You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटीलः उद्धव ठाकरेंना 'फेल' करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. उद्धव ठाकरेंना फेल करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे सहकारी पक्षच प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोरोनासंदर्भात सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पुण्यात अर्ध्या तासात चाचणी होते. पण संपूर्ण महाराष्ट्रात ही पद्धत वापरली जात नाही. बाहेरून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळे नियम आहेत. यामध्ये समान धोरण असायला हवं, असं पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या प्रयत्नातून स्थापन झालं होतं. पण त्यांचंसुद्धा आता ऐकलं जात नाही, असंही प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर टीका केली आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला आहे. केंद्रानेही त्यांचं कौतुक केल्याचं शेख यांनी म्हटलं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
2. कोरोनाबाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- टोपे
कोरोना संकटाच्या काळात व्हायरसग्रस्त रुग्णांची अडवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी खासगी पुरवठादारांच्या रुग्णवाहिका आणि गरज पडल्यास त्यांची खासगी वाहनंसुद्धा ताब्यात घेण्यात येईल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयात म्हटलं आहे.
राज्यात कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची टंचाई भासत आहे. शिवाय खासगी रुग्णवाहिकांसाठी जास्त दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीही करण्यात येत होत्या. याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधिग्रहित करून त्यांचा दर निश्चित करून ते रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे.
3. तिथं मॅप बदलले, आपण अॅपवर बंदी घालतोय - जितेंद्र आव्हाड
लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करी जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणाव आहे. दरम्यान, भारताने खासगी माहितीच्या सुरक्षिततेचं कारण देत 59 चिनी अॅपवर बंदी घातली होती. या मुद्द्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तिथं मॅप बदलले जात आहेत आणि आपण इथं अॅपवर बंदी घालत आहोत. हा पोरकटपणा आहे, असं जितेंद्र आव्हाड ट्वीट करून म्हणाले.
आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत. या कराराच्या कलम 2 आणि 14 (सी) - 2 या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
भारताने नुकतेच चीनच्या टीकटॉक, हेलोसह 59 अॅपवर बंदी घातल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
बुधवारी (1 जुलै) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीसुद्धा याप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. या अॅपवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार भारतीय जवानांच्या बलिदानाची वाट पाहत होतं का, असं ते म्हणाले होते.
4. कोरोनिल ही फसवणूक, रामदेव बाबांवर कलम 420 लावा - काँग्रेस
कोव्हिड-19 हा आजार बरा करणारं औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करून जनतेची दिशाभूल, फसवणूक आणि बनवाबनवी केल्याप्रकरणी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण आणि डॉ. बलबीर सिंह तोमर यांच्यासह 6 जणांवर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. कोरोना काळात काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या आजारावर औषध आणल्याचा दावा केला. पण नंतर त्यांनी भूमिका बदलली असली तरी अशा प्रकारे जनतेची फसवणूक करणं गुन्हा आहे, असं ओझा यांनी पत्रात म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
5. उद्यापासून गोवा पर्यटकांसाठी खुलं, 100 दिवसांनंतर पुन्हा गजबजणार
समुद्री पर्यटनासाठी भारतीयांचं आवडतं ठिकाण असणारं गोवा उद्यापासून (3 जुलै) पुन्हा पर्यटकांसाठी खुलं होणार आहे, गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी(1 जुलै) याबाबत घोषणा केली. त्यामुळे तब्बल 100 दिवसांनंतर गोवा पुन्हा गजबजणार आहे.
गोव्याच्या किनारपट्टीचा भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. यासाठी 250 हॉटेलांनी तयारी दर्शवली आहे. पण गोव्यात प्रवेश करण्याआधी 48 तासांत कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे. अन्यथा गोव्यात कोरोना चाचणी करण्यात येईल. पर्यटकांना आधीच हॉटेल बुकींग करावे लागेल. यांसारख्या अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)