जम्मू-काश्मीर: कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातवाचा ‘तो’ व्हायरल फोटो वादात का?

फोटो स्रोत, TWITTER.COM/KASHMIRPOLICE
जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर इथं कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांचा चिमुरडा बचावला. मात्र, या हल्ल्यात त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला.
आजोबांच्या मृतदेहावर बसलेल्या नातवाचा करुण असा फोटो आणि व्हीडिओ बुधवारी (1 जुलै) सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरपासून सोपोर 40 किलोमीटर दूर आहे.
या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हेड काँन्स्टेबल दीप चंद वर्मा यांचाही मृत्यू झाला. काँस्टेबल भोया राजेश, दीपक पाटील आणि निलेश चावडे या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे ही माहिती देण्यात आली. सीआरपीएफच्या 179व्या बटालियनचे हे सैनिक आहेत.
कट्टरतावाद्यांनी सोपोर इथल्या सीआरपीएफच्या तळावर हल्ला केला.
हल्ल्यातून वाचलेल्या त्या चिमुरड्याचे जीव गमावलेल्या आजोबांबरोबरचे अतिशय हृदयद्रावक असे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
आजोबांचा रक्ताने माखलेला मृतदेह फोटोत, व्हीडिओत दिसतो. चिमुरड्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवते आहे. पोलिसांनी त्या लहानग्याला घटनास्थळावरून बाजूला केलं तेव्हाही तो चिमुरडा घाबरलेलाच होता. पोलिसांच्या गाडीत तो चिमुरडा रडतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.
त्या मुलाला सुरक्षितपणे नेण्यात आल्याचे फोटो पोलिसांनी ट्वीट केले आहेत. या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीचं नाव बशीर अहमद असं आहे.
बशीर यांच्या कुटुंबीयांचे आरोप
बशीर अहमद श्रीनगरचे होते. 65 वर्षांच्या बशीर यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षा यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत.
'त्यांना थांबवण्यात आलं आणि गाडीमधून बाहेर या, असं सांगण्यात आलं. त्यानंतर सीआरपीएफच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला,' असं बशीर यांच्या पत्नीने बीबीसीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, MOHAMMAD ABU BAKER
कुटुंबातील अन्य सदस्यांनी म्हटलं, की हा प्रसंग जिथे घडला तिथल्या स्थानिकांशी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला माहिती दिली. जर ते गाडी चालवत होते, तर त्यांना गाडीतच गोळी लागली असती. पण त्यांचा मृतदेह गाडीपासून दूर कसा आढळला.
आम्ही तीन वर्षांच्या मुलाला दहशतवादी हल्ल्यातून वाचवलं असं जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
"त्या मुलाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं. दहशतवादी आमच्यावर गोळीबार करत होते. तो लहान मुलगा आपल्या आजोबांसह हंडवाराला जात होता," असं सोपोरचे एसएचओ अझीम खान यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
मृत्यूमुखी पडलेल्या बशीर यांच्या पत्नीने मात्र सुरक्षा यंत्रणेवर आरोप करताना म्हटलं, "सुरक्षा दलांनीच मुलाला मृतदेहाजवळ बसवलं, जेणेकरून फोटो घेता येईल."
सीआरपीएफने फेटाळले आरोप
सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक झुल्फिकार अली यांनी बीबीसीशी बोलताना बशीर यांच्या पत्नीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
"मी आणि महासंचालक घटनास्थळावरून परतलो आहोत. आम्ही घटनास्थळाची काळजीपूर्वक पाहणी केली. सगळे आरोप खोटे आहेत. कट्टरतावाद्यांनी सकाळच्या प्रार्थनेनंतर मशिदीचा ताबा घेतला. सीआरपीएफचे सैनिक घटनास्थळी पोहोचले. कट्टरतावाद्यांनी आमच्यावर गोळीबार केला. मृत बशीर वाहनातून जात होते. अंदाधुंद गोळीबारात ते सापडले," असं अली यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, BILALBAHADUR/BBC
कट्टरतावाद्यांनी हल्ला केला तेव्हा त्यांची गाडी तिथून जात होती. कट्टरतावाद्यांच्या गोळीने त्यांच्या शरीराचा वेध घेतला. सीआरपीएफने त्यांचा मृतदेह कुठेही ओढत नेला नाही किंवा सीआरपीएफच्या सैनिकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केलेला नाही.
बशीर अचानक झालेल्या गोळीबारामुळे घाबरले असावेत, म्हणून गाडी थांबवून ते सुरक्षित स्थळी कसं जाता येईल यासाठी प्रयत्न करत असावेत. त्याचवेळी कट्टरतावाद्यांच्या गोळीने त्यांचा वेध घेतला.
घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर असलेली माणसं बशीर यांना सीआरपीएफने मारलं अशा संदर्भहीन बातम्या देत आहेत, असं अली यांनी सांगितलं.
'जम्मू अँड काश्मीर अपनी पार्टी'ने बशीर यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
बशीर यांचे कुटुंबीय जे म्हणत आहेत, घटनास्थळाची दृश्यं आणि परिस्थिती यावरून बशीर यांना मारण्यात आलं आहे. सरकारने याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करायला हवी. कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात सर्वसामान्य माणसाचा मृत्यू कसा झाला हे सरकारने स्पष्ट करावं, असं या पक्षातर्फे काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी कट्टरतावाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या बीजबेहारा भागातील तळावर केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाच्या मुलाला गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यात त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात सीआरपीएफच्या सैनिकाचाही मृत्यू झाला होता.
कट्टरतावाद्यांनी गेल्या दोन महिन्यात मशिदीचा गैरवापर करत हल्ला केल्याचं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. मशिदीचा कुणी गैरवापर करू नये यादृष्टीने सावधानता बाळगण्याचं आवाहन त्यांनी मशीद कमिटीला केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























