'कोरोना लशीच्या प्रयोगात कोणताही धोका नाही, लोकांनी प्रयोगासाठी मदत करावी'

डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर

फोटो स्रोत, DrGillurkar

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कोरोना लशीच्या प्रयोगात कोणताही धोका नाही. हॉस्पिटलतर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जाते. लोकांनी प्रयोगसाठी मदत करायला हवी असं मत कोरोना लशीची चाचणी झालेल्या स्वयंसेवकाने सांगितलं. कोरोनाच्या लशीकरता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात चाचण्या सुरू आहेत. चाचणी घेण्यात आलेल्या स्वयंसेवकाशी तसंच डॉक्टरांशी बीबीसी मराठीने चर्चा केली.

"आपले आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करतायत. शास्ज्ञज्ञ लस, औषध शोधण्याचा प्रयत्न करतायत. मग, मी कसा मागे राहू. प्रत्येक देशवासीयाचं देशाप्रती काही कर्तव्य आहे. या भावनेतून मी 'कोव्हॅक्सीन'च्या मानवी चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून पुढाकार घेतला," असं बीबीसीशी बोलताना कोरोना वॉरिअर भावेश म्हणाला.

नागपूरमध्ये बुधवारी 30 वर्षाच्या भावेशने (नाव बदललेलं) 'कोव्हॅक्सीन'च्या मानवी चाचणी सहभाग घेतला. भावेशला 'कोव्हॅक्सीन'चा पहिला डोस देण्यात आलाय. भावेश औषध कंपनीत काम करतो. मानवी लशीची चाचणी सुरू असल्याने या व्यक्तीचं खरं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.

भावेश पुढे म्हणतो, "भारतावर आणि संपूर्ण जगावर कोरोनाच महासंकट आलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या व्हायरसविरोधात लढा देतोय. कोरोना विरोधातील या लढाईत माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी स्वेच्छेने मानवी चाचणीसाठी तयार झालो. 'कोव्हॅक्सीन' भारतात तयार होणारी संपूर्ण देशी बनावटीची लस असणार आहे. या चाचणीत सहभागी होणं अभिमानाचं आहे."

कोरोना
लाईन

कोव्हिड-19 विरोधातील संपूर्णत: भारतीय बनावटीच्या 'कोव्हॅक्सीन' लशीची मानवी चाचणी सुरु झाली आहे. नागपुरच्या डॉ गिल्लूरकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये 7 स्वयंसेवकांना 'कोव्हॅक्सीन'चा पहिला डोस देण्यात आला आहे. या चाचणीसाठी निरोगी असलेल्यांची तपासणी आणि स्क्रिनिंग केल्यानंतर निवड करण्यात येत आहे.

मानवी लशीची चाचणी जीवावर बेतू शकते. लशीचे साइड इफेक्ट होऊ शकतात. मग, मानवी चाचणीसाठी तयार होताना भीती वाटली का? यावर तो म्हणाला, "लस निर्माण करण्यासाठी मानवी चाचणी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.

हा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला तरच देशातील कोट्यावधी लोकांना सुरक्षित करता येईल. यासाठी कोणीतरी पुढे आलंच पाहिजे. त्यामुळे मी या मानवी चाचणीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. पेपरमध्ये लोकांना करण्यात आलेलं आवाहन वाचलं आणि डॉक्टरांशी संपर्क केला."

"लस देताना भीती अजिबात वाटली नाही. मी विचारपूर्वक निर्णय घेतला होता. ही लस काय आहे? पूर्ण प्रोसेस कशी असेल याबाबत उत्कंठा नक्कीच होती. मात्र, डॉक्टरांनी सर्व माहिती समजावून दिली. मानवी चाचणीच्या विविध टप्प्यांची माहिती दिली होती. त्यामुळे लस घेताना भीती वाटली नाही," असं भावेश म्हणतो.

डॉ. गिल्लूरकर

फोटो स्रोत, DrGillurkar

मानवी चाचणीत सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेताना मनावर दडपण होतं? घरच्यांना याबाबत माहिती आहे का? यावर बोलताना भावेश म्हणतो, "निर्णय घेताना मी आईला विचारलं. आई म्हणाली, तुला योग्य वाटतं ते कर. आईचे शब्द माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. तिने होकार दिल्यानंतर माझं मनोबल उंचावलं. त्यामुळे मला भीती वाटली नाही."

