कोरोनाने 100 दिवसात शिकवल्या 'या' गोष्टी #CoronaPodcast

फोटो स्रोत, Getty Images
आपण सर्वच जण कोरोनाच्या दहशतीत जगतोय. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनं काळजात धस्स होतंय. अनेकांनी आपली जीवलग माणसं गमावली. अनेकांचे जीवलग कोरोनाशी झुंज देत आहेत.
मात्र या भयाण आणि तणावपूर्ण वातावरणातही अनेकांनी काही गोष्टी नव्या शिकल्या, तर काहींनी त्याच गोष्टी नव्याने शिकल्या. आपल्याला काही नव्या सवयी जडल्या, तर काही सवयी लावून घ्याव्या लागल्या. कोरोनानं सकारात्मक आणि नकारात्मक अंगानं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड बदल घडवले.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आलं. या आरोग्य संकटाची माहिती देण्यासाठी बीबीसी मराठीनं रोज रात्री 8.15 वाजता फेसबुक पेजवरून 'कोरोना पॉडकास्ट'ची सुरुवात केली. बीबीसी मराठीच्या या उपक्रमाला 27 जून रोजी 100 दिवस पूर्ण झाले.

#CoronaPodcastच्या 100व्या दिवसाचं निमित्त साधत बीबीसी मराठीनं वाचक आणि प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. या काळात आपल्या आयुष्यात काय बदल झाले, या आरोग्य संकटांने काय शिकवलं, हे आम्ही विचारलं.
त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. कोरोनाच्या काळात कुणी वाचनावर भर दिला, कुणी कुटुंबाशी एरवीपेक्षा जास्त संवाद साधला, कुणी वेबसीरिज पाहिल्या, कुणी सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेण्ड्समध्ये सहभाग घेतला... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी कधी नव्हे तो स्वत:साठी वेळ देता आला.
बीबीसी मराठीच्या वाचक-प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर तुम्हाला हे अधिक लक्षात येईल. त्यातील निवडक प्रतिक्रिया आम्ही इथे देत आहोत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

मीना म्हसकर: आरोग्यसंपदेचं महत्त्व कळलं. फिंगर फूड म्हणजे तोंडात कोंबणे यापेक्षा जेवणापूर्वी हात धुणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे ही आपल्या संस्कृतीची योग्यता लक्षात आली.
ज्ञानदीप पाटील मानकर: कोरोनामुळे स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि किती बारीक-सारीक सवयींद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो, हे कळलं. शिवाय, आपली माणसं, कुटुंब, खेडयातील जीवन किती सुंदर असतं, हेही सर्व कोरोनानं शिकवलं.

फोटो स्रोत, Getty Images
श्वेता मोरे-सावंत यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलाय. त्या म्हणतात, "कोरोनानं तीन गोष्टी शिकवल्या. पहिली म्हणजे, कठीण परिस्थितीत जगायला शिकवलं. आपल्या गरजा किती कमी असतात ते नव्याने शिकवलं. दुसरी म्हणजे, नुसतं पळत राहण्यापेक्षा थांबून सुख शोधायला शिकवलं. आणि तिसरी म्हणजे, निसर्गाचा आदर करायला शिकवलं."
प्रिया मुंशी यांनी कोरोनातला अनुभव सांगताना 'कोरोना पॉडकास्ट'बद्दलही भरभरून लिहिलंय. त्या म्हणतात, "कोरोनाने कुटुंबाचं महत्त्व दाखवून दिलं. आपण पैशाच्या मागे धावत होतो. पण या काळात लोक जवळ आले."
कोरोना पॉडकास्टबद्दल प्रिया मुंशी म्हणतात, "100 पॉडकास्ट सलग पाहिले. सर्व पॉडकास्टवेळी कमेंटही केल्या. तुम्ही उत्तमपणे जनजागृती करताय आणि उपयुक्त माहिती देताय. मी अहमदाबादमध्ये राहते, त्यामुळे हे पॉडकास्ट पाहून महाराष्ट्राशी जोडली जाते."
सिद्धार्थ कसबे यांनी कोरोनायोद्ध्यांचं महत्त्व अधोरेखित केलंय. ते म्हणतात, "या कोरोनामुळे फक्त पैसाच महत्त्वाचा नसून माणुसकीही तेवढीच महत्त्वाची आहे, हे समजलं. शिवाय, कोरोना झाल्याचं समजल्यावर आपले म्हणणारे किती आहेत हेही समजलं. कुणी कुणाचं नसतं याचा प्रत्यय आला. पोलीस, डॉक्टर यांच्यासोबत सफाई कर्मचारी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत.

