निवडणूक आयोगावर भाजपसंबंधित संस्थेला काम दिल्याचा आरोप, आयोगाचं म्हणणं काय?

फोटो स्रोत, mahasec.maharashtra.gov.in
'महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग' 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या काळात दिलेल्या जाहिरातींच्या कामामुळे वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
'भारतीय जनता पक्षा'च्या 'आयटी सेल'शी संबंधित व्यक्तीच्या जाहिरात संस्थेला निवडणूक आयोगानं त्यांच्या जाहिरातींचं काम दिल्याचा आरोप माजी पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केला आहे.
या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाल्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या निवडणूक आयुक्तांना या आरोपांवर खुलासा मागितला आहे.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

या वादाला आता राजकीय वळणही मिळालं असून माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
साकेत गोखले यांनी गुरुवारी 'ट्विटर'च्या माध्यमातून असे आरोप केले की निवडणूक आयोगानं एका प्रकारे भाजपाचा 'आयटी सेल'ला त्यांच्या सोशल मीडिया जाहिरातींसाठी काम दिलं होतं.
गोखले त्यांच्या 'ट्विट'मध्ये असं लिहितात की, "महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांच्या सोशल मीडिया जाहिरातींचं निरिक्षण केल्यावर असं दिसलं की जाहिरातदाराचा देण्यात आलेला मुंबईचा पत्ता विविध जाहिरातींमध्ये एकच आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हा पत्ता साईनपोस्ट इंडिया नावाच्या जाहिरात संस्थेचा आहे. हाच पत्ता 'सोशल सेंट्रल' नावाच्या एका डिजिटल एजन्सीचा सुद्धा आहे. ही एजन्सी 'भारतीय जनता युवा मोर्चा'चा आयटी आणि सोशल सेलचा राष्ट्रीय समन्वयक असलेल्या देवांग दवे यांच्या मालकीची आहे.
देवांग दवे यांनी 'द फिअरलेस इंडियन', 'आय सपोर्ट नरेंद्र मोदी' यांसारख्या वेबसाईट्स आणि सोशल मीडिया पेजेसचीसुद्धा स्थापन केली आहेत. त्यांच्या एजन्सीच्या वेबसाईटवर 'भाजपा'सोबत इतर सरकारी संस्थांचीही ग्राहक म्हणून नावं आहेत. निवडणूक आयोगानं 'भाजपा'च्या 'आय टी सेल'मधल्या व्यक्तीला महाराष्ट्र निवडणुकीच्या काळात स्वत:च्या सोशल मीडियाचं काम देणं हे धक्कादायक आहे. निवडणूक आयोगानं या काळात सगळ्या राजकीय पक्षांचा सोशल मीडिया तपासणं अपेक्षित आहे. पण इथे आयोग सत्ताधारी पक्षासोबत काम करतांना दिसतो आहे."
देवांग दवे यांनी गोखले यांनी केलेल्या या आरोपांविषयी ट्विट करत असं म्हटलं आहे की, "आम्ही आमचं पोट दलाली करून नाही तर कष्ट करून भरतो. निवडणूक आयोगानं 'साईनपोस्ट'ला दिलेलं काम आवश्यक ती प्रक्रीया पूर्ण करून दिलं होतं. त्यात बेकायदेशीर काहीही नाही. निवडणूक आयोग आणि जाहिरात क्षेत्रानंही आम्ही केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. काही लोकांना न पटणाऱ्या विचारधारेला मी पाठिंबा देतो या कारणामुळे मी माझी व्यावसायिक कामं करायची नाहीत का?"
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या सगळ्या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
"घटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणुकांबाबतचं अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. परंतु या घटनेवरून हे निदर्शनास येतं आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपलं कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. याची तातडीनं आणि सखोल चौकशी करावी", असं चव्हाण यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
त्यासोबतच, 'या एजन्सीला काम देण्यासाठी तत्कालिन राज्य सरकारतर्फे निवडणूक आयुक्तांवर कोणत्याही प्रकारचा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, दबाव टाकण्यात आला का?' असाही प्रश्न केंद्रीय निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात चव्हाण यांनी विचारला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आयोगाची भूमिका सांगतांना असं म्हटलं आहे की, "साकेत गोखले यांच्या ट्विटबाबत आणि आरोपांसबंधात आयोगानं महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांकडे पूर्ण अहवाल तात्काळ मागितला आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























