कोरोना व्हायरस : सीए परीक्षा देणाऱ्यांना ICAI च्या Opt Out नियमामुळे दिलासा

परीक्षार्थी

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र
    • Author, तेजाली शहासने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

लॉकडाऊनमुळे लायब्ररी बंद, घर लहान, सर्वजण घरातच, त्यातच घर रेड झोनमधे. आठवडाभर संपूर्ण कुटूंब हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन झालेलं. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास नीट झालाच नाही. अशा वेळी अटेंप्ट वाया जाईल की काय? मग पुढे करियरची चिंता, आर्टिकलशिपचं काय होईल असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत वैभवला.

तर प्रतिकचा अभ्यास झालाय, परीक्षा देऊन उरलेली आर्टिकलशिप त्याला वेळेत संपवायची आहे. लवकर सीए बनून कॉर्पोरेटमध्ये उत्तम करियर करण्याचं स्वप्न प्रतिक पाहतोय. अभ्यास तर झालाय. परीक्षा रद्द झाली तर केलेला अभ्यास वाया जाईल. त्याहूनही गेलेला वेळ ही त्याची खंत आहे. त्यामुळे परीक्षा द्यायलाच हवी असं त्याचं मन सांगतंय.

सीएची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधले हे दोन प्रतिनिधी. दोघेही आपापल्या जागी बरोबर; आणि मे महिन्यापासून ICAI परीक्षेबद्दल काय निर्णय घेईल याच्या प्रतीक्षेत.

औरंगाबादचे वैभव आणि प्रतिक दोघे सीए फायनलला आहेत. दोन्ही मित्र मे महिन्यात CA फायनलची परीक्षा देणार होते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे परीक्षा पुढे गेली. आता ICAIने 29 जुलै2020 रोजी सीएच्या परीक्षा सुरू होणारच असं जाहीर केलंय.

ICAI या CAची परीक्षा घेणाऱ्या संस्थेने 15 जून 2020ला एक पत्रक काढलं. "29 जुलै 2020 ला CAची परीक्षा सुरू होणारच. या कोरोनाच्या काळात एकाही विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची इच्छा असेल तर आम्ही त्यासाठी बांधील आहोत. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता आणि त्यांना होणारे कष्ट कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना 'Opt Out' चा पर्याय देत आहोत" असे यात म्हटले आहे.

"यासाठीची मुदत 27 जून 2020पर्यंत आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. Opt Out केल्यास त्यांना ही परीक्षा न देता सरळ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येईल. परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. आधीचे परीक्षा शुल्क यात वळते केले जाईल. तसेच हा (जुलै 2020चा) प्रयत्न(attempt) गणला जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्याचे केंद्र बदलून घेण्याची सुविधाही आम्ही देत आहोत." असंही या पत्रकात म्हटलंय. याबद्दलची अधिक माहिती इथं क्लिक करून मिळवता येईल.

विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे?

"माझ्यासाठी ICAI ने दिलेलं हे मागच्या 4 महिन्यांतील सगळ्यात चांगलं नोटिफिकेशन!" असं वैभव म्हणाला.

कोरोना
लाईन

"आमच्या बिल्डिंग मध्ये 9 कोव्हिड पेशंट सापडल्यामुळे सगळ्यांच्या मनात अत्यंत भीतीचे वातावरण आहे. अशी भयावह वेळ पुन्हा माझ्या घरच्यांवर माझ्यामुळे येऊ नये आणि मुख्य म्हणजे माझा अभ्यास नाही, तसेच हा अटेंप्ट मोजला जाणार नाही. म्हणून सर्व बाजूने खूप विचार करून, ICAI ने दिलेली Opt Out ची संधी मी सोडली नाही." असं त्याने बीबीसी मराठीला सांगितलं.

पुढे तो म्हणाला, "पण असे सुद्धा बरेच मित्र आहेत ज्यांना आपल्यामुळे आपल्या घरच्या व्यक्तींना त्रास होऊ नये असं वाटतंय किंवा, त्यांचा सुद्धा अशाच कारणांमुळे अभ्यास झालेला नाही.

पण ते "काय म्हणतील माझे मित्र, ऑफिस कलिग्स! काय म्हणतील लोक!" असा विचार करून Opt Out न करता "पुढे जे होईल ते बघू, नाहीतरी परीक्षा होणारच नाही आपली इतके कोविड पेशंट्स तर वाढतायत!" म्हणून ICAI च्या परीक्षा रद्द होण्याच्या नोटिफिकेशनची वाट बघत आहेत(मी सुद्धा ह्यातलाच एक). म्हणूनच एका दृष्टीने इन्स्टिट्यूटने स्वतः काही निर्णय न घेता विद्यार्थ्यांवर सोडून दिलेला हा अत्यंत विदारक पर्याय आहे असं मला वाटतं."

