GST परतावा: महाराष्ट्राच्या तिजोरीत सर्वाधिक परतावा, 19,233 कोटी रुपयांची भर #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) महाराष्ट्राला अखेर GST परतावा मिळाला, राज्याच्या तिजोरीत आले 19,233 कोटी रुपये

केंद्र सरकारनं विविध राज्यांना वस्तू आणि सेवा कराचा अर्थात जीएसटीचा परतावा दिला आहे. महाराष्ट्राला देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 19 हजार 233 कोटी रुपये जीएसटीचा परतावा देण्यात आला आहे. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

2019-20 या आर्थिक वर्षातील जीएसटीचा हा परतावा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आणि त्यातही कोरोनाच्या काळात आर्थिक चणचण भासत असताना, महाराष्ट्र सरकारकडून वारंवार पत्रांद्वारे जीएसटीच्या परताव्याची मागणी केली जात होती.

एकूण 1.65 लाख कोटी रुपयांचा जीएसटी परतावा विविध राज्यांना केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून वाटप करण्यात आला.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक जीएसटी परतावा कर्नाटक राज्याला मिळाला आहे. 18 हजार 628 कोटी एवढी रक्कम कर्नाटकला जीएसटी परतावा म्हणून मिळाली आहे.

2) भारतात दररोज चाचण्यांची क्षमता 10 लाखांपर्यंत होईल- नरेंद्र मोदी

भारतात सध्या कोरोनाच्या दररोज पाच लाख चाचण्यात होत आहेत. लवकरच हा आकडा दहा लाखांवर पोहोचेल, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.

मोठमोठ्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे. त्याचवेळी, बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) जास्त आहे, असं मोदींनी सांगितलं.

मुंबई, कोलकाता आणि नोएडा या तीन ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठीच्या आधुनिक सुविधांचं उद्घाटन केलं. त्यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

जानेवारीत भारतात केवळ एकच कोरोना सेंटर होता आणि आता जवळपास 1300 प्रयोगशाळा उभारल्या गेल्यात.

3) महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू - जे. पी. नड्डा

महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. सोमवारी (27 जुलै) ते भाजपच्या महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढविण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करीत नड्डा यांनी पुढील प्रत्येक निवडणुकीत पक्ष स्वबळावर विजय संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही नड्डा यांनी केली.

''महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून, आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे. कोरोनासारख्या संकटकाळातही भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार राज्यातील पक्षाच्या नेत्यांकडून समजले आहेत. हा भ्रष्टाचार उघड करून सरकारविरोधातील लढा तीव्र करा," असं आवाहनही नड्डांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना केलं.

दरम्यान, भाजपने महाराष्ट्रात खरंच स्वबळावर लढून पाहावं, असं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. "भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे कमी आमदार निवडून येतील," असा टोलादेखील बाळासाहेब थोरात यांनी लगावला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

4) सरकारनं लॉकडाऊन करावं, आम्ही ते मोडण्याचं आवाहन करू - प्रकाश आंबेडकर

लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"कोरोनासंदर्भातील आकडे साशंकता निर्माण करणारे, मृत्यूदर, रिकव्हरी रेट यांचे आकडे फसवे आहेत. हे गणित सरकारनं समजून सांगावं. यातून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे," असं आंबेडकर म्हणाले.

तसेच, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी करण्याचा वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा, असं आवाहन आंबेडकरांनी केलंय.

5) सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची CBI चौकशी करा - पार्थ पवार

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली आहे. या मागणीचं पत्र पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलंय. मुंबई मिररनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

बिहार, उत्तर प्रदेशातून आपल्याला अनेक तरुणांचे फोन आले. या प्रकरणात काहीतरी करावे. सुशांत सिंहच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी आपल्याला करण्यात आली, असं पार्थ पवार यांनी पत्रात म्हटलंय.

मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास आहेच, असं म्हणत पार्थ पवार म्हणतात, मात्र सुशांतचा तपास सीबाआयनं करायला हवा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)