You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनानंतर मनोरंजन विश्वाचा चेहरामोहरा पालटणार
- Author, वंदना
- Role, टीव्ही संपादक, भारतीय भाषा
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
भारतातल्या टीव्हींवर आता लवकरच पुन्हा एका 'लॉक किया जाए' असा आवाज ऐकू येणार आहे. कारण लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून ते उठवण्यात येण्यादरम्यानच्या काळात 'कौन बनेगा करोडपती' हा शो प्रेक्षकांचं पुन्हा मनोरंजन करायला सज्ज झालाय.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान टेक्नॉलॉजीची मदत घेत सोनीने या शोची तयारी सुरू केली. यावेळी स्पर्धक या टीव्ही चॅनलच्या अॅपद्वारे ऑडिशन देतील आणि सुरुवातीच्या टप्प्यातला इंटरव्ह्यू व्हीडिओ कॉलद्वारे होईल.
याचा प्रोमोही कदाचित तुम्ही पाहिला असेल. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरूनच त्यांच्या कॅमेऱ्याने शूट करून हा प्रोमो पाठवला होता.
फिल्म असो, नाटकं, टीव्ही किंवा संगीत, येत्या काळात मनोरंजनाचं असं नवीन रूप आपल्याला पहायला मिळणार आहे.
डिजिटल आणि ओटीटी (OTT)
एखाद्या सिनेप्रेमीसाठी आवडता हिरो वा हिरोईन किंवा दिग्दर्शकाची फिल्म थिएटरमध्ये जाऊन पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. त्यातही फर्स्ट डे फर्स्ट शो.
पण गेल्या आठवड्यात जेव्हा अमिताभ बच्चन यांचा गुलाबो सिताबो हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमागृहांच्या बाहेर रांग लागली नाही. रात्री 12 वाजता लोकांनी घरबसल्या अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा पाहिला.
मी देखील रात्री 12 वाजता हा सिनेमा पाहून घरबसल्या यावर रिव्ह्यू लिहिला.
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आता चित्रपटगृह पुन्हा कधी सुरू होतील हे सांगता येणार नाही. गुलाबो सिताबोप्रमाणेच इतर अनेक सिनेमे आता ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात येणार आहेत.
लवकरच विद्या बालनचा शकुंतला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल. तर तामिळ - तेलुगु फिल्म पेंग्विन शुक्रवारी अॅमेझॉनवर रिलीज झालाय.
ग्राहकांचा कल समजून त्यानुसार धोरणं आखण्यात येत असून ग्राहकांना घरातच सिनेमाचा चांगला अनुभव घडवण्याचं आपलं उद्दिष्टं असल्याचं अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे भारतासाठीचे कंटेन्ट हेड विजय सुब्रमण्यम सांगतात.
नेटफ्लिक्स पार्टी - दूर असूनही एकत्र
फिल्म्स वा सिनेमा हे भारतातलं कदाचित मनोरंजनासाठीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे.
थिएटरला सगळ्यांनी एकत्र मिळून जाणं, एखाद्या विनोदी सीनवर सगळ्यांसोबत हसणं, उदास करणाऱ्या सीनदरम्यान थिएटरमधल्या अंधारात मूकपणे अश्रू गाळणं... त्या सिनेमागृहात अनेक अनोळखी लोकं एकत्र, एकाच प्रकारच्या भावभावना अनुभवत असतात.
पण कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात चित्रपट तयार करणाऱ्यांनीच नाही तर चित्रपट पाहणाऱ्यांनीही मनोरंजनाची नवी माध्यमं धुंडाळली आहेत.
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे 21 वर्षांची हर्शिता दिल्लीत अडकली.
सिनेमा हॉल्स बंद असल्याने मित्र-मैत्रिणींसोबत जाऊन फिल्म्स पाहणं ती मिस करते. पण आता नेटफ्लिक्स पार्टीच्या माध्यमातून तसंच काहीसं वातावरण तयार करण्याचा हर्शिता प्रयत्न करते.
काही जणांनी एकत्र मिळून एखादा सिनेमा एकाच वेळी, सोबतच पण आपापल्या घरी पाहण्याची सुविधा नेटफ्लिक्स पार्टी देतं. यामुळे विविध ठिकाणी, अगदी विविध शहरांमध्ये असणाऱ्यांनाही एकत्र सिनेमा पहाता येतो. यासोबतच लाईव्ह चॅटचा पर्यायही असतो.
मित्र-मैत्रिणी वा कुटुंबासोबत बसून सिनेमा पाहण्याच्या तोडीचा हा अनुभव नसला तरी अशा नेटफ्लिक्स पार्टीवर सोबत फिल्म पाहिल्याने मित्रमंडळीची उणीव कमी भासत असल्याचं हर्षिता सांगते.