सीए नोटिफिकेशन

फोटो स्रोत, ICAI

प्रतिकचं म्हणणं थोडं वेगळं आहे. तो म्हणाला, "ICAI ने माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. औरंगाबादमधे जवळपास सर्वच कॉलेजेस क्वारंटाईन सेंटर्स केले आहेत. मग परीक्षा घेणार कुठे? रेडझोन मधल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? मी ऐकलंय की जुलैचा रिझल्ट लवकर जाहीर करतील, जेणेकरून नोव्हेंबरमध्ये परीक्षा वेळेवर घेता येईल. पण माझे दुसऱ्या ग्रुपचे क्लासेस पण बाकी आहेत. रिझल्ट निगेटिव्ह आला तर परत सगळ्या अभ्यासाला वेळ कसा पुरेल?

इन्स्टीट्यूटने योग्य निर्णय घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. मला चिंता परीक्षेची नाही, त्यानंतर च्या परिस्थितीची आहे. माझा अभ्यास झालाय. काही झालं तरी परीक्षा द्यायचीच, या तयारीत मी होतो. इथे औरंगाबादमध्ये कोरोनामुळे अनेकांच्या अभ्यासात अडचणी आल्यात. माझ्या काही मित्रांनी opt out केलंय. पण मी परीक्षा देणार आहे."

परीक्षेची तारीख नक्की झाली तरी कोरोनाकाळात ही परीक्षा कशी पार पडेल, सोशल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाईल, याचीही काळजी विद्यार्थ्यांना आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय, ऑनलाईन परीक्षेची शक्यता याबद्दलही अनेकांना प्रश्न आहेत. परीक्षाच रद्द करावी असंही मत अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केलं होतं. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही ICAI (WIRC)च्या पुणे शाखेचे चेअरमन CA. अभिषेक धामणे यांच्याशी बोललो.

परीक्षा घेण्याचा निर्णय कसा घेण्यात आला?

"इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडीया (ICAI) ही संस्था सीएच्या परीक्षांचं नियमन करते. मध्यवर्ती, प्रांतिक आणि शाखापातळीवर तिचं काम चालतं. या शाखांचे सदस्य सतत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्याच्या संपर्कात असतात.

ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्याचं मत जाणून घेतात. भारतभरातून आणि भारताबाहेरील इतर शाखांकडून आलेल्या अभिप्रायानंतरच, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे." असं ते म्हणाले. या संदर्भात ऑनलाईन परीक्षेची काही शक्यता आहे का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "सीए रेग्युलेशन्समध्ये प्रत्यक्ष लेखी परीक्षा घ्यावी अशी तरतूद आहे, ऑनलाईन परीक्षेची तरतूद त्यात नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेता येणार नाही."

प्रतिक वाघमारे

फोटो स्रोत, Pratik waghmare

फोटो कॅप्शन, प्रतिक वाघमारे

पुढे ते म्हणाले, "विविध ठिकाणचे कंटेन्मेंट झोन्स, कोरोनाच्या साथीचा प्रसार, अभ्यासासाठी प्रतिकूल परिस्थिती अशा विविध कारणांमुळे परीक्षा देता न येणाऱ्यांना योग्य न्याय मिळावा, त्यासोबतच ज्यांना परीक्षा द्यायची मनापासून इच्छा आहे त्यांनाही संधी मिळावी या हेतूने Opt outची सुविधा संस्थेने दिलेली आहे.

Opt out साठी शेवटची तारीख 27 जून 2020 ही आहे. या संदर्भात संस्थेने तपशीलवार माहिती सांगणारे FAQ प्रसिद्ध केलेले आहेत. याची लिंक इथं आहे. यात विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे"

परीक्षेची व्यवस्था कशी असेल?

संस्थेच्या पत्रकात म्हटलंय की जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. तेव्हाच्या MHA च्या गाईडलाइन्स, राज्य व केद्रशासानाचे आदेश यांचा विचार करून ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

त्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय हा पूर्णपणे त्या त्या विभागातील प्रशासनाच्या मार्गदर्शिकेवर अवलंबून असेल. यामुळे एखादे केंद्र बाधित झाले तर त्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये परीक्षा देण्याची संधी असेल.

याबद्दल CA.अभिषेक धामणे म्हणाले, "एक जुलैपर्यंत विद्यार्थ्याची सर्व माहिती आणि नक्की संख्या लक्षात आल्यावर विभागवार छाननी करून पुरेशा प्रमाणात व्यवस्था केली जाईल. ही व्यवस्था करताना परीक्षाकेंद्रावरील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कंटेन्मेंट झोन्स, जास्तीची परीक्षा केंद्रे, ऐन वेळी कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यास बदली परीक्षा केंद्र इ. मुद्दे ध्यानात घेऊन योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी ICAI सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे."

"जोपर्यंत 'याउलट सांगणारं' काही परिपत्रक संस्थेकडून प्रसिद्ध होत नाही तो पर्यंत परीक्षा रद्द होणार नाही, रद्द झालीच तर ती त्या विशिष्ट केंद्रापुरतीच रद्द होईल" असंही ते म्हणाले.

20 जून रोजी संस्थेने आणखी एकहे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. Opt out ची तारीख 20 जून होती, ती वाढवून आता 27 जून करण्यात आली आहे. सीएस आणि सीएमएच्या संस्थांनीही (ICSI आणि ICMAI) परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलंय. सीएसच्या परीक्षा आता 18 ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान आणि सीएमएच्या परीक्षा 1 ते 10 सप्टेंबर या काळात होतील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)