे काळ लांबल्याचे हे पुण्यातील एकमेव उदाहरण.
1965 साली गणेशोत्सवात असेच तंग वातावरण होते. युद्ध आणि मोठी दंगल असे दुहेरी संकट उत्सवावर आले. उत्सव सुरू होताच या गोष्टी आल्या आणि उत्सव संपताच नाहीशा झाल्या. या वर्षी गणपती 30 ऑगस्टला होते.

दुसऱ्या दिवशीच पुण्यात जातीय दंगल उसळली. याची तीव्रता जास्त असल्याने पुण्यात ऐन उत्सवात कर्फ्यू जाहीर करण्यात आला तसेच लष्कर बोलाविण्यात आले. ऐन उत्सवात 300 सैनिक गस्त घालत होते.याच दरम्यान पाकिस्तानने छांब भागात हल्ला केल्याची बातमी आली. दोन सप्टेंबरला कर्फ्यू असूनही दंगल न थांबल्याने काही भागात गोळीबार करावा लागला.
दोन तीन दिवसात वातावरण निवळले तरीही 10 तारखेपर्यंत कर्फ्यू होताच. युद्धामुळे पूर्णतः ब्लॅक आउट होता. त्यामुळे संध्याकाळी देखावे बंद असत. कोणतीही आरास रोषणाई नव्हती. युद्ध आणि दंगल यामुळे कोठेही उत्साह नव्हता. ब्लॅक आउटमुळे अनंत चतुर्दशीची मिरवणूक संध्याकाळच्या आत संपवायची वेळ आली.
मिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी होती. तसेच कोणतीही वाद्ये मिरवणुकीत नव्हती. 9 सप्टेबरला पहाटेपासून मंडळांनी रांगेत येण्यास सुरुवात केली. परंतु सर्व मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली नाहीत. काहींनी अक्षता टाकून जागेवरच विसर्जन केले तर काहींनी विहिरीत. मिरवणूक मार्गावर गर्दीही नव्हती.
9 तारखेला विसर्जन झाले व 11 तारखेला भारतीय सैन्याने पाकिस्तानवर निर्णयक विजय मिळविले. लाहोरला रणगाड्यांवर पाकिस्तानी सैन्याने पांढरी निशाणे फडकविली. 1200 मैलाचा टापू भारतीय सैन्याच्या ताब्यात आला.
जणूकाही बाप्पांनी परीक्षाच पहिली. पण उत्सव थांबला नाही. असेच यावर्षी ही घडो आलेले संकट बाप्पा दूर करो ही प्रार्थना.
(लेखक इतिहास संशोधक आहेत. 'पुणे एकेकाळी' आणि 'पुण्याची स्मरणचित्रे' ही पुण्याच्या इतिहासावर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या लेखात मांडलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























