12 वी निकाल: वडिलांची कमाई 200 रुपये रोज पण मुलीने मिळवले 99.5 टक्के

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात राहणारी जसप्रीत कौर. जसप्रीतने 12 वीच्या परीक्षेत 99.50 टक्के मिळवले आहेत.

आता काही जणांना वाटेल, त्यात काय नवीन? हल्ली अनेकांना असे मार्क मिळतातच...

पण नाही. जसप्रीत कौरचं यश हे वेगळं आहे. तिने बिकट परिस्थिती आणि प्रचंड गरीबीवर मात करून हे यश प्राप्त केलं आहे.

जसप्रीतचे वडील बलदेव सिंह गावात हेअर ड्रेसर आहेत. त्यांची कमाई दिवसाला फक्त दोनशे-चारशे रुपये इतकीच आहे. म्हणजे महिन्याला सात ते आठ हजार.

पंजाब बोर्डाचा 12 वीचा निकाल बुधवारी (22 जुलै) लागला. यामध्ये जसप्रीतने 99.50 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवलं आहे.

जसप्रीतने 12 वी मध्ये 450 पैकी 448 गुण मिळवले आहेत. ती बोर्डात राज्यात दुसरी आली आहे.

इतकं मोठं यश मिळवूनसुद्धा जसप्रीतचं आयुष्य सोपं राहणार नाही. तिला काम करत यापुढचं शिक्षण घ्यावं लागणार आहे. तिला एम. फिल. करून इंग्रजी शिक्षक बनायचं आहे, असं जसप्रीत सांगते.

जसप्रीतच्या कुटुंबात पाच जण आहेत. ते सगळे एका दोन खोल्यांच्या जुन्या घरात राहतात.

तिला 10 वीला 79 टक्के गुण मिळाले होते. पण दोनच वर्षांत जसप्रीतने उत्तुंग झेप घेतली आहे.

वडिलांनी नेहमी फक्त माझ्या शिक्षणाचाच विचार केला. त्यांच्यामुळेच मला ही कामगिरी करणं शक्य झालं. तुम्ही फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिकत नसता तर एक चांगले नागरिक होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, असं जसप्रीत सांगते.

तिने आपल्या शिक्षकांसह प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

एकाच वर्गात शिकणाऱ्या दलित मुलींचं घवघवीत यश

तर बर्नाला जिल्ह्यातील धौला गावातही एका मुलीने अशाच प्रकारचं यश मिळवलं.

धौला गावात राहणाऱ्या हरप्रीत कौर हिने 12 वी बोर्ड परीक्षेत 98.22 टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, तिच्या गावातील सुखजीत कौर हिनेसुद्धा 98 टक्के गुण मिळवले. या दोन्ही मुली एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होत्या.

हरप्रीत ही एका दलित कुटुंबातून येते. हरप्रीतला आपल्या कामगिरीबाबत आत्मविश्वास होता, असं तिच्या बोलण्यातून दिसून येईल.

ती सांगते, मला गेल्या काही परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळाले. या परीक्षेसाठीही मी मेहनत घेतली होती. मी पहाटे तीन ते सकाळी आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचे. शिवाय संध्याकाळीही दोन ते तीन तास अभ्यास करत होते.

हरप्रीतच्या कुटुंबीयांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला.

माझ्या आईवडिलांनी मला घरातली कामं कधीच सांगितली नाहीत. मी शाळा कधीच चुकविली नाही. आमचे शिक्षक अतिशय चांगले आहेत. त्यामुळे ट्यूशन न लावता मी माझा अभ्यास केला, हरप्रीत सांगते.

हरप्रीतला IAS अधिकारी बनायचं आहे. शिवाय मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्याचीही तिची इच्छा आहे.

हरप्रीतच्या यशाने तिचे कुटुंबीय अतिशय आनंदी आहेत.

तर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या सुखजीत कौर हिच्या घरची परिस्थितीही हरप्रीतप्रमाणेच आहे.

तिनेसुद्धा आपल्या गरीबीवर मात करत बारावीच्या परीक्षेत यश मिळवलं. 12 वी मध्ये 98 टक्के गुण मिळवले आहेत. पुढे स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी व्हायची तिची इच्छा आहे.

पंजाबमधील गरीब कुटुंबातून आलेल्या अनेक मुला-मुलींनी यंदाच्या बोर्ड परीक्षेत यश मिळवलं आहे. या विद्यार्थ्यांचं सर्वच क्षेत्रांतून कौतुक होताना दिसत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)