बैरुत स्फोट : भारतात अमोनिअम नायट्रेटचा 700 टनांचा साठा कोठे आहे?

अमोनिअम नायट्रेट

फोटो स्रोत, REUTERS/MOHAMED AZAKIR

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

लेबननची राजधानी असलेल्या बैरुतमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 150 हून अधिक लोकांनी प्राण गमावले आणि 5 हजाराहून जास्त लोक जखमी झाले. या स्फोटामागचं कारण होतं अमोनिअम नायट्रेट हे केमिकल.

याच केमिकलचे साठे भारतातही आहेत. एकदोन किलो नाही, तर तब्बल 740 टन अमोनिअम नायट्रेट चेन्नईमधील बंदरात आहे.

कस्टम विभागानं एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, चेन्नईपासून 20 किलोमीटर दूर असणाऱ्या मनालीमधील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) अमोनिअम नायट्रेट ठेवण्यात आलंय.

आयातीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे 2015 साली हा माल पकडण्यात आला होता आणि तेव्हापासून तो इथेच पडून आहे.

कस्टम विभागानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "जप्त करण्यात आलेलं कार्गो सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. जिथे हे कार्गो ठेवण्यात आलं आहे, ते सीएफ़एस चेन्नई शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्या आसपास दोन किलोमीटरपर्यंत कोणताही रहिवासी भाग नाहीये."

पीएमके नेत्याने उपस्थित केले प्रश्न

कस्टम विभागाचे सहआयुक्त समय मुरली यांना हे निवेदन प्रसिद्ध करावं लागलं, कारण पीएमके पक्षाचे नेते एस रामदौस यांनी ट्वीटरवरून चेन्नईमध्ये घातक केमिकल्सचा साठा असल्याचं म्हटलं होतं.

पीएमके नेता एस रामदौस माजी केंद्रीय आरोग्य मंत्री अंबुमणि रामदास यांचे वडील आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आरोग्य मंत्री असताना अंबुमणि रामदास यांनी सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यावर बंदी घातली होती.

बैरूत स्फोट

फोटो स्रोत, EPA

बैरुतमध्ये जो स्फोट झाला, तिथे चेन्नईपेक्षाही तिप्पट प्रमाणात अमोनिअम नायट्रेट साठविण्यात आलं होतं.

अमोनिअम नायट्रेट हे केमिकल खतांखेरीज स्फोटकं बनविण्यासाठीही वापरलं जातं.

रामदौस यांनी अजून एक ट्वीट करून लिहिलं की, चेन्नई इथल्या गोदामामध्ये अमोनिअम नायट्रेट सापडल्यामुळे स्फोटाची भीती आहे. त्यामुळे हे केमिकल इथून हटविण्यात यावं आणि खतनिर्मितीसारख्या कामात याचा वापर केला जावा.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. मात्र लिखित निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं, "सीएफएसकडून सुरक्षेसंबंधीची सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय हे अमोनिअम नायट्रेट इथून हलविण्यासंबंधीही कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी ई-ऑक्शन करण्यात आला आहे. सुरक्षेसंबंधीच्या सर्व नियमांचं पालन करत तिथून तो केमिकल पदार्थ हटवला जाईल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)