शरद पवार: 'उद्धव ठाकरे अयोध्या राम मंदिर भूमिपूजनासाठी गेले तर माझी हरकत नाही'

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या
1. मंदिर भूमिपूजनासाठी मी जाणार नाही, उद्धव ठाकरे गेल्यास माझी हरकत नाही - शरद पवार
5 ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावल्यास माझी हरकत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. मात्र ते स्वत: भूमिपूजनाला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत असंही ते म्हणाले. लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी केलीय.
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावर निकाल दिला असून अशावेळी त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, बाबरी मशीदीचा इतिहास आम्ही सांगत राहू असं विधान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन पक्षाचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
बाबरी मशीद कायम स्मरणात राहील. आम्हाला तसा विश्वास आहे. हा विश्वास आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. बाबरी मशीद पाडली नसती तर कोर्टाने निकाल दिला असता असं मला वाटत नाही.
2. मंत्र्यांना 20 लाखापर्यंतचं वाहन खरेदी करता येणार
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या पसंतीचं सरकारी वाहन खरेदी करता येणार आहे. तर मंत्र्यांना वाहन खरेदीसाठी 20 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करता येईल असे परिपरत्रक राज्याच्या वित्त विभागाने काढले आहे.
राज्यात दौऱ्यावर जाणासाठी सर्व मंत्र्यांना वाहन खरेदीची मुभा देण्यात आलीय. झी 24 तासने हे वृत्त दिलंय.
मुख्य सचिव, महाधिवक्ता, माहिती आयुक्त, मुख्य सेवा आयुक्त, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांनाही वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये वाहन खरेदीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते.
3. राज ठाकरेंच्या पत्रानंतर ऊर्जा मंत्र्यांचे वीज कंपन्यांना निर्देश
लॉकडॉऊनमध्ये वीज ग्राहकांना प्रचंड बील येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.
यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने वाढीव वीज दरासंबंधी बैठक घेतली. लोकमतने याविषयी बातमी दिलीय.

फोटो स्रोत, PAL PILLAI/GETTY IMAGES
ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता स्लॅबनुसार बिल आकारण्याचे निर्देश वीज कंपन्यांना देण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना निर्देश दिलेत.
अदानी, महावितरण अशा कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना अवाजवी बील पाठवले आहे. मोठ्या संख्येने ग्राहकांनीही याबाबत तक्रारी केल्या आहेत.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

4. 'मोदींमुळेच भारतात राफेलसारखे लढाऊ विमान येऊ शकले', बबिता फोगट यांच्या ट्विटवरुन चर्चा
राफेल या लढाऊ विमानांची एक तुकडी सोमवारी (28 जुलै) भारतात दाखल झाली.
राफेल विमानं भारतात दाखल झाल्यावर अनेकांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यात महिला कुस्तीपटू आणि भाजपची युवा नेता बबिता फोगट यांच्या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, EPA
'नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नसते तर भारतात राफेलसारखे लढाऊ विमान येऊ शकले नसते.' असं ट्विट बबिता फोगट यांनी केल्यावर त्यांना ट्रोल करण्यात आले तर काहींनी त्यांच्या मताशी सहमतीही दर्शवली.
भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानांची मागणी केली होती. राफेल विमानाची शक्ती अफाट असून त्यामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहेत.
5. शिवसेनेवरुन भाजपात मतभेद, फडणवीसांकडून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे खंडन
निवडणुका स्वबळावर लढू अशी घोषणा भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत दिली. पण त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत आजही सत्ता स्थापनेसाठी तयार असल्याचं विधान केले.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचे खंडन करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आमच्याकडून कोणताही प्रस्ताव नसून भाजप स्वबळावरच लढेल असे प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























