भारत-चीन तणाव - लेह आणि लडाखमधल्या परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट

- Author, आमीर पीरजादा
- Role, बीबीसी न्यूज, लेह
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
हिमालयाच्या सावलीत वसलेल्या लडाखमधील लेह शहरात विचित्र शांतता जाणवतीये. गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर लडाखमधील नागरिकांमध्ये एक अनिश्चिततेची भावना निर्माण झालीये.
वर्षाच्या या काळात एरवी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांनी गजबजणाऱ्या रस्त्यांवर आता तुरळक लोकच पाहायला मिळतात. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यंदा पर्यटकच नव्हते.

- वाचा- कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

लेह हा लोकसंख्येची घनता कमी असलेला प्रदेश आहे. इथे प्रतिचौरस किलोमीटर 3 व्यक्ती अशी इथली लोकसंख्येची घनता आहे. पण 21 जूनपर्यंत इथे कोरोनाचे 212 रुग्ण आढळले होते.
कोरोनाच्या या चिंतेत लडाखमध्ये भारत-चीनदरम्यान झालेल्या चकमकीमुळे अजूनच भर पडली आहे.
गुरुवारी (18 जून) लडाख बुद्धिस्ट असोसिएशनच्या एका गटानं लेहमध्ये एका मार्चचं आयोजन केलं होतं. प्रत्यक्ष ताबारेषेवर (LAC) मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. पण कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना थांबविण्यात आलं.
गलवान खोरं आणि पँन्गॉगच्या परिसरात जाणारे रस्ते बाहेरच्या लोकांसाठी, ज्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे, बंद करण्यात आले आहेत.
लेहमधील अधिकाऱ्यांच्या मते हालचालींवरील हे निर्बंध कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लादण्यात आले आहेत. मात्र लेह भाजपचे अध्यक्ष डोरजेय आंगचुक यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, की कोणतीही माहिती शक्यतांच्या आधारे लोकांपर्यंत पोहचू नये, यासाठी माध्यमांवर इथे बंधनं घालण्यात आली आहेत.
लेहपासून गलवान खोरं अवघ्या 160 मैल अंतरावर आहे, पण तरीही लेहमधल्या स्थानिकांना इथली नेमकी परिस्थिती काय आहे, याची कल्पना नाहीये.
प्रत्यक्ष ताबारेषेच्या भारतीय बाजूकडील संपर्काची साधनं गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहेत.
मोदींच्या वक्तव्यानंतर संभ्रम आणि संताप
'आपल्या भूभागात कोणतीही घुसखोरी झाली नाहीये,' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर लडाख आणि देशातील इतर भागातही संभ्रम निर्माण झाला.
नामग्याल डरबोक हे डरबोकचे माजी काऊन्सिलर आहेत. हा भाग गलवान खोऱ्याला लागूनच आहे. पंधरा दिवसांपूर्वीच ते आपल्या गावाकडून लेहला परतले होते. त्यांनी म्हटलं, "जर त्यांनी (चीनने) आपल्या प्रदेशात घुसखोरीच केली नाही, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात का करण्यात आलंय?"

त्यांनी पुढे म्हटलं, "पंतप्रधान भलेही घुसखोरी झाली नाही, असं म्हणत असतील. पण आम्हाला घुसखोरी झालीये हे कळतंय. आम्ही गलवान खोऱ्यातील कुरणांपैकी एका भागात आमच्या घोड्यांना चरायला सोडायचो. पण तो भाग आता चीनच्या नियंत्रणाखाली आहे. मग याचा अर्थ काय?"
लेह भाजपचे अध्यक्ष आंगचुक यांनी म्हटलं, "प्रत्यक्ष ताबारेषेच्या आपापल्या भागात दोन्ही देशाचे सैनिक गस्त घालताना दिसतात. पण LAC च्या इथं अचूक सीमांकन नसल्यामुळे कधीकधी दोन्ही देशाच्या सैनिकांकडून सीमारेषा ओलांडली जाते. अशावेळी जेव्हा सैनिक आमनेसामने येतात, तेव्हा LAC वर झटापटी होतात. पण चिनी सैन्यानं आपल्या भूभागात घुसखोरी केली नाही."
कर्नल सोनम वांगचुक (निवृत्त) 1999 साली पाकिस्तानविरोधात झालेल्या कारगील युद्धात सहभागी झाले होते. त्यांनी सांगितलं, "गलवानमध्ये आपण आपले 20 सैनिक गमावले. याचाच अर्थ काहीतरी वादाचा मुद्दा उपस्थित झालाच असणार, नाहीतर तुम्ही तुमचे सैनिक का गमवाल? तुम्ही त्यांच्या भूभागात घुसखोरी केली नाही किंवा त्यांनी तुमच्या भूभागात केली नाही, तर मग ही झटापट कशामुळे झाली?"
पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर संताप आणि संभ्रम निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
त्यामध्ये म्हटलं होतं- सर्वपक्षीय बैठकीत माहिती देण्यात आली की,"चिनी सैन्य LAC च्या प्रदेशात आल्यामुळे भारतीय लष्करानंही त्यांना तसाच प्रतिसाद दिला."
या स्पष्टीकरणामध्ये पुढे म्हटलं आहे, "हे LAC चं उल्लंघन मानलं गेलं. चीनकडून इथं बांधकाम करण्याचे प्रयत्न झाले आणि हटण्यास नकार दिला गेल्यामुळे 15 जूनला गलवान खोऱ्यातला हिंसाचार झाला."
इथल्या स्थानिकांच्या मनात रोजगाराची आणि दळणवणाची साधनं ठप्प होण्याची भीती आहे.

