कोरोना : जिल्हाबंदी असतानाही महाराष्ट्रात संसर्ग का आणि कसा वाढला?

फोटो स्रोत, ANI
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (11 ऑगस्ट) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हटलं की, देशातल्या 80% अॅक्टिव्ह केसेस फक्त 10 राज्यांमध्ये आहेत आणि या 10 राज्यांनी जर परिस्थिती आटोक्यात आणली तर देश कोरोनाविरुद्धचा लढा जिंकू शकतो.
देशात महाराष्ट्र अजूनही रुग्णसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) चांगला आहे, पण महाराष्ट्रात काही जिल्हे, काही शहरांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
देशातही सरासरी रिकव्हरी रेट चांगला असला तरी काही राज्यांमधला वाढीचा दर वेगाने वाढतोय. मग नेमके रुग्ण कुठे वाढतायत आणि का वाढतायत?
महाराष्ट्रातील परिस्थिती
महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराची सुरुवात पुणे-मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये झाली. सुरुवातीचा बराच काळ कोरोनाचे रुग्ण प्रामुख्याने मुंबईत आढळत होते. त्यामुळे राज्य शासनाचा मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर विशेष भर होता.
पण आता चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर या व्हायरसचा प्रसार पुणे-मुंबईबाहेर जास्त वेगाने होत असल्याचं दिसतंय. निव्वळ दैनंदिन रुग्णांची संख्या पाहिली तर नाशिक, जळगाव, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर असल्याचं दिसून येतंय.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार आता मुंबई-पुण्याबाहेर जास्त वेगाने होताना दिसतोय याबद्दल बोलताना राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी म्हटलं, "या व्हायरसचा प्रवास लक्षात घेतला तर टप्प्याटप्प्याने असंच होणं अपेक्षित होतं. हा व्हायरस परदेशातून आल्यामुळे आधी तो शहरांमध्ये मर्यादित राहिला. कारण परदेशात प्रवास करून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त असते."

"ज्यावेळी दुबई, ओमान, कुवेतसारख्या देशांमधून संसर्ग भारतात यायला सुरुवात झाली तेव्हा परिस्थिती बदलली. या देशांमध्ये कामासाठी जाणारा वर्ग हा कष्टकरी वर्ग आहे. या देशांमधून लोक परत यायला लागल्यानंतर हा व्हायरस वस्त्यांमध्ये पोहोचला."
अनलॉक केल्यानंतर याचा प्रवास इतरत्र होणं अपेक्षित असल्याचंही डॉ. आवटेंनी म्हटलं.
याबद्दल बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे काही प्रश्न उपस्थित करतात, "जर व्हायरसचा असा प्रसार अपेक्षितच होता तर तेवढी तयारी का केली गेली नाही? मेट्रो शहरांच्या बाहेरच्या भागांमध्ये आजही पुरेशी तयारी झालेली नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. ही तयारी करता येऊ शकते."
"मुंबई व्यतिरिक्त ज्याठिकाणी आकडे वाढले होते ते नियंत्रणात आहेत. मालेगावमधेही आता रोजच्या रूग्णांचा आकडा खूपच कमी संख्येने वाढताना दिसतोय. औरंगाबाद, नागपूरसह इतर जिल्ह्यात टेस्टिंग वाढवतोय आणि इतर उपाययोजना करतोच आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की ते जिल्हेही पूर्ववत होतील," असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
जिल्हाबंदी असतानाही व्हायरस कसा पसरला?
बीबीसी मराठीच्या पॉडकास्टमध्ये दररोज येणारा एक प्रश्न म्हणजे जिल्हाबंदीचा किती फायदा झाला आणि ती कधी उठणार?
आम्ही जेव्हा डॉ. आवटेंना विचारलं की, जिल्हाबंदी असतानाही व्हायरस इतरत्र कसा पसरला? तेव्हा त्यांनी म्हटलं, "आपल्याकडे पूर्णपणे जिल्हाबंदी नाहीय ना. अत्यावश्यक सेवांमधील लोक, पास घेऊन जाणारे लोक असे अनेक लोक आहेत आणि यातून थोड्या प्रमाणात का होईना व्हायरसचा प्रसार होणं स्वाभाविक आहे. जिल्हाबंदी नसती तर आपल्याला यापेक्षा खूप अधिक केसेस पाहायला मिळाल्या असत्या. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या केसेसपैकी 85% to 90% केसेस या मुंबईहून प्रवास करून आलेल्या लोकांच्या होत्या."

