अयोध्या राम मंदिर: पार्थ पवारांचं 'जय श्रीराम', सुप्रिया सुळे म्हणतात हा वैयक्तिक मुद्दा #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटस यांचा घेतलेला आढावा

1. पार्थ पवार म्हणतात 'जय श्रीराम'

राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिकाला मांडण्याचा अधिकार आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे की व्यक्तीस्वातंत्र्याचा विसर पडला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. याबाबत पार्थ यांनी ट्वीट करून राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून जय श्रीरामचा जयघोष केला आहे. पार्थ यांची भूमिका शरद पवारांना पटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पार्थ पवार पत्रात म्हणतात, अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसासाठी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे.

युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपण पराभूत झाले आहेतच, आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे, असं ज्यांना वाटत आहे, त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे.

आजच्या आधुनिक भारतात रामलल्ला यांना अयोध्येत हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिया होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक मनुष्यमात्र नव्हे तर प्राणीमात्रालाही सन्मानाने वागवलं जात असे.

2. कोरोना म्हणजे चायनीज फॅड म्हणणाऱ्या डॉक्टरांचे निधन

वेदिक्युअर उपचार पद्धतीचे संचालक आणि संस्थापक डॉ. अनिल पाटील यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले. एक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोना म्हणजे चायनीज फॅड आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

या वक्तव्याप्रकरणी त्यांना राज्य वैद्यकीय परिषदेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचं संकट थैमान घालत असताना डॉ. पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल झालं होतं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

8 जुलैला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना जुहू इथल्या आरोग्य निधी रुग्णालयात आणण्यात आलं. डॉ. पाटील यांना रक्तदाब तसंच डायबेटिसचा त्रास होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. कोरोनाची भीती निरर्थक आहे, कोरोना नव्हे तर मलेरिया, तीव्र श्वसन त्रास, डायरिया या गंभीर समस्या आहेत. करोनाऐवजी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं असंही ते म्हणाले होते.

3. परीक्षा रद्द करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला. 'लोकसत्ता'ने याबाबत बातमी दिली आहे.

कुठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल करता येतो का, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने मेहता यांना दिले.

महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर केले असून करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. याआधीच्या सुनावणीत महाराष्ट्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते.

4. साखर कारखाने सुरू करणार कोव्हिड हॉस्पिटल्स

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी साखर कारखान्यांनी कोव्हिड हॉस्पिटल सुरू करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी केलं होतं.

या आवाहनला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. 100 खाटांचे अद्ययावत कोव्हिड काळजी केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांच्या माध्यमातून आगामी काळात 2,300 कोरोना रुग्णांची सोय होऊ शकेल. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. हॉस्पिटल वाढवण्याची गरज आहे. सहकारी साखर कारखान्यांनी कोव्हिड हॉस्पिटल उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा अशा सूचना शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या होत्या. रविवारी शरद पवार यांनी सातारा आणि कोल्हापूरचा पाहणी दौरा केला होता.

5. तिरुपती मंदिर ठरलं कोव्हिडचं हॉटस्पॉट

देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती बालाजी मंदिर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. तिरुपती देवस्थानम मंदिराच्या 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मंदिराशी संबंधित तिघांचा मृत्यूही झाला आहे. 402 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी सांगितलं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 8 जूनला मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी भाविकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याचं पालन करणं अनिवार्य आहे असंही सिंघल यांनी स्पष्ट केलं. मंदिराच्या 50 पुजाऱ्यांपैकी 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)