राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील तोडफोडप्रकरणी गुरुवारी माटुंगा पोलिसांनी उमेश जाधव (35) या तरुणाला अटक केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीनं राजगृह बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अटक आरोपी बाहेर पहारा देत होता.

उमेश जाधव परळ टीटी परिसरात वास्तव्यास असून बिगारी काम करतो.

त्याच्या चौकशीतून मुख्य आरोपीबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती आली असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

2 दिवसांपूर्वी मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन या घटनेनंतर म्हटलं होतं.

2. ICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल आज

काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) चा इयत्ता दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) चा निकाल शुक्रवार (10 जुलै) रोजी जाहीर केला जाणार आहे. आयसीएसई बोर्डानं यासंबंधी अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

आयसीएसई बोर्ड 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. शाळांना काउन्सिलच्या करिअर पोर्टलवर जाऊन प्रिंसिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड देऊन निकाल डाऊनलोड करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना काउन्सिलच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

कसा पाहाल निकाल?

  • काउन्सिलच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा.
  • रिझल्ट्स 2020 या लिंकवर क्लिक करा.
  • कोर्स ऑप्शन वर जाऊन ISCE / ISC 2020 result पैकी एकाची निवड करा.
  • नवे पेज उघडेल. येथे आपला युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
  • निकाल स्क्रीन वर दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

3. श्रमिक स्पेशल ट्रेनच्या काळात 110 मजूरांचा मृत्यू

देशात श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या त्या काळात रेल्वेच्या परिसरात 110 मजूरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

वेगवेगळ्या राज्य सरकारांकडून आलेल्या आकडेवारीनुसार, 4 हजार 611 श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 63 लाख स्थलांतरित मजूर हे आपापल्या मूळ गावी पोहोचले. यादरम्यान 110 मजूरांचा मृत्यू झाला.

कोरोना आणि इतर आजारामुळे हे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

असं असलं तरी अन्न आणि पाण्याच्या अभावानं एकाही मजूराचा मृत्यू न झाल्याचं केंद्र सरकार सातत्यानं म्हणत आहे.

4. उद्धव ठाकरेंच्या 'त्या' व्यवहाराची चौकशी करा - संजय निरुपम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्रे कलानगरमध्येच मातोश्री-2 या निवासस्थानाचे बांधकाम करत आहेत. ज्या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे, त्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

ज्या व्यक्तीकडून ठाकरे यांनी ही जमीन घेतली, त्या व्यक्तीची सक्तवसुली संचालनालयाकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे या जमिनीचा व्यवहार ही जनतेसमोर आला पाहिजे, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

निरुपम यांनी म्हटलं की, "कलानगर येथील मातोश्री दोनच्या बांधकामासाठी ठाकरे यांनी 2016 साली इंस्टोलिंग बायोटेक कंपनीचे संचालक राजभूषण दीक्षित यांच्याकडून 5.80 कोटी रुपयांना जमीन विकत घेतली. पण वांद्रे येथील मोक्याच्या जागेवर इतक्या कमी किमतीत ही जमीन मिळणे शक्य नाही. जमिनीची किंमत कमी करून सांगण्यात आली आहे. तसंच ज्या दीक्षित यांच्याकडून ही जमीन विकत घेण्यात आली. त्या दीक्षित यांच्यावर मनी लॉडरिंग प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे."

5. येस बँक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त

येस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा दणका दिला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 2200 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच आणली आहे.

राणा कपूर यांची कंबाला हिल येथील इमारत, नेपियन्सी रोडवरील 3 डुप्लेक्स, वरळी आणि मुंबई परिसरातील 8 फ्लॅट्स तसेच नवी दिल्लीतील अम्रित शेरगील मार्गावरील संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

दुसऱ्या एका आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच CBI च्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.

कपिल आणि धीरज वाधवान यांची मुंबईतील खारमधील 12 फ्लॅट्स, लंडनमधील 2 फ्लॅट्, ऑस्ट्रेलियामधील संपत्ती, मुळशी आणि पुण्यातील जमिनी, 5 आलिशान गाड्या ईडीनं जप्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)