भारत - चीन सीमा तणाव : खिळे लावलेल्या लोखंडी रॉडने चिनी सैनिकांनी केला होता हल्ला

सोशल मीडिया आणि इतरत्र एका हत्याराचा फोटो सध्या शेअर केला जातोय. गलवान खोऱ्यात भारत-चीनमधल्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC)वर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये झालेल्या झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी हे हत्यार वापरलं होतं, असं म्हटलं जातंय.
हे हत्यार म्हणजे खिळे लावलेला लोखंडी रॉड.
भारत-चीन सीमेवर हजर असणाऱ्या भारतीय लष्करातील एका जेष्ठ अधिकाऱ्यानेही बीबीसीला हा फोटो पाठवलाय. याच अवजाराने चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता, असं त्यांनी म्हटलंय.
15-16 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर झालेल्या झटापटीत भारतीय लष्कराच्या एका कर्नलसह 20 जवानांचा मृत्यू झाला होता. चीनचे सैनिकही मारले गेले असल्याचा भारताचा दावा आहे, पण चीनने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
आपल्या सैन्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं चीनने मान्य केलेलं नाही.
दोन्ही देशांदरम्यान आधीपासूनच असणारा ताणाव या घटनेमुळे आणखीन वाढलाय. या दोन्ही देशांनी एकमेकांवर आपल्या भागावर अतिक्रमण करण्याचा आरोप केलाय.
संरक्षण तज्ज्ञ अजय शुक्ला यांनी सगळ्यांत पहिल्यांदा हा फोटो ट्वीट करत म्हटलं होतं - असं हत्यार वापरणं 'क्रूर' आहे.
1996मध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या करारानुसार सीमा भागातला ताण वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारचं अवजार बाळगण्यावर बंदी आहे.
भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांकडे शस्त्रं होती, पण त्यांनी करार पाळत या शस्त्रांचा वापर केला नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भारतात ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर हा फोटो भरपूर शेअर केला जातोय. पण चीन किंवा भारतीय अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
14,000 फूट उंचीवरच्या एका दुर्गम भागामध्ये ही झटापट झाली आणि अनेक जवान इथून वेगाने वाहणाऱ्या गलवान नदीत कोसळल्याचं मीडियात आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय. इथलं तापमान शून्याच्या आसपास आहे.
चार दशकांनंतर चीन सीमेजवळ संघर्षादरम्यान मृत्यू
गलवान खोऱ्याच्या भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतीय आणि चिनी लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला होता. सोमवारच्या घटनेनंतर हा ताण अधिक वाढलाय. 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवरच्या संघर्षात जवानांचा मृत्यू झालाय.
या झटापटीदरम्यान 40 चिनी सैनिक मारले गेल्याचं भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय, पण या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. चीनने याविषयी अद्याप काहीही विधान केलेलं नाही. अनेक भारतीय जवान अजूनही बेपत्ता असल्याचीही चर्चा होती.
पण कोणताही भारतीय जवान बेपत्ता वा चिनी सैन्याच्या ताब्यात नसल्याचं गुरुवारी भारतीय लष्कर आणि नंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजन म्हणाले, "भारतीय सैन्याने दोनदा सरहद्द ओलांडत चिनी सैन्याला चिथावलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. परिणाम दोन्ही बाजूंच्या लष्करादरम्यान सीमेवर गंभीर हिंसक हाणामारी झाली."
गलवान खोऱ्याचा भाग आपल्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा चीनने बुधवारी केला. हा दावा बडेजावाचा आणि पोकळ असल्याचं भारताने म्हटलंय.
चिनीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजान म्हणाले, "गलवान खोऱ्याचा ताबा कायमच चीनकडे होता. भारतीय सैनिकांनी बॉर्डर प्रोटोकॉल आणि कमांडर पातळीवरच्या चर्चेत झालेल्या सहमतीचं गंभीर उल्लंघन केलं."