कोणत्याही लशीच्या मानवी चाचणीसाठी स्वयंसेवकांची निवड करण्यासाठी मार्गदर्शक सूचना असतात. स्वयंसेवकांची तपासणी केली जाते. रक्ताचे नमुने घेतले जातात. स्वयंसेवक त्या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर, त्याला मानवी चाचणीत सहभागी करून घेतलं जातं. भावेशची ही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची मानवी चाचणीसाठी निवड करण्यात आली.

"बुधवारी सकाळी मला 'कोव्हॅक्सीन' लशीचा पहिला डोस घेण्यासाठी रुग्णालयात बोलावलं होतं. डॉक्टरांनी सर्व माहिती दिल्यानंतर मला लस टोचण्यात आली. लस दिल्यानंतर दोन तास रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. तुमच्याशी बोलताना मला अजिबात त्रास होत नाहीये किंवा साइट इफेक्ट जाणवत नाहीतेय. डॉक्टरांची टीम स्वयंसेवकावर पुढील काही महिने लक्ष ठेवणार आहे," असं भावेश म्हणाला.

भावेश पुढे म्हणतो, "लशीच्या मानवी चाचणीसाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे. यात काही धोका नाही. डॉक्टर आणि रुग्णालयाकडून पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे लोकांनी न घाबरता मानवी चाचणीसाठी पुढे आलं पाहिजे. जेणेकरून मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लोकांना याचा फायदा होईल."

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

ज्या स्वयंसेवकांवर मानवी चाचणी करण्यात येते. त्यांना काही खास सूचना आहेत का? काही निर्बंध पाळावे लागतील का? याबाबत बोलताना डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, "या स्वयंसेवकांना सामान्य जीवन जगता येईल. यांच्यावर काही निर्बंध नाहीत. मास्क घालावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. सोशल डिस्टन्सिंग पाळावं. हात स्वच्छ धुवावेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत."

लशीच्या चाचणीसाठी आलेल्या स्वयंसेवकांची कशी निवड केली जाते? आणि त्याकरता काय निकष लावले जातात यासंदर्भात डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी तपशीलवार माहिती दिली.

  • निरोगी स्वयंसेवकांनाच लस दिली जाते. त्यांची इम्युनोजेनेसिटी तपासली जाते. लशीला त्यांचं शरीर कसा प्रतिसाद देईल हे पाहिलं जातं.
  • लशीच्या चाचणीसाठी 18 ते 55 वयोगटातील लोकांची निवड केली जाते. त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं. त्यांना दमा, अॅलर्जी, मधुमेह, रक्तदाब असा आजार नाही याची तपासणी केली जाते. कुटुंबातील व्यक्तींना काही आजाराची पार्श्वभूमी नाही ना याची खातरजमा केली जाते.
  • स्वयंसेवकांची कोव्हिड चाचणी घेतली जाते. अँटीबाँडीज आहेत का याची तपासणी केली जाते. किडनी, लिव्हर योग्य स्थितीत असतील तरच लशीचा प्रयोग केला जातो. लस देण्याआधी त्यांचं रक्त घेतलं जातं. लस देण्यात आल्यानंतर दोन तास रुग्ण्यालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येतं. स्वयंसेवक घरी गेल्यानंतर रुग्णालयातील टीम त्यांच्याशी संपर्कात असते.
  • 14व्या दिवशी लशीचा दुसरा डोस दिला जातो. पहिल्या लशीपेक्षा या डोसचं प्रमाण अधिक असतं. 28व्या दिवशी रक्त घेतलं जातं आणि अँटिबॉडी तयार झाल्या आहेत का याची तपासणी केली जाते. 42 104, 194 दिवसांनंतर अँटीबॉडी तयार झाल्या आहेत का याची पाहणी केली जाते.
  • आतापर्यंत 40 लोकांना लस देण्यात आली आहे.
  • लशीचे काही दुष्परिणाम असू शकतात उदाहरणार्थ लस दिलेल्या जागी सूज येऊ शकते. मळमळ होऊ शकते. खाज येऊ शकते. हातापायावर डाग किंवा अॅलर्जीसारखं होऊ शकतं. काहींना एखादा दिवस ताप येऊ शकतो.
  • मानवी चाचणीसाठी पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा असतो. त्याला वेळ लागतो. घाई करता येणं शक्य नाही. लस येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. ऑगस्टपर्यंत नक्की येणार नाही. फेझ-1 अजून पूर्ण व्हायचा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)