प्रेषित मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला विरोध का होतो आहे?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published

इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 2015 मध्ये इराणमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट 21 जुलै रोजी डिजिटिल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्यात येणार होता.

मुंबईतील रझा अकादमी या मुस्लीम धर्मातील सुन्नीपंथीय संघटनेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

रझा अकादमीचा विरोध का?

रझा अकादमीने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांचं चित्र रेखाटणं किंवा त्यांची व्यक्तिरेखा साकारणं निषिद्ध मानलं जातं. माजिद माजिदी यांनी या नियमाचं उल्लंघन केलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तर समाजात तेढ निर्माण होऊ शकते. हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आल्यापासून समाजात असंतोष निर्माण झाला आहे."

या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे शंभरहून अधिक दूरध्वनी आले आहेत. विविध पद्धतीने मुस्लीम समाजाला लक्ष्य करून या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न का केला जातो? या चित्रपटात प्रेषित मोहम्मद यांचं बालपण दाखवण्यात आलं आहे, असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.

त्यांचे आईवडीलही दाखवण्यात आले आहेत. इस्लामनुसार असं चित्रीकरण करता येत नाही. प्रेषित मोहम्मद यांचा थोडासा अपमान झाला तरी मुस्लीम व्यक्ती त्यांच्या सन्मानार्थ जीव देऊ शकतो. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी आपल्याला विनंती करतो. तुम्ही या प्रकरणाचं गांभीर्य समजून माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी असं रझा अकादमीचं म्हणणं आहे.

राज्याच्या सायबर विभागाकडे यासंदर्भात तक्रार आल्यानंतर तात्काळ याची दखल घेण्यात आली. हे पत्र केंद्र शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

काय आहे हा चित्रपट?

जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी इराण सरकारच्या आर्थिक साहाय्यानं प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित तीन चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्यापैकी हा पहिला चित्रपट आहे.

'मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड' हा प्रेषितांच्या बालपणाबाबतचा चित्रपट आहे. या चित्रपटाला भारतीय संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. माजिदी यांनी 2007 मध्ये या चित्रपटावर काम सुरू केलं. 2011 मध्ये तेहरान शहराजवळ उभारण्यात आलेल्या सेटवर चित्रीकरण झालं. काही प्रसंगांचं चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं.

संपूर्ण चित्रपटादरम्यान इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या बरोबरीने माजिदी काम करत होते. 2015 मध्ये इराणमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. 21 जुलै रोजी भारतात 'डॉन सिनेमा'तर्फे हा चित्रपट भारतात ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार होता.

रेहमान यांच्याविरुद्ध फतवा

इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांचं चित्र रेखाटणं किंवा त्यांची व्यक्तिरेखा साकारणं निषिद्ध मानलं जातं. साऱ्या इस्लाम धर्मीयांकडून याचं पालन केलं जातं. अन्य धर्मातील व्यक्तींनीही देखील या नियमांचं उल्लंघन करू नये असं सांगितलं जातं. परंतु मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड चित्रपटात या नियमाचं उल्लंघन झाल्याचा दावा काही मुस्लीम संघटनांनी केला होता.

हा चित्रपट करण्याचा निर्णयच इस्लामविरोधी असल्याचा ठपकाही माजिदी आणि रेहमान यांच्यावर ठेवत फतवा जारी करण्यात आला होता. हाजी अली मशिदीचे इमाम मुफ्ती मेहमूद अख्तर यांच्याकडून हा फतवा जारी करण्यात आला होता. त्या फतव्याला रेहमान यांनी उत्तर दिलं होतं.

अल्लाहनं मला जर विचारलं की मी तुला संगीतकार बनवलं, मग तू या चित्रपटाला संगीत का दिलं नाही? तर मी काय सांगणार? असं रहमान यांनी या फतव्याला उत्तर देताना म्हटलं होतं.

सोशल मीडियावर हॅशटॅग

या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात यावं यासाठी ट्वीटरवर #BoycottFilmonProhphet हा हॅशटॅग कार्यान्वित करण्यात आला. चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी या हॅशटॅगसह ट्वीट केले आहेत.

रझा अकादमी हे मुस्लीम समाजाचं प्रतिनिधित्व आहे का?

