बेंगळुरु हिंसाचार : आक्षेपार्ह पोस्टवरून वादंग; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू, 110 अटकेत #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा

1. बेंगळुरूत आक्षेपार्ह पोस्टवरून वादंग; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियाने पोस्टने बेंगळुरूत वादंग माजवला आहे. रात्रीच्या सुमारास जमावाने मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोनजणांचा मृत्यू झाला. शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बेंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सोशल मीडिया पोस्टसंदर्भात 110 लोकांना अटकही करण्यात आली आहे. बीबीसी हिंदीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कथित सोशल मीडिया पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचं जमावाचं म्हणणं होतं.

पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाला. जमावाला काबूत आणण्यासाठी आम्हाला वेळ लागला .पोलिस स्टेशनवर चहूबाजूंनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे गोळीबार करण्यावाचून पर्यायच उरला नाही असं पाटील यांनी सांगितलं.

श्रीनिवास मूर्ती, गृहमंत्री यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

2. कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही- उद्धव

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ 5 रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

आज पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदी उपस्थित होते.

3. मी सांगतो तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं?-राज ठाकरे

"जिम सुरू करा, आता मी सांगतोय. ज्याला यायचं आहे तो जिमला येईल. बघू काय होतंय," असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यात जवळपास चार महिने जिम बंद असल्याने व्यायामप्रेमी आणि जिम व्यायवसायिकांचा रोष वाढला आहे.

"विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरू व्हायला हव्यात," असं राज ठाकरे यांनी जिम चालक-मालक यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सांगितलं. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.

"किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या," असे आवाहन राज यांनी केले.

"गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स काय असू शकतो? मधू इथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होतंय बघूया.. माझं तुम्हाला म्हणणं आहे काय कारवाई करणार? मार्केट सुरु आहेत सगळे. हा सगळा मूर्खाचा बाजार सुरु आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुरु आहेत." असे राज ठाकरे म्हणाले.

"केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?" असा सवालही त्यांनी विचारला.

4. वीजं बिलं वाढलेली नाहीत, लोकांचा तसा समज झालाय-नितीन राऊत

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

वीज बिलं वाढल्याचा समज असला तरीही मुळात मात्र ती वाढलेली नाहीत, याच मतावर ते ठाम दिसले.

ग्राहकांची अवाजवी वीज बिलं माफ करावी अशी मनसेची मागणी आहे, त्यांनी केंद्र सरकाकडे ही मागणी करावी, असं त्यांनी थेट शब्दांत सांगितलं. आमच्यावर लावला जाणारा आक्षेप चुकीचा असल्याचं म्हणत घरगुती ग्राहकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची बाब राऊत यांनी अधोरेखित केली.

5. फ्लिपकार्ट अमेझॉन सेलमध्ये चिनी वस्तूंची जोरदार विक्री

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये चीनचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सची जोरदार विक्री झाली आहे. भारत-चीन सीमा वादानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत होती. पण या ऑनलाइन ऑफर्सने भारतीय ग्राहकांना आकर्षित केलंय. फोनच्या विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

चीनचे ब्रँड असलेले अनेक फोन या सेलमध्ये 'आऊट ऑफ स्टॉक' झाले आहेत. याशिवाय ऑफलाइन विक्रीतही वाढ झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)