You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस काळात गोव्यात पर्यटनाला परवानगी, पण ते किती शक्य आहे?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"चार महिन्यांनी मी पणजीतल्या रेस्टॉरंटमध्ये आज गेले. गोवा पूर्वीसारखं दिसत नव्हतंच. पण पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करताना दिसलं," गोव्यातल्या पत्रकार मनस्विनी प्रभूणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
त्या म्हणाल्या, "घाबरत का होईना मी रेस्टॉरंटजवळ पोहोचले. प्रवेशद्वारावरच माझं तापमान मोजलं गेलं. आतमध्ये गेल्यावर एक टेबल दुसऱ्या टेबलापासून बऱ्याच अंतरावर ठेवलं होतं. म्हणजे साधारण दहा टेबलांपैकी पाच टेबल होते. आजूबाजूला मास्क लावलेले, हँडग्लोव्ह्ज घातलेले वेटर्स उभे होते."
"कोरोनानंतर सगळं काही बदललंय हा विचार मनात सुरूच होता, तेवढ्यात गरम पाण्यातून काढलेली प्लेट समोर आली. ती स्वच्छ करून त्यात नाष्टा वाढला. खाऊन झाल्यावर संपूर्ण टेबल, खुर्ची सॅनिटाईज करण्यात आली," मनस्विनी यांनी आपला अनुभव सांगितला.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना एखाद्या पर्यटनस्थळी तर सोडाच पण साधं घरा जवळच्या उद्यानातही जाता येत नाहीय. अशा परिस्थितीत गोव्यातल्या पर्यटनाचे दरवाजे खुले झालेत.
गोव्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी ही माहिती दिलीय. केंद्राच्या गाईडलाईन्सनुसार गोवा सरकारनं 250 हॉटेल मालकांना हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिलीय.
गोव्यात पर्यटनासाठी अटी
गोव्यातलं पर्यटन सुरू करण्यात आलं असलं तरी पर्यटनासाठी येताना काही अटींचं पालन करावं लागणार आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाकडून त्यासंबंधीच्या एसओपी (standard operative parameters) निश्चित करण्यात आल्या आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितलं, "केवळ देशांतर्गत पर्यटन सुरू करण्याची परवानगी आहे. पर्यटकांना गोव्यात येण्यापूर्वीच हॉटेलचं बुकींग करावं लागेल. तसंच येताना गेल्या 48 तासातला कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत असायला हवा. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांची कोरोना टेस्ट सीमेवर केली जाईल. रिपोर्ट येईपर्यंत पर्यटकांना क्वारंटाईनमध्ये रहावं लागेल."
लॉकडॉऊनमुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून गोव्याचं पर्यटन बंद आहे. याचा मोठा आर्थिक फटका गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. काही आठवड्यांपूर्वी गोवा कोरोनामुक्त झाल्याची घोषणाही करण्यात आली पण पुन्हा गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढला.
1 जुलैपर्यंत गोव्यात कोरोनाच्या 716 अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झालाय.
पण गोव्यात पर्यटन सुरू झालं तर बाहेरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढेल अशी भीती स्थानिकांना आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सरकारने हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही. केंद्रीय गृह खात्याची परवानगी घेऊन हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय हे खरे आहे. पण केंद्राच्या एसओपीनुसार परवानगी दिलीय."
गोवा आर्थिक संकटात
पर्यटन आणि खाण उद्योग हे दोन गोव्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे दोन्ही उद्योग पूर्णपणे ठप्प आहेत. याचा मोठा फटका गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बसतोय.
देशातच नव्हे तर जगभरात गोवा हे एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. बारा महिने गोव्यात पर्यटकांची लगबग असते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अगदी परदेशी पर्यटकही गोव्यात येतात. त्यामुळे गोव्याचं अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे.
गोव्याच्या एकूण जीडीपीत 9-11 टक्के योगदान हे पर्यटन क्षेत्राचं आहे. पण यंदा कोरोनाच्या आरोग्य संकटात अडकल्याने गोव्याचा पर्यटनचा सीझन उलटून गेलाय.
