कृषिमंत्र्यांनाच खत मिळेना, औरंगाबादमध्ये दादा भुसेंचं स्टिंग ऑपरेशन : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Dadaji Bhuse
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1) औरंगाबादमध्ये कृषिमंत्र्यांनाच मिळेना खत
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बनून रविवारी औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन खत मागितलं. पण खताचा साठा असतानाही नवभारत फर्टीलायझर्स या कृषी सेवा केंद्रानं नकार दिला. त्यानंतर दादा भुसेंनी स्वत:ची खरी ओळख सांगितल्यानंतर या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. 'सकाळ'नं ही बातमी दिलीय.
खरीप हंगामात बियाणं आणि खतांची अवाजवी भावात विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी मंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वत: कृषी सेवा केंद्रात जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
औरंगाबादमधील या कृषी सेवा केंद्रातील प्रकार उघडकीस आल्यानंतर दादा भुसे यांनी कृषी सचिवांना फोन करून, गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.
कुणीही शेतकऱ्यांना नडाल, तर याद राखा, असा सज्जड दमही दादा भुसे यांनी कृषी सेवा केंद्र आणि कृषी अधिकाऱ्यांना दिला.
2) कोरोना : मृतदेहांची चाचणी होणार नाही
मृतदेहांची कोरोना चाचणी करण्याबाबत अनेक संभ्रम असल्याने, यापुढे केवळ न्यायवैद्यक प्रकरणं वगळता इतर मृतदेहांचे नमुने चाचणीसाठी न घेण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
कोरोना साथीच्या उद्रेकामध्ये केवळ न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन करावं. इतर मृतदेहाची बाह्यतपासणी, रुग्णाची माहिती, इतर आजार, मृत्यूच्या आधीची वैद्यकीय स्थिती यावरूनच मृत्यूचं कारण देण्याचे ICMR च्या मार्गदर्शक तत्वात म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, तरीही मृतदेहाची चाचणी करावी का, याबाबत गोंधळ होता. तो आता राज्य सरकारनं दूर केलाय.
कंटेनमेंट झोनमध्ये कुणाचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चाचणीचा अहवाल येईपर्यंत ताटकळत बसावं लागत होतं. आता न्यायवैद्यक प्रकरणे वगळता इतर मृतांची कोरोना चाचणी न करण्याच्या आदेशाचं पत्रक काढण्यात आलाय.
3) रेमडिसिव्हर इंजेक्शन 30 जूननंतर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार - टोपे
कोरोनावरील उपचारात महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनला ICMR नं परवानगी दिल्यानंतर, आता हे इंजेक्शन 30 जूननंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिलं जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टीव्ही 9 मराठीने ही बातमी प्रकाशित केलीय.

फोटो स्रोत, Getty Images
"कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हर आणि फेविपिरावीर हे दोन्ही ड्रग्स एका ठराविक दरात उपलब्ध करून देऊ, अशी विनंती केंद्र सरकारकडे करणार आहे. तसंच गरज पडल्यास राज्य शासन खरेदी करून त्याचा वापर करेल," असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढही लक्षणीयरित्या होताना दिसतेय. रविवारी तब्बल 3870 नवे रुग्ण सापडले आणि एकूण रुग्णसंख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचलीय.
4) चीननं आगळीक केल्यास लष्काराला कारवाईचं स्वातंत्र्य - संरक्षणमंत्री
चीननं कोणतीही आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देण्याचं स्वातंत्र्य लष्कराला असल्याचं भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
गलवान खोऱ्यातील भारत-चीन सैन्यातील झटापटीच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख आर.के.एस. भदोरिया उपस्थित होते.

फोटो स्रोत, Twitter/@rajnathsingh
दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाच्या जर्मनीवरील विजयास 75 वर्षं पूर्ण होत असल्याने मॉस्कोत होणाऱ्या भव्य लष्करी कवायतींना उपस्थित राहण्यासाठी रशियाला रवाना होण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला.
5) दिल्लीत कट्टरवादी घुसण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा सतर्क
दिल्लीतील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आलीय. दिल्लीत बस, कार किंवा टॅक्सीच्या माध्यमातून कट्टरवादी घुसणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना दिलीय. त्यानंतर सुरक्षेबाबत बंदोबस्त वाढवण्यात आलाय. इंडिया टुडेनं ही बातमी दिली.
चार किंवा पाच जण दिल्लीत कट्टरवादी हल्ला करण्याच्या हेतूने घुसण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलीय.
दिल्लीच्या सर्व सीमांवर विशेष पथक नजर ठेवून असेल. तसंच, मार्केट, हॉस्पिटल अशा भागातही बंदोबस्त वाढण्यात येणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























