अजित पवार नाराज आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस आमनेसामने आल्यानंतर देशभरात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

महाराष्ट्र तसंच सुशांतचं मूळ राज्य बिहारमध्ये या विषयाच्या अवतीभोवती राजकारणही पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं.

एकीकडे हा वाद सुरू असतानाच, राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या प्रकरणावरून पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. याचाच एक भाग म्हणजे पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य.

गेले काही दिवस मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असा सूर देशभरात विविध स्तरावर उमटत होता. पण सुशांत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली.

हा वाद रंगलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आणि वादाला नवं वळण मिळालं.

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ यांनी त्यावेळी केली होती. सदर आशयाचं पत्रही पार्थ यांनी गृहमंत्र्यांना दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी याविषयी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी(12 ऑगस्ट) प्रतिक्रिया दिली.

'पार्थ अपरिपक्व आहेत आणि मी त्यांना कवडीचीही किंमत देत नाही, माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे', असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे. पवार यांनी इतकं कठोर वक्तव्य करण्यामागे काय कारण आहे, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. यावरून अजित पवार नाराज आहेत, अशीसुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी स्वतः अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा उपस्थित होते. पण या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्टपणे कळू शकलेलं नाही.

शरद पवारांनी थेट मीडियासमोर असं वक्तव्य करायला नको होतं, असं मत अजित पवार यांनी मांडल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले.

तब्बल दीड तास ते सिल्व्हर ओकवर होते. पण या बैठकीत काय झालं हे बोलायला पार्थ यांनी नकार दिला.

त्यानंतर आज(14 ऑगस्ट) अजित पवार समर्थक मानले जाणारे सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, मंत्री अदिती तटकरे शरद पवार यांच्यात एक बैठक यशवंत चव्हाण सेंटरमध्ये झाली.

शऱद पवार अजित पवार सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, SUPRIYA SULE/FACEBOOK

या बैठकीनंतर शरद पवार पत्रकारांशी न बोलता निघून गेले. पण धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'पार्थ पवार प्रकरण आणि यशवंत चव्हाण सेंटरला अजित पवार समर्थकांची बैठक हा योगायोग आहे का?' असा प्रश्न पत्रकारांनी मुंडे यांना विचारला.

पण आजच्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचं मुंडे यांनी सांगितलं. तसंच अजित पवारसुद्धा नाराज नसल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलं.

एवढं बोलूनच मुंडे थांबले नाहीत, तर सुशांतसिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांना बिहारचं प्रभारीपद देण्यात आलं आहे, हा योगायोग असू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसंच सुनील तटकरे यांनीही बैठकीनंतर पार्थ पवार यांच्याबाबत कोणत्याच प्रकारची चर्चा झाली नसल्याचं सांगत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

पवार कुटुंबीयांची उद्या बैठक?

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, वाद मिटवण्यासाठी उद्या(15 ऑगस्ट) पवार कुटुंबीयांनी एक बैठक आयोजित केली आहे. अजित पवार यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

'पार्थ सिल्व्हर ओकवर गेल्याने वाद निवळल्याची शक्यता'

शरद पवार यांनी कठोर शब्द वापरले असले तरी अजित पवार आणि पार्थ यांनी सिल्व्हर ओकवर जाणं, शरद पवारांची भेट घेणं यामधून हा वाद निवळला असल्याचा अर्थ निघतो, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.

त्यांच्या मते, "पार्थ पवार लोकसभा निवडणुकीपासून साईडलाईन झाले होते. त्यामुळे ते सक्रीय होण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसऱ्या बाजूला, रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीने जोर धरला आहे. त्यामुळे आपण बाजूला पडलो, असं पार्थ यांना वाटू शकतं. अशा स्थितीत ते प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत."

"नुकत्याच झालेल्या वादानंतर पार्थ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा समोर आल्या आहेत. आता त्यांनासुद्धा पक्षात एखादी जबाबदारी द्यावी, असा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यासाठी त्यांना सिल्व्हर ओकवर बोलावण्यात आलं असावं. कौटुंबीक विषय म्हणून हा वाद निवळला जाईल," असं देशपांडे सांगतात.

पार्थच्या प्रमोशनचा इव्हेंट?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना सध्याचं प्रकरण म्हणजे पार्थ पवार यांच्या प्रमोशनाचा इव्हेंट आहे, असं वाटतं. चोरमारे यांच्या मते, हा वाद अजित पवार स्पॉन्सर्ड असू शकतो. मीडियाला हाताशी धरून पार्थ यांचं राजकीय बस्तान बसवण्याच्या प्रयत्न आहेत.

"पार्थ कशी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतात, हे दर्शवण्याचा तो प्रयत्न होता. याबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू असतानाच पवार यांची प्रतिक्रिया आली. ती अपेक्षेपेक्षा कठोर असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे," असं मत चोरमारे नोंदवतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)