LAC च्या आसपास राहणाऱ्या लोकांची उपजीविका ही पशुपालनावर अवलंबून आहे आणि चीनच्या घुसखोरीमुळे त्यांना त्यांच्या कुरण जमिनी गमावण्याची भीती वाटत आहे.
नामग्याल डरबोक यांनी म्हटलं, "गेल्या अनेक वर्षांपासून चीन आपला भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. चांगथांगमधील पशुपालन करणाऱ्या जमाती सातत्यानं हा विषय प्रशासनासमोर मांडत आहेत. पण आमचं कोणीच ऐकलं नाही. यात आम्हीच भरडले जात आहोत."
इथला प्रत्येक भागाचं प्रतिनिधीत्व लोकनियुक्त काऊन्सिलर करतो आणि या काऊन्सिलच्या सदस्यांना एकत्रितपणे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल, लेह (LAHDC) म्हणून ओळखलं जातं.
या भागातील सर्व विकासकामांची जबाबदारी ही LAHDC कडे आहे.
गलवान आणि पँन्गॉग भागाच्या काऊन्सिलर्सनी लिहिलेल्या एका पत्राची प्रत बीबीसीला मिळाली. हे पत्र लडाखच्या विभागीय आयुक्तांना उद्देशून 19 जूनला लिहिण्यात आलं आहे. या भागातील संपर्काची साधनं पुन्हा सुरू करण्यात यावीत, अशी विनंती या पत्रात करण्यात आलीये.
भारत-चीन सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भागातील दूरसंचार सेवा अचानक ठप्प झाल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

पत्रात पुढे लिहिलं आहे, "गेल्या 20 दिवसांपासून BSNL ची मोबाईल सेवा बंद आहे आणि 17 गावांना 'कम्युनिकेशन ब्लॅक आउट'ला सामोरं जावं लागत आहे.
"कोव्हिड-19 च्या काळात संपर्काची साधनं ही अत्यावश्यक आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसना उपस्थित राहता येत नाहीये," असं काउन्सिलने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आज वीस दिवसांहून अधिक काळ या भागातील संपर्काची साधनं बंद आहेत.
लडाखचे विभागीय आयुक्त सौगत बिस्वास यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "मी हा विषय लष्कराकडे मांडला आहे. ते यावर काम करत आहेत."
त्यांनी पुढे म्हटलं, "सीमाभागात बीएसएनएलकडून सेवा पुरविण्यात येते. पण त्यांची लाइन ही लष्कराच्या ताब्यात असते. त्यामुळे संपर्क यंत्रणा ही माझ्या अखत्यारित येत नाही, पण मी त्यासंबंधी लष्करासोबत चर्चा करत आहे."
एलिहुद जॉर्ज हे 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान भारताकडून लढले होते. ते मूळचे लडाखचे होते.
जॉर्ज यांचा धाकटा मुलगाही सध्या भारतीय लष्करात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग पँन्गॉग भागात आहे. हा भागही भारत-चीनदरम्यानच्या मतभेदाचा एक मुद्दा आहे.
जॉर्ज सांगतात, "भारत-चीन या भागात एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हं निर्माण झाल्यानंतर माझ्या मुलाची नेमणूक इथं करण्यात आली. तेव्हापासून मला त्याच्याशी बोलता आलं नाहीये, कारण इथं संपर्काची साधनंच नाहीयेत."
स्थानिक व्यावसायिक त्सेरिंग नामग्याल यांनी म्हटलं, की त्यांना गलवान खोरं आणि पँन्गॉग लेक भागातील काही गावकऱ्यांना भेटता आलं. हे लोक त्यांच्या गावातून रेशन, काही वस्तू खरेदी करण्यासाठी लेहला आले होते. श्योकपासून डरबोकपर्यंत मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. शस्त्रास्त्रंसुद्धा होती.
उंचावरचं युद्ध
भारतीय युद्ध विमानं ही गेल्या काही दिवसांपासून लेहवरून घिरट्या घालताना दिसत आहेत आणि 20 सैनिकांचा मृत्यू झाल्यापासून या भागातील लष्कराचं दळणवळणही वाढलं आहे.