"कोणतेही संकट येऊ राजकारण करणारे कधीही बदलत नाही ते त्यांचं राजकारण चालूच ठेवतात. सरकारी दवाखान्याची स्थिती अत्यंत वाईट असून त्या सुधरायला हव्यात. निसर्गाला मानवाची गरज नसून मानवाला निसर्गाची गरज आहे. मानव काही काळ नसल्याने निसर्ग शुद्ध झाला," अशी निरीक्षणंही सिद्धार्थ कसबे यांनी मांडली.
रश्मी नाईक म्हणतात, "जिवंत राहणे हीच प्राथमिकता आहे, हे या कोरोनाने शिकवलं. गेल्या 40 वर्षातला प्रदूषणाचा नीचांक भारताने गाठला आहे. लॉकडाऊनमध्ये एका टोकाला बेफिकिरी तर दुसऱ्या टोकाला भीती असे चित्र दिसले. या कोरोनाच्या निमित्ताने का होईना, पण एकूण आरोग्यासाठी असलेले बजेट GDP च्या 1.6% म्हणजे खूपच कमी आहे याची जाणीव आपल्याला झाली आहे"

फोटो स्रोत, Getty Images
सज्जन यादव : "कोरोनाच्या भयंकर काळाने खूप शिकवलं. भौतिक आणि चंगळवादी सुख निसर्गापुढे खूप क्षुल्लक आहेत. आयुष्याचे नवीन पदर याच काळात उलगडले. सुख म्हणजे नक्की काय असतं? याचं नेमकं आकलन झालं. कुटुंबासोबतचा रोजचा संवाद हा कोणत्याही सुखाच्या व्याख्येत बसवता नाही येणार."
शांताराम राजे यांनी एका ओळीची प्रतिक्रिया लिहिलीय खरी, पण तिचा अर्थ मोठा आहे. शांताराम राजे म्हणतात, "कोरोनानं लहान-मोठा, गरीब-श्रीमंत हे भेदभाव संपवले. आपण मनुष्य आहोत हे बिंबवले."
सविता राऊत यांनी तर बीबीसी मराठीला पाठवलेल्या प्रतिक्रियेत कविता लिहिलीय:
कोरोनाने दाखवून दिली माणसाला मर्यादा
दाखवून दिली निसर्गाची ताकद
दाखवून दिला कौटुंबिक जिव्हाळा आणि माणसाला माणसाची किंमत
पुसून टाकला भेद, मग तो गरीब असो की श्रीमंत
अगोदर प्राणी होते पिंजऱ्यात आणि माणसे रस्त्यात
आता प्राणी रस्त्यावर आणि माणसे घरात
प्रत्येकाला कस लागतोय जीवन जगण्यात
आता तरी अग्रेसर होऊ निसर्गाचा समतोल राखण्यात
शशीकांत आढाव म्हणतात, "कोरोनाच्या काळात कोणत्याही धर्माचा देव, बाबा, बुवा कामाला आला नाही. निसर्ग हाच खरा धर्म, हाच खरा देव हे माणसानं लक्षात ठेवावं. निसर्गाची पूजा करावी. त्याचा मान-सन्मान करावा आणि दुसरं आपण कोणत्याही डॉक्टर हॉस्पिटल, वैद्य यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून रहाता कामा नये. आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपली रोगप्रतिकारक शक्ती हीच आपली खरी ताकद आहे. तिला बळकटी द्यावी."
अश्विन विश्वनाथ राऊत : "कोरोनामुळे समाजामध्यमे कुठल्याही रोगाबद्दल शिक्षित आणि अशिक्षित लोकांमध्ये किती अज्ञान असतं ते कळलं. ते दूर करण्यासाठी आपण चांगलं ऐकावं, पाहावं असं खूपच कमी लोकांना वाटतं.
"सुदैवाने BBC मराठीसारखी खूप कमी प्रसारमाध्यमं आज आहेत, जे चांगली आणि योग्य माहिती बातम्यांच्या रूपाने लोकांपर्यंत पोहचवत आहेत. आज करोनाने रूपाने संपूर्ण देशाला आपण अत्यावश्यक सेवेत कुठे आहोत आणि कशाला महत्त्व द्यायला हवं याचा आरसा दाखवला आहे. आपल्या या पॉडकास्टने खूप चांगली माहिती सर्वांना मिळाली आहे त्यासाठी आपलं अभिनंदन!"

फोटो स्रोत, Getty Images
'आम्हाला नवी सुरुवात करू दे...'
पुण्यातील अमर काटकर यांची प्रतिक्रिया सध्याच्या एकूणच वातावरणावर मार्मिक आणि बोलकी आहे.
"आपण थोडं तंत्रज्ञान अवगत केलं आणि या पृथ्वीचे बादशाह समजू लागलो. पण आपण निसर्गसमोर क्षुल्लक आहोत, हेच सत्य आहे. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू अख्ख्या मानवजातीचा विध्वंस करू शकतो. आपल्या दृष्टीने ही एक महामारी असू शकते. पण निसर्गाच्या दृष्टीने हा विषाणू जणू कचरा साफ करण्यासाठी सोडलेला एजंट होता," असं अमर काटकर म्हणतात.
केवळ चिंता व्यक्त करून न थांबता ते पुढे म्हणतात, कोरोनातून मी तर हे शिकलो की, माणूस निसर्गाचा नाही, तर निसर्ग माणसाचा स्वामी आहे. थँक्स कोरोना, पण आता आम्हाला धडा मिळालाय. त्यामुळं आता कृपा करून तू आमचा निरोप घे....आम्हाला नवी सरूवात करू दे"
अमर काटकर यांच्या म्हणण्याशी तुम्ही-आम्ही बरेचजण कमी-अधिक प्रमाणत सहमत असूच... असो.
आणि हो, 'कोरोना पॉडकास्ट'मधील 'कोरोना' शब्द काढून केवळ 'पॉडकास्ट' सुरू ठेवण्याची वेळ येवो, असं आम्हालाही वाटतं. मात्र तोपर्यंत यापुढे सोमवार ते शनिवार 'कोरोना पॉडकास्ट' सुरू राहील.तर या आमच्या फेसबुक पेजवर.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























