रोशनी नाडरः एचसीएलच्या नव्या अध्यक्षा तुम्हाला माहिती आहेत का?

रोशनी नाडर

फोटो स्रोत, RAMESH PATHANIA/MINT VIA GETTY IMAGES

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील HCL टेक्नोलॉजी या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षा बनल्या आहेत. शुक्रवारी याबाबत एचसीएल टेक्नॉलॉजीने घोषणा केली.

या निवडीमुळं रोशनी नाडर या HCL सारख्या भारतातील बलाढ्य आयटी कंपनीचं नेतृत्त्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

यापूर्वी रोशनी यांचे वडील शिव नाडर हे एचसीएलच्या अध्यक्षपदी होते. शिव नाडर यांनीच 1976 साली HCL टेक्नोलॉजी या कंपनीची स्थापना केली होती. आज या कंपनीची गणना भारतातल्या प्रमुख आयटी कंपनींमध्ये होते.

रोशनी नाडर

फोटो स्रोत, RAMESH PATHANIA/MINT VIA GETTY IMAGES

PTI च्या वृत्तानुसार, "HCL टेक्नोलॉजी कंपनीचे संस्थापक आणि संचालक शिव नाडर आपलं पद सोडणार आहेत आणि संचालक मंडळाने या पदावर त्यांची मुलगी रोशनी यांची निवड केली आहे."

शिव नाडर हे आगामी काळातही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत.

हे पद किती महत्त्वाचं?

HCL वेबसाईटवरील माहितीनुसार, एचसीएल एंटरप्रायझेसची किंमत 9.9 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. HCL ग्रुपअंतर्गत HCL टेक्नोलॉजी, HCL इन्फोसिस्टीम आणि HCL हेल्थ केअर यांचा समावेश आहे. सुमारे दीड लाख लोक एचसीएलमध्ये काम करतात. जगभरातल्या 49 देशांमध्ये HCL चा विस्तार आहे.

रोशनी नाडर HCL टेक्नोलॉजीच्या एचसीएल ग्रुपमध्ये पूर्वीपासूनच कार्यरत होत्या. त्या HCL कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि कार्यकारी संचालिका आहेत. कंपनीचं धोरण निश्चित करण्यासह नियोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. याबरोबरच कंपनीच्या CSR विभागाच्याही त्या प्रमुख आहेत.

रोशनी या 'शिव नाडर फाऊंडेशनटच्या विश्वस्तसुद्धा आहेत. ही संस्था शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहे. याशिवाय, रोशनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्या-ज्ञान संस्थेच्या प्रमुख आहेत. ही संस्था उत्तर प्रदेशात काम करते.

रोशनी नाडर

फोटो स्रोत, shivnadarfoundation

पर्यावरणप्रेमी रोशनी यांनी 2018 साली 'द हॅबिटॅट ट्रस्ट'ची स्थापनी केली होती. जैवविविधता आणि पर्यावरण क्षेत्रात ही संस्था काम करते.

फोर्ब्स मासिकानुसार, 2019 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नाडर 54 व्या स्थानी होत्या. त्याआधी म्हणजे, 2017 आणि 2018 या दोन्ही वर्षीही फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीतही रोशनी यांचा समावेश होता.

रोशनी नाडर यांना बॉबसन कॉलेज, लुईस इन्स्टीट्युट कम्युनिटी चेंजमेकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सशी सुद्धा रोशनी संलग्न आहेत.

2019 मध्ये Harun Rich List नं रोशनी नाडर यांची भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून निवड केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे 36 हजार 800 कोटींची संपत्ती होती.

वैयक्तिक आयुष्य

रोशनी या शिव नाडर आणि किरण नाडर यांची एकुलती एक मुलगी आहेत. शालेय शिक्षण दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमध्ये झाल्यानंतर, त्यांनी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून उद्योग व्यवस्थापना पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

रोशनी नाडर

फोटो स्रोत, shivnadarfoundation

HCL मध्ये काम करण्यास सुरुवात करण्याआधी रोशनी यांनी वृत्तनिर्मात्या म्हणूनही काम केलंय.

रोशनी यांचे पती शिखर मल्होत्रा हे सुद्धा HCL मध्ये कार्यरत आहेत. शिखर हे HCL कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालकपदावर काम करतात. एचसीएल टेक्नोलॉजीच्या संचालक समितीचेही ते सदस्य आहेत.

शिखर हेसुद्धा उद्योजक कुटुंबातीलच असून ते कुवेतमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत. रोशनी आणि शिखर यांना दोन मुलं आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)