डॉ. अविनाश भोंडवे जिल्हाबंदीबद्दल म्हणतात. "जिल्हाबंदी असूनही लोक इकडून तिकडे प्रवास करतच होते, अनेकांनी बंधनं पाळली नाहीत. आता गणपतीच्या काळात व्हायरसचा प्रसार अजून वाढण्याची शक्यता आहे."
ग्रामीण भागांमध्ये काय अडचणी येऊ शकतील?
मोठ्या शहरांबाहेर हा व्हायरस पसरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
1. लक्षणं दिसली की उपचार घ्यायचे- ग्रामीण भागात दुखणं अंगावर काढण्याची आपल्याकडे सवय आहे. तसं न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते आणि इतरांना संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते.
2. चाचण्यांची क्षमता वाढवणं- निमशहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये चाचण्या करण्याची क्षमता कमी आहे, त्यामुळे परिस्थितीचा अंदाज यायला उशीर होतो. अँटिजेन किट्स आणि RTPCR किट्स ची उपलब्धता वाढवली तर अधिक चाचण्या होऊन लवकर उपचार करणं शक्य होईल.
3. कोव्हिड केअर सेंटर- महाराष्ट्रात सर्वदूर अधिक प्रमाणात कोव्हिड केअर सेंटर उभी राहिली पाहिजेत. काही अशा केसेस पाहायला मिळाल्या आहेत जिथे ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजन लावायची गरज पडली आणि त्यानंतरच्या उपायांसाठी त्यांना शहरात आणता आलं नाही किंवा आणत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जर सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर उभी करता आली तरही परिस्थिती ओढवणार नाही, असं डॉ. भोंडवे सांगतात.
'स्थानिक पातळीवर संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनच उपाययोजना ठरवतंय, त्यासाठी एक व्यापक आराखडा राज्य सरकारकडून दिला जातो', असं डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

भारतात काय चित्र?
भारतात एकीकडे कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांचा आकडा अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. पण या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 80% रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी 81% मृत्यूसुद्धा याच 10 राज्यांमध्ये झाले असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय.
ही 10 राज्यं पुढीलप्रमाणे- तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल.

फोटो स्रोत, ANI
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या काही काळात रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसतेय. परदेशातून प्रवास करून भारतात परत आलेले नोकरदार तसंच परराज्यांतून आपल्या गावी परतलेले मजूर यांच्यामुळे या व्हायरसचा प्रसार वाढल्याचं आंध्र तसंच बिहारच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (11 ऑगस्ट) या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत असताना म्हटलं, की कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'कंटेनमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्व्हेलन्स' या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
इतकंच नाही तर संसर्गग्रस्त लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचं 72 तासाच्या आत टेस्टिंग केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे भारतात टेस्टिंग वाढवल्यामुळे अॅक्टिव्ह केसेसच्या आकड्यात लक्षणीय घट झाली आहे.
भारताचा मृत्यूदर पहिल्यांदाच 2 टक्क्याच्या खाली आला आहे. मंगळवारी तो 1.99% झाला आहे.
केंद्र सरकारला जेव्हा वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येबद्दल विचारलं गेलं तेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णसंख्येने दबून न जाता बरे होत असलेल्या लोकांच्या संख्येकडे लक्ष द्यावं असं सुचवलं.
"भारत दररोज 7 लाख चाचण्या घेत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी खूप कमी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा किंवा ICU मध्ये उपचारांची गरज पडते ही चांगली गोष्ट आहे," असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