या भागातील स्थानिक हे कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत आणि आपण लष्करासोबत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे.
"आम्ही लडाखमध्ये अनेकवेळा युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला आहे आणि आपल्या लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही जर गलवान खोऱ्यामध्ये पाहिलं तर माझ्या भागातील 400 ते 500 हमाल आणि मजूर सध्या भारतीय लष्करात कार्यरत आहेत," असं नामग्याल डरबोक यांनी सांगितलं.
1999 साली कारगिल युद्धाच्यावेळेस लडाखमधील नागरिकांनी लष्कराला आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी स्वतःहून मदत केली होती. कारण अनेक लष्करी ठाणी ही पर्वतरांगांमध्ये वसली होती आणि तिथपर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत.
लेहमधील स्थानिक पत्रकार निसार अहमद हे या स्वयंसेवकांच्या गटामध्ये होते.
त्यांनी सांगितलं, "आमचा 25 जणांचा गट होता. आम्ही स्वयंसेवक म्हणून लष्कराला मदत करण्यासाठी गेलो होतो. आम्ही रेशन आणि दारुगोळा घेऊन कारगिल इथल्या उंचावर असलेल्या पोस्टवर जायचो."
"प्रत्येक गावामधून लष्कराला मदत करण्यासाठी लोक गेले होते," असं त्यांनी पुढे सांगितलं.
भारत आणि चीनदरम्यानची LAC नद्या, पर्वतरांगा, स्नोकॅप्समधून जाते. समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवरचा हा प्रदेश आहे.
अशा ठिकाणी लढण्यासाठी विशेष कौशल्यांची आवश्यकता असते. कोणत्याही सैनिकाची या भागात नियुक्ती करण्यापूर्वी त्यांना या उंचावरच्या वातावरणाचा सराव घडवला जातो. वेगवेगळ्या उंचावर तीन टप्प्यामध्ये हा सराव होतो.
एकदा या वातावरणाची सवय झाली, की मग सैनिकांचं महिनाभर एकप्रकारचं इंडक्शन ट्रेनिंग होतं आणि त्यानंतर त्यांची या उंचावरच्या ठाण्यांवर लढण्यासाठी नियुक्ती केली जाते.
अशा उंचावर अनेक चकमकींना सामोरं गेलेले कर्नल सोनम सांगतात, "जर युद्ध हे सपाटीवर खेळलं जात असेल तर रणगाड्यापासून सर्व शस्त्रास्त्रं वापरता येतात. पण जेव्हा पर्वतरांगांमध्ये युद्ध होतं, तेव्हा पायदळाची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्या खालोखाल महत्त्वाचा ठरतो दारुगोळा. युद्धात वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टींवरही इतक्या उंचीवर मर्यादा येतात.
लडाखमध्ये या उंचीवर हवा विरळ असते, वातावरण कोरडं असतं आणि उंचीचा त्रास होण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या तयार असणंही गरजेचं आहे.
कर्नल सोनम यांनी सांगितलं, "इतक्या उंचावर युद्ध लढत असताना तुमची ऊर्जा खूप खर्ची पडते आणि शस्त्रास्त्रांची परिणामकारकताही खालावते. चॉपरची वजन वाहून नेण्याची क्षमताही कमी होत असल्यानं तुम्हाला अतिशय स्पेशाइज्ड साधनसामुग्रीची आवश्यकता असते.
आपण 1962 साली चीनविरुद्धचं युद्ध हरलो, कारण आपल्याकडे पुरेशी शस्त्रास्त्रं आणि मनुष्यबळ नव्हतं, असं इलिहुद जॉर्ज यांनी मला सांगितलं.
त्यांनी पुढं म्हटलं की, 20 भारतीय जवान हे मृत्यूमुखी पडले. मला खरंच खूप वाईट वाटत आहे. आता भारतानं प्रत्युत्तर द्यायला हवं असं मला वाटतंय. नाहीतर चीन पुन्हापुन्हा अशी घुसखोरी करत राहील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