फोटो स्रोत, EPA
पण चीनचा हा दावा बडेजावाचा आणि पोकळ असल्याचं भारताने म्हटलंय. चीनला यापुढे संघर्ष करायचा नसल्याचंही चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
तर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरूनच चर्चा केली असून ही परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याबाबत एकमत झाल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितलं.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अनुराग श्रीवास्तव म्हणाले, "अशा प्रकारचे हे पोकळ दावे करणं हे झालेल्या एकमताचा विरोधाभास आहेत."
चिनी लष्कराने LACच्या भारताच्या बाजूच्या भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचं भारताच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध रीतीने ही कारवाई करण्यात आली, यामुळे हिंसाचार झाला आणि लोकांचा जीव गेल्याचा आरोप भारताने चीनवर केलाय. याविषयीची दुरुस्ती करणारी पावलं उचलण्यात यावीत असं भारताने चीनला सांगितलंय.
पण नंतर चीनने त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दाखला देत म्हटलं, "चीन पुन्हा एकदा भारताचा निषेध करतो. भारताने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा आणि कोणतीही प्रक्षोभक कारवाई होणं थांबवावं म्हणजे अशी घटना पुन्हा होणार नाही."
खिळे लावलेल्या रॉडने हल्ला करण्याबद्दल चीनची प्रतिक्रिया
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत गुरुवारी रॉयटर्स वृत्तसंस्थेने चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजिआन यांना विचारलं - भारतीय अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की लष्कराचे एक कर्नल आणि इतर सैनिकांवर खिळे लावण्यात आलेल्या लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. यावर तुमचं म्हणणं काय? दुसरा प्रश्न - भारतीय सैनिकांनी चीनने केलेलं बांधकाम तोडल्यानंतर ही हिंसक हाणामारी सुरू झाली की LAC ओलांडल्यावर?
याचं उत्तर देताना चाओ म्हणाले, "या प्रकरणी काय चूक आणि काय बरोबर याविषयी कोणतीही शंका नाही. याची जबाबदारी चीनची नाही. हे प्रकरण कसं सुरू झालं हे आम्ही स्पष्टपणे सांगितलंय. सोमवारी रात्री सीमेवर तैनात असणाऱ्या भारताच्या सुरक्षा दलांनी दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवर झालेल्या एकमताचं उल्लंघन केलं. भारतीय सैनिकांनी लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल ओलांडली आणि जाणीवपूर्व चिनी सैनिकांना चिथावणं सुरू केलं आणि अगदी हल्लाही केला. यानंतर समोरासमोर हाणामारी झाली आणि यातच जीवितहानी झाली. भारताने या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा द्यावी अशी चीनची मागणी आहे. पुन्हा असं होणार नाही, याची काळजी भारताने घ्यावी."
चाओ म्हणाले, "चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेची माहिती आम्ही आधीच जाहीर केलीय. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या झटापटीबाबत शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबत दोन्ही बाजूंचं एकमत आहे."

फोटो स्रोत, MIKE HUTCHINGS
AFP वृत्तसंस्थेने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारलं - भारत सीमेवरच्या सैनिकांमध्ये वाढ करत असल्याचं वाटतंय. उत्तरादाख चीनही असंच करणार का? या सगळ्या वादाबाबत चीनला आणखी काही म्हणायचंय का?
याचं उत्तर देताना चाओ म्हणाले, "भारत - चीन सीमेवरच्या चीनच्या धोरणाबाबत मी याआधीच सगळं सांगितलेलं आहे. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही बाजू काम करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान लष्करी आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही."
AFP वृत्तसंस्थेने चाओ यांना विचारलं - पुढचं पाऊल काय असेल? याबाबत दोन्ही बाजूंनी काही ठरवलंय का?
याविषयी चाओ म्हणाले, "हे दोन्ही देश उदयाला येणाऱ्या शक्ती असल्याचं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना सांगितलंय. दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा जास्त आहे. एकमेकांचा आदर करत आणि एकमेकांच्या सोबतीने पुढे जाणं दोन्ही देशांच्या समान हिताचं असेल. जर आपण अविश्वास आणि मतभेद वाढवले तर हे दोन्ही देशांच्या नागरिकांच्या महत्त्वाकांक्षांच्या विरुद्ध असेल. दोन्ही देशांमध्ये एकमत होईल आणि त्याचं पालन केलं जाईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























