You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अयोध्या राम मंदिर: टाईम कॅप्सूलचं प्रकरण नेमकं काय आहे?
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
टाईम कॅप्सूल काय असते? अयोध्या मंदिराच्या उभारणीत ती टाकली जाणार आहे?
अयोध्येत काम सुरू असलेल्या राम मंदिराच्या उभारणीदरम्यान टाईम कॅप्सूल टाकण्यात येणार असल्याचा दावा राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी केला आहे.
जमिनीखाली 2000 फूट ही कॅप्सूल टाकण्यात येईल असा दावाही त्यांनी केला आहे. भविष्यात या मंदिराच्या उभारणीविषयी कोणी अभ्यास करू इच्छित असेल तर त्याला राम मंदिराविषयी सगळी माहिती मिळू शकेल. त्यावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही.
भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी चौपाल यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
मात्र राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी टाईम कॅप्सूलची गोष्ट अफवा असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ ट्रस्टचे सदस्यच टाईम कॅप्सूलसंदर्भात साशंक आहेत.
या टाईम कॅप्सूलमध्ये काय माहिती भरण्यात येणार यावरूनही वाद पेटला आहे.
टाईम कॅप्सूल म्हणजे एकप्रकारे अयोध्या वादाचा इतिहास लिहिण्यासारखं आहे असं काहींना वाटतं.
टाईम कॅप्सूल म्हणजे काय, टाईम कॅप्सूल येते कुठून आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.
टाईम कॅप्सूल म्हणजे काय?
टाईम कॅप्सूल म्हणजे एक यांत्रिक वस्तू आहे ज्याद्वारे वर्तमानातल्या गोष्टींची माहिती भविष्यात मिळू शकेल. उदाहरणार्थ 2020 मध्ये काय घडलं याची माहिती 3020 मध्ये जिवंत असणाऱ्या माणसांना मिळावी अशी इच्छा असेल तर टाईम कॅप्सूलचा उपयोग केला जातो.
असं करण्यासाठी वर्तमान काळातली सगळी माहिती अशा स्वरुपात संग्रहित करायला हवी जी हजारो वर्षांनंतरही सुरक्षित राहील. याव्यतिरिक्त ही कॅप्सूल अशा खास ठिकाणी ठेवायला हवी जेणेकरून 3020 मध्ये कोणी खोदकाम केलं तर त्यांना टाईम कॅप्सूल मिळायला हवी.
खोदकामातून टाईम कॅप्सूल मिळाल्यानंतर ती माहिती वाचून त्यांना 2020 मधलं जग कसं होतं याची माहिती मिळेल. लोकांचं राहणीमान कसं होतं, लोक कोणत्या वस्तू वापरत होते याची कल्पना येईल.
टाईम कॅप्सूलचा आकार, रंग याविषयी कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. टाईम कॅप्सूल चौकोनी, त्रिकोणी, वर्तुळाकार कोणत्याही आकाराची असू शकते. टाईम कॅप्सूलने वर्तमानाची सगळी माहिती द्यावी आणि ही माहिती वर्षानुवर्षे सुरक्षित राहायला हवी असं तंत्रज्ञान हवं.
बटेश्वर मंदिरांचं जीर्णोद्धार करणारे पुरातत्वज्ञ केके मोहम्मद यांच्या मते पुरातत्व शास्त्रात टाईम कॅप्सूलला काहीही स्थान नाही.
ते सांगतात, टाईम कॅप्सूल कशी असणार हे कॅप्सूलचं डिझाईन करणारी व्यक्ती तसंच संबंधित संस्थेवर अवलंबून असतं. जमिनीतील आतल्या गोष्टींचा दबाव झेलू शकेल यावर कॅप्सूलचा आकार ठरतो. मात्र भारतात आतापर्यंत अशी कोणतीही टाईम कॅप्सूल मिळालेली नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यात अशा स्वरुपाची टाईम कॅप्सूल बसवून घेतली होती.
राम मंदिराच्या उभारणीदरम्यान टाईम कॅप्सूल बसवण्यासंदर्भात केके मोहम्मद सांगतात, हे योग्यच आहे. यामुळे येणाऱ्या काळात कोणताही वादविवाद निर्माण व्हायला नको. कारण आता जे होतं ते न्यायालयाच्या आदेशानुसार होतं आहे.
टाईम कॅप्सूलचा इतिहास
भारतात टाईम कॅप्सूलचा इतिहास प्रदीर्घ असा नाही. स्वातंत्र्यानंतर 25 वर्षांनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या वाटचालीतील गौरवशाली क्षण आणि संघर्षमय मुददे यांची माहिती टाईम कॅप्सूलमध्ये भरली होती.
राजकीय कारकीर्दीत शिखरावर असताना इंदिरा यांनी ही कार्यवाही केली होती. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि त्यांनी लाल किल्ल्यात टाईम कॅप्सूल बसवून घेतली.
मात्र या टाईम कॅप्सूलमध्ये भरण्यात आलेल्या माहितीवरून वादाला तोंड फुटलं.
इंदिरा गांधी यांच्यानंतर सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई यांनी खोदकाम करून या टाईम कॅप्सूलला बाहेर काढलं होतं. या टाईम कॅप्सूलमध्ये काय होतं यावरून आजही वाद सुरू आहेत.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2010 मध्ये कानपूरस्थित आयआयटीमध्ये टाईम कॅप्सूल बसवली होती.
या टाईम कॅप्सूलमध्ये कानपूर आयआयटीचा नकाशा, इन्स्टिट्यूचं सील, रौप्य आणि शतक महोत्सवाचा लोगो या गोष्टींचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना महात्मा मंदिरात टाईम कॅप्सूल बसवली होती.
अयोध्या इथं राम मंदिराच्या उभारणीवेळी जमिनीखाली 2000 फूट खाली टाईम कॅप्सूल बसवण्यात आली तर असं करणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील.
जगभरातल्या टाईम कॅप्सूलचा आढावा घेतला तर आंतराळातल्या प्रोब व्होयेजर 1 आणि 2 यांच्यामध्ये मानव प्रजातीसंदर्भातली सगळी माहिती भरण्यात आली आहे.
वादविवाद
टाईम कॅप्सूलने वाद होतात असा साधारण इतिहास आहे. राम मंदिर उभारणीच्या निमित्तानेही आपल्याला हेच पाहायला मिळालं आहे. अयोध्येत टाईम कॅप्सूल टाकण्यात येणार अशा बातम्या फिरू लागल्यानंतर या कॅप्सूलमध्ये काय असणार यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी टाईम कॅप्सूलशी निगडीत गोष्टी अफवा असल्याचं म्हटलं आहे.
ट्रस्टच्या सदस्यांमध्ये टाईम कॅप्सूलवरून असलेला संभ्रम बघता टाईम कॅप्सूल टाकली जाणार की नाही हा खरा प्रश्न आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)