"गोव्यात 80-85 टक्के लोकं असिम्प्टोमॅटीक म्हणजेच लक्षणं नसलेले कोरोना रुग्ण आहेत. तसंच आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. पण उद्योगधंदा ठप्प असल्याने गोवा सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. अगदी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही कर्जातून द्यावा लागतोय," गोव्यातील पत्रकार प्रमोद आचार्य यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
फेब्रुवारी आणि मे महिन्यात गोव्यात पर्यटकांची झुंबड उडते. पण यंदा लॉकडॉऊनमुळे सर्वच ठप्प असल्याने व्यापाऱ्यांना कोट्यवधीचं आर्थिक नुकसान झालंय.
"गोवा बंद असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट मालक यांना मोठा फटका बसलाय. वेटर्स, शेफ, मॅनेजर्स अशा अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यात. कमाईच होत नसल्याने सरकारवर व्यपाऱ्यांचा मोठा दबाव आहे," असं मनस्विनी सांगतात.
गेल्या महिन्यात वॉस्कोला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे इथले कामावर जाणारे लोकही घरी बसून आहेत. वॉस्कोमध्ये जवळपास सर्वच घरातून बाहेर कामासाठी जाणारे लोक असल्याने आता या सर्वांसमोर मोठी समस्या निर्माण झालीय. हीच परिस्थिती गोव्यातल्या बहुतांश भागाची आहे.
'पर्यटन सुरू करा पण आमच्या जीवाशी खेळ नको'
गोव्यात सध्या देशातल्या लोकांना पर्यटनासाठी परवानगी देण्यात आलीय. त्यासाठी सध्यातरी 250 हॉटेल्स पर्यटनासाठी वापरता येतील अशा सूचना आहेत. पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे गोव्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल अशीही भीती आहे.
एका बाजूला हॉटेल व्यवसायिक सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत आहेत तर दूसऱ्या बाजूला पर्यटक नियम पाळतील का? याबाबत भीती व्यक्त करण्यात येत आहे.
"लॉकडॉऊनचे नियम पाळून हॉटेल्स सुरू करणं, पर्यटकांना बोलवणं हे धोक्याचे आहे. पर्यटन सुरू करा पण आमचा जीव धोक्यात घालू नका," अशी प्रतिक्रिया गोव्यातील हॉटेल व्यावसायिक अनिल खंवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
पर्यटन ठप्प असल्याने गोव्यातील अर्थव्यव्यवस्थेचा कणा मोडलाय. केवळ पर्यटनाच्या आधारावर पोट भरणाऱ्यांच्या घरी बिकट परिस्थिती आहे. "आम्ही कर्मचाऱ्यांना सध्या घरी बसवलं आहे. शक्य तितका पगार देतो. पण त्यांनाही त्यांचं घर चालवायचं आहे," खंवटे म्हणाले.
तर दुसरीकडे आर्थिकसंकटात अडकलेल्या रेस्टॉरंट मालकांनी आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत. मनस्विनी सांगतात, "गोव्यातल्या काही रेस्टॉरंटबाहेर हॅप्पी हावर्सचा बोर्डही लावला होता. अमूक वेळेत आलात की एका डिशवर दुसरी मोफत अशा प्रकारच्या स्किम्सचे बोर्ड बाहेर दिसले."
महाराष्ट्रातून गोव्यात पर्यटनासाठी जाता येईल का?
समुद्र किनारे, चर्च, वॉटर स्पोर्ट, नाईट लाईफ, खाद्य पदार्थ यासाठी गोवा ओळखलं जातं. तरुणाईला तर गोव्याचं कायम आकर्षण असतं. महाराष्ट्रापासून जवळच असल्याने एकदा नव्हे तर वारंवार जाण्यासाठीही गोव्याला पसंती असते.
गेले चार महिने लॉकडॉऊनमध्ये घरी बसल्यानंतर गोव्यात पर्यटनाला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला गोव्यात जाता येईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेलंच.
या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असं आहे. कारण महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडॉऊन कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना दूरपर्यंत प्रवास करता येणार नाहीय.
तसंच एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. अतिमहत्त्वाचं कारण असल्याशिवाय, ही परवानगी मिळत नाही.
गोव्यात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कोलकाता, कर्नाटक इथून अधिक पर्यटक येतात. पण सध्या डोमेस्टिक फ्लाईट्सवरही मर्यादा असल्याने गोव्यात पर्यटक किती संख्येने येतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)