"पैगंबर काळात मूर्तीपूजा, व्यक्तीपूजा हे अमान्य झालं. हा काळ 1400 वर्षांपूर्वीचा. प्रतिमाही नको अशी भूमिका घेण्यात आली होती. पैगंबराच्या मृत्यूनंतर शिया आणि सुन्नी असे पंथ निर्माण झाले. जगात आणि भारतातही सुन्नी मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे. सुन्नी पंथीयांमध्ये बरेलवी, देवबंदी असे उपपंथ आहेत. पैगंबरांचं चित्र काढू नये, त्यांची व्यक्तिरेखा साकारू नये असं असतानाही त्यांची चित्र समकालीन पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत. चित्ररुपाने फोटो आहेत, हे अर्थातच काल्पनिक आहेत पण आहेत', असं मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. आता प्रत्येक मुस्लीम तंत्रज्ञान वापरतो. माजिदी यांनी 2015 मध्ये हा चित्रपट तयार केला. भारताचे ए. आर. रहमान यांनी त्याला संगीत दिलं आहे. त्यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला. मुस्लीम सत्यशोधक मंडळाने रहमान यांना पाठिंबा दिला होता. रझा अकादमीने मुंबईत आझाद मैदानात जे केलं ते सगळ्यांसमोर आहे. रझा अकादमी म्हणजे मुस्लीम समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही."

"मुस्लीम समाजातील जिहादी, मूलतत्त्ववादी विचारांचे लोक स्वत:चं म्हणणं इतरांवर लादू पाहतात अशा वेळी माजिदी यांनी पैगंबरांची शिकवण, त्यांची मूल्यं चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं? पैगंबरांनी उदारमतवाद, सर्वसमावेशकता, दया, शांती ही मूल्यं अंगीकारली. या गोष्टी समाजापुढे यायला हव्यात. पैगंबर यांचा चेहरा माजिदी यांनी चित्रपटात दाखवलेला नाही. त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने दाखवलं आहे. रझा अकादमी धर्माच्या नावावर राजकारण करते आहे. इस्लामचा खरा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. संशोधन, अभ्यास, साहित्यिक, धार्मिक अशा विविध कारणांसाठी लोक हा चित्रपट पाहू शकतात. माजिदी स्वत:ही मुस्लीमच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. कलाकृती पाहण्याची सक्ती नाही. तुमचा विरोध असेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीने नोंदवू शकता", असं ते म्हणाले.

'बंदीची मागणी कोण करतंय ते तपासून बघायला हवं होतं'

एक तर चित्रपटाची निर्मिती करणारे माजिद मजिदी हे स्वत: मुसलमान आहेत आणि मोहम्मद पैगंबरांनी जी चांगली मूल्यं मांडली, अंगीकारली ती यातून समाजापर्यंत पोहोचत असतील तर त्यात वावगं काय? माजिद मजीदी हे काही विध्वंसक सिनेमांबद्दल कुप्रसिद्ध नाहीत की ज्यामुळे चिंतित व्हावे. असे सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रझिया पटेल यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, "रझा अकादमीने आझाद मैदानात हैदोस घातला होता हे सर्वश्रुत आहेत. सर्वसामान्य मुस्लीमांमध्ये रझा अकादमीबद्दल फारसे आकर्षण कधी दिसले नाही. त्यामुळे चित्रपटावर बंदीची मागणी कोण करतंय हे तपासून बघायला हवं होतं. रझा अकादमी म्हणजे मुस्लिमांचं नेतृत्व नव्हे".

आझाद मैदानावर जी रॅली झाली होती तिच्यात हिंसाचार झाला होता आणि माध्यमकर्मींच्या कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली होती. ही रॅली रझा अकादमीने आयोजित केली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नुरी यांनी हे आरोप फेटाळले होते. आम्ही सहभाग घेतला होता पण ही रॅली आम्ही आयोजित केली नव्हती असं यांनी त्यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

"हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. आजच्या काळात हिंदू आणि मुस्लीम धर्मातील सनातनी आपलं म्हणणं व्यवस्थेवर लादत आहेत. त्यांनी संविधानाला वेठीस धरलं आहे. कोणी अशी काही कलाकृती तयार केली असेल आणि त्यावर आक्षेप असल्यास त्याला विचारांच्या माध्यमातूनच उत्तर द्यायला हवं. आज देशभरातल्या मुस्लिमांसमोर अस्तित्वाचं संकट आहे. त्याच्यासाठी काही करण्याऐवजी भावनिक मुद्दे काढून मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. सरकारने याला बळी न पडता मुसलमान समाजातील वास्तव प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)