आधी ती मित्रमैत्रिणींच्या सोबत बसून हसायची आणि एखाद्या विनोदी सीनदरम्यान लाईव्ह चॅटमध्ये स्माईली टाकून हसते. दूरवर तिच्या घरी बसेलली तिची मैत्रीणही याला स्माईलीनेच उत्तर देते.
मनोरंजनाचं नवं पर्व
मनोरंजनाच्या नवीन पर्वाची ही सुरुवात असल्याचं गुलाबो सिताबोचे दिग्दर्शक शूजित सरकार म्हणतात.
पण थिएटरमध्ये सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रकारची वातावरण निर्मिती, चर्चा आणि लोकप्रियता निर्माण होते तशी OTT वर रिलीज केल्यावर होईल का, या फिल्मच्या कमाईची गणितं कशी मांडणार, असा सवाल उपस्थित केला जातोय.
हे 'ब्रेव्ह न्यू बॉलिवुड' असल्याचं सिने समीक्षक शुभ्र गुप्तांनी ट्विटरवर म्हटलं होतं. तर येत्या काळात खरंच 'डिजिटल एन्टरटेन्मेंट' मल्टिप्लेक्सचं जगत बदलू शकेल का, असा सवाल समीक्षक नम्रता जोशींनी ट्वीटद्वारे उपस्थित केला होता.
मनोरंजन हा पूर्वी एक 'सामाजिक अनुभव' होता. आता हळूहळू याचं रूपांतर 'खासगी अनुभवात' होतंय. इथे सारं काही तुमच्या मोबाईल वा लॅपटॉपमध्ये कैद आहे. मनोरंजनाचं रूप पालटतंय, पण हे चांगलं की वाईट हे भविष्यातच समजेल.
शूटिंगचे बदलते नियम
भविष्यामध्ये गोष्टी बदलणार हे लक्षात घेऊन चित्रपटगृहांचे मालकही आता स्वतःला सज्ज करत आहेत. कदाचित आता लोक मर्यादित संख्येनेच फिल्म पहायला येऊ शकतील, सिनेमागृहांच्या निर्जंतुकीकरणाची मोठी प्रक्रिया करावी लागेल आणि कदाचित तिकीटं फक्त ऑनलाईनच मिळतील.
कोरोना व्हायरसच्या या काळात टीव्हीशी संबंधित व्यक्तीही आता शूटिंग पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या कामाच्या आणि शूटिंग करण्याच्या पद्धतींमध्येही मोठे बदल पहायला मिळतील.
उदाहरणार्थ - दक्षिण आफ्रिकेत लॉकडाऊनदरम्यान हाईट्स नावाची ऑनलाईन सीरियल चित्रित करण्यात आली. सगळ्या कलाकारांनी आपापले सीन्स घरीच फोनवर सूट केले आणि नंतर ते एडिट करून मालिका तयार करण्यात आली. ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे.
मराठी टेलिव्हिजनध्येही असा प्रयोग करण्यात आला. यामध्ये 'आठशे खिडक्या नऊशे दारं' ही मालिका कलाकारांनी घरी शूट करून नंतर ती एडिट करण्यात आली. सोनी मराठीवर ही मालिका प्रसारित होतेय. तर झी मराठीच्या 'घरात बसले सारे' या नवीन मालिकेसाठी रामदास पाध्ये आणि कुटुंबीयदेखील घरच्या घरी त्यांच्या बोलक्या बाहुल्यांसोबत शूट करत आहेत.
नवीन नियम आणण्याबाबतची चर्चा बॉलिवुडमध्येही सुरू आहे. यानुसार 33% क्रू सदस्यांनाच येऊ दिलं जाईल, अॅक्टर त्यांच्यासोबत लहान टीमच आणू शकतील आणि मेकअप आर्टिस्टना पीपीई किट घालून मेकअप करावा लागेल. रिएलिटी शो असतील पण टाळ्या वाजवायला स्टुडिओत प्रेक्षक नसतील.
अक्षय कुमारने नुकत्याच शूट केलेल्या एका जाहिरातीदरम्यान याची झलक पहायला मिळाली. इथे सेटवर असणाऱ्या सर्वांनी मास्क लावला होता, सॅनिटायजरचा वापर होता होता आणि सगळ्यांचा ताप तपासला जात होता.
मनोरंजनाच्या जुन्या पद्धती
कोरोना व्हायरससारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्यावर मात करणारे नवीन पर्यायही उदयाला येतात. आणि अनेकदा जुने पर्यायही कामी येतात.
उदाहरणार्थ अमेरिकेत लॉकडाऊनमुळे सिनेमा हॉल्स बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्ह इन सिनेमांना मागणी आली.
खुल्यावर बसून सिनेमा पाहण्याची अशी पद्धत भारतामध्ये अनेक दशकं होती.
