जम्मू-काश्मीर: पाच ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कर्फ्यू

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेचं कलम 370 हटवून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी घेतला होता.
पाच ऑगस्टला या घटनेला एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने आंदोलनं, विरोध होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लागू केला आहे.
श्रीनगरमध्ये दोन दिवसांकरता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
मोदी सरकारचा तो निर्णय वादग्रस्त ठरला होता. काश्मीरमधील मुख्य राजकीय पक्षांनी तसंच देशातील विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका केली होती.
फुटीरतावादी गट आणि पाकिस्तानचं समर्थन असलेले गट पाच ऑगस्टला काळा दिवस म्हणून आंदोलन करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
पाच ऑगस्टला हिंसक आंदोलन होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित तसेच मालमत्तेला हानी पोहोचू शकते या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

श्रीनगरमध्ये 4 आणि 5 ऑगस्टला लोकांच्या जाण्यायेण्यावर कठोर निर्बंध असतील. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले तर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचंही प्रशासनाने सांगितलं आहे.
कर्फ्यू काळात केवळ आपात्कालीन वैद्यकीय सेवा कार्यरत असतील असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांचा पहारा वाढला आहे. पाच ऑगस्ट जवळ येऊ लागला आहे तसं कोव्हिड-19 आणखीनच सक्रिय होऊ शकतो.
सगळं अशा पद्धतीने केलं जात आहे की लोकांचा रोष, राग बाहेरच येऊ नये असं पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. श्रीनगरमध्ये दोन दिवसांकरता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
पाकिस्तानात घडामोडी
सोमवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी पाकिस्तान प्रशासित चिरिकोट भागाला भेट दिली.
"पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीरचे प्रतिनिधी आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून प्रत्येक व्यासपीठावर तुमच्या वतीने मी लढतो आहे. जगातल्या लोकांना खरी परिस्थिती सांगण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत", असं कुरेशी म्हणाले.
भारताने गेल्या वर्षी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेचं कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. काश्मीरमधील लोकांनी हा निर्णय नाकारला आहे असं महमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे. भारताने काश्मीरमधील लोकांचा आवाज दाबून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे परंतु इथल्या माणसांचं डोकं शाबूत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कुरेशी म्हणाले, "तुमच्या साहसाला सलाम. असंख्य अडचणी असूनही तुम्ही डगमगला नाहीत. आपल्या ध्येयाशी कटिबद्ध राहिलात. विजय तुमचाच होणार आहे. जगाने यासंदर्भात मौन बाळगलं आहे. काश्मीरसंदर्भात भारताने घेतलेला निर्णय कोणालाही मान्य नाही. काश्मीरमधील लोकांवर अनेक स्वरुपाची बंदी घालण्यात आली आहे. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येतं आहे. परंतु त्यांचा मेंदू आणि मन कोंडून ठेवलं जाऊ शकत नाही".
पाकिस्तानतर्फे सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा मांडण्यात येईल असं कुरेशी यांनी स्पष्ट केलं.
अंतिम लक्ष्य श्रीनगर-कुरेशी
ते पुढे म्हणाले, "काश्मीरमध्ये सगळं काही सुरळीत आहे असं भासवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सगळं काही सर्वसामान्य आहे मग शहीदांचे पार्थिव परत का देण्यात आले नाहीत? कारण यावर जी प्रतिक्रिया उमटेल त्याची भारताला भीती वाटते. नवी दिल्लीतून या भागासाठी 900,000 सैनिकांची फौज तैनात करण्यात आली आहे".

फोटो स्रोत, Getty Images
"ते मानसिक लढाई हरत चालले आहेत आणि तुम्ही जिंकण्यादिशेने वाटचाल करत आहात. इस्लामाबादमध्ये काश्मीर हायवेचं नाव श्रीनगर हायवे ठेवण्यात आलं आहे. कारण आपलं अंतिम लक्ष्य श्रीनगर आहे. काश्मीरी माणूस श्रीनगरच्या जामिया मशिदीत नमाज अदा करेल, तो दिवस फार दूर नाही" असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