अमेरिकेत लोक सोशल डिस्टंन्सिंग पाळत आपापल्या कारमधून येऊन थांबतात आणि मग खुल्या मैदानात ही फिल्म दाखवली जाते. गेल्या काही दिवसांत याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
संगीत विश्व
म्युझिक कॉन्सर्ट्स, मैफिली करणाऱ्यांवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला. अनेक कॉन्सर्ट्स रद्द झाले आणि आता पुन्हा ते होतील का, याची खात्री नाही.
मग संगीतप्रेमींसाठी हे जग कसं बदलेल?
चिंतन उपाध्याय हे संगीत विश्वातलं प्रसिद्ध नाव. ते परिक्रमा बँडच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती कलाकार आणि संगीत प्रेमींमध्ये हे नवीन आणि अधिक घट्ट नातं निर्माण होईल अशी आशा त्यांना वाटतेय.
ते म्हणतात, "व्हर्च्युअल रिएलिटीचा वापर करून प्रेक्षकांना घरबसल्या खऱ्याखुऱ्या कॉन्सर्टचा अनुभव देता येईल का यासाठी तांत्रिक पातळीवर प्रयोग होताहेत. पण भारतात असं व्हायला वेळ लागू शकतो."
"दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्या कलाकारांना आपल्या कलेवर काम करायला अधिकचा वेळ मिळतोय. कलाकार आणि रसिक यांच्यामध्ये एक थेट नातं निर्माण होतंय. हे रसिक डिजीटल कॉन्सर्टचा आनंदी घेऊ शकतात. यामध्ये ना कलाकाराला एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं ना रसिकांना."
कलाकारांच्या उत्पन्नाबाबत बोलायचं झालं तर साऊंडक्लाऊड सारख्या प्लॅटफॉर्म्सनी एक सुविधा द्यायला सुरुवात केलीय. यामध्ये कलाकारांना आपल्या प्रोफाईल पेजवर एक बटण लावता येईल. यावर क्लिक करून फॅन्स कलाकारांना थेट मानधन देऊ शकतात.
तर जीओ सावन त्यांच्या फेसबुक पेजवरून कलाकारांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. याच्या ऑडिओ रेकॉर्डिंगपासून होणारं उत्पन्न कलाकारांना देण्यात येणार आहे.
थीम पार्क आणि मास्कमध्ये सेल्फी
मनोरंजनासाठी सिनेमा आणि संगीताशिवाय प्राधान्य असतं ते थीम पार्क्सना. हा पर्याय विशेषतः मुलांना आवडतो.
कोरोना व्हायरसमुळे शांघायमधलं डिस्नेलँड तीन महिने बंद होतं. त्यानंतर मे महिन्यात हे डिस्नेलँड पुन्हा खुलं झालं. यावेळी मात्र फक्त 24,000 लोकांना इथे येऊ दिलं गेलं.
काही महिन्यांनी कदाचित भारतातील थीम पार्क्सही लोकांसाठी खुली होतील. पण चीन प्रमाणेच इथेही सोशल डिस्टंन्सिंग पाळावं लागेल.
या डिस्नेलँडमध्ये लोक मास्क लावून मिकी माऊससोबत सेल्फी क्लिक करतानाचं अनोख दृश्यं पहायला मिळालं. कदाचित हाच मनोरंजनाचा नवीन चेहरा आहे.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
KPMGने कोव्हिड 19वर केलेल्या एका अहवालानुसार टीव्ही, डिजीटल आणि OTT प्लॅटफॉर्मवर या परिस्थितीत मोठा विकास होत असला तरी दुसरीकडे सिनेमाहॉल्स आणि थीम पार्क्स रिकामी पडलेली आहेत.
भारतात कोरोना व्हायरसच्यासोबतच स्थलांतरित मजुरांची एक मानवी समस्यादेखील उद्भवलीय. आरोग्य सेवेची परिस्थितीही वाईट आहे.
अशामध्ये मनोरंजनाबाबत बोलणं कदाचित अनावश्यक वाटू शकतं.
पण हे देखील खरं आहे की जे लोक आपापल्या घरी सुरक्षित आहेत, ज्यांच्याकडे सुविधा आहेत, त्यांच्याकडे जर या लॉकडाऊनदरम्यान फिल्म्स, हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमसारख्या प्लॅटफॉर्म्सचा पर्याय नसता, तर त्यांचा लॉकडाऊन कसा असता?
ब्रिटनचे वादग्रस्त पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याबाबतचा एक किस्सा आहे.
महायुद्धादरम्यान कला क्षेत्राचा निधी कमी करावा असं चर्चिल यांना सांगण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, "जर कलाच उरणार नसेल, तर मग आपण कशासाठी लढतोय?"
म्हणूनच मनोरंजनाचं हे जगत तर टिकेल, पण फक्त त्याचा चेहरामोहरा काहीसा बदलेला असेल.
याच जगात जसं म्हटलं जातं...'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...'
इलस्ट्रेशन्स - निकिता देशपांडे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)