अनलॉक 1.0 : मुंबईत प्रवास करताना गर्दी टाळता येऊ शकते का?

मुंबई प्रवास

फोटो स्रोत, ShahidShaik/BBC

    • Author, अमृता दुर्वे आणि जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर आता 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झालीय. दुकानं उघडताहेत, ऑफिसेस हळुहळू सुरू होत आहेत.

अजूनही कार्यालयांना पूर्ण कर्मचारी क्षमतेने काम करण्याची परवानगी नाही. पण काही प्रमाणात प्रवास सुरू झालेला आहे.

मुंबईमध्ये लोकल रेल्वे अजूनही बंद असल्याने प्रवासाची संपूर्ण भिस्त बेस्ट किंवा इतर परिवहन सेवांच्या बसेस आणि खासगी वाहनांवर आहे.

मग अशा परिस्थितीत गर्दी न होता मुंबईत प्रवास करणं शक्य आहे का?

मुंबईतला बेस्ट प्रवास

"मुंबईत इतक्या वर्षांत इतक्या रिकाम्या बसमधून कधीच प्रवास केला नव्हता. एका सीटवर एकच जण, स्टँडिगला पाचजण हे पाहायलाही पहिल्या दिवशी वेगळं वाटत होतं. पहिल्या दिवशी मला उभं राहून प्रवास करावा लागला. मग आता मी आधीच्या स्टॉपला जाऊनच बस पकडते.

सगळ्या सीट्सवर एकेक जण आला, स्टँडिंगची संख्याही पूर्ण झाली की मग बस मधल्या स्टॉपला थांबत नाही. स्टॉपवरची लोकं बिचारी हात दाखवत राहतात. खूप वाईट वाटतं ते पाहून... पण खरं सांगायचं तर असा सोशल डिस्टंसिंग पाळून प्रवास करता येतोय म्हणूनच ऑफिसला जायचा धीर आला."

बेस्ट प्रवास

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, बेस्ट प्रवास

मुलुंडला राहणाऱ्या गौरी पाथरेंनी सोमवारपासून ऑफिसला जायला सुरुवात केली. शिवडीपर्यंतचा हा प्रवास आतापर्यंत त्या लोकल ट्रेनने करायच्या. पण आता लोकल्स बंद असल्याने त्यांनी बेस्ट बसने प्रवास करायला सुरुवात केली.

लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या मर्यादित बसेस धावत होत्या. पण सोमवार (8 जून)पासून बेस्टने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा द्यायला सुरुवात केली.

बेस्टने सोमवारपासून सुरू केलेल्या सेवा

बेस्टच्या ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या बस सेवा आणि फेऱ्यांविषयी बेस्टचे जर्नसंपर्क अधिकारी एम. एस. वराडे यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

ते म्हणाले, "मुंबई शहराच्या बाहेर पाच कॉरिडॉरमध्ये आम्ही बस सुविधा सुरू केली आहे. त्यात पनवेल, कल्याण, बदलापूर, नालासोपारा-विरारचा समावेश आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत साधारण 86 मार्गांवर आम्ही बस चालवत आहोत. पहिल्याच दिवशी चार लाखांहून अधिक प्रवाशांनी बेस्टमधून वाहतूक केली आहे. सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगविषयी आदेशाचं पालन करून एका बसमधून केवळ तीस प्रवाशांची वाहतूक करत आहोत."

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई

लॉकडाऊनच्या काळातही बेस्टची सेवा सुरू होती, पण ती फक्त अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी आणि विशिष्ट उद्देशांसाठीच खुली होती.

"लॉकडाऊनच्या काळात आम्ही लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून बाराशे बसेस चालवत होतो. त्याशिवाय काही संस्थांनी मागणी केली होती म्हणून सुमारे सहाशे विशेष बसेस चालवत होतो. हॉस्पिटल्स, पोलीस कर्मचारी, बँका, हायकोर्ट इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गांवर या बसेस अजूनही चालवल्या जात आहेत.

कोरोना
लाईन

79 एसी बस गाड्यांचं अँब्युलन्समध्ये रुपांतर करून आम्ही महापालिकेला दिल्या आहेत. तर तीन बस अँब्युलन्स बेस्ट कर्मचारी आणि नातेवाईकांसाठी तैनात ठेवल्या आहेत."

नवी मुंबई महापालिकेच्या NMMTच्याही 215 बसेस सोमवारपासून रस्त्यावर धावू लागल्या आहेत. या बसेस एकूण 858 फेऱ्या मारतील.

तर ओला - उबरसारख्या खासगी कॅब सेवा या फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच्या प्रवासासाठीच वापरता येत असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रं द्यावी लागतात.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा

बसच्या फेऱ्या वाढवताना प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलत असल्याचं बेस्टचे पीआरओ वराडे यांनी सांगितलं.

"मार्च महिन्याच्या पहिल्या आठड्यात आमच्या मेडिकल डिपार्टमेंटने प्रत्येक डेपो आणि इलेक्ट्रिक सप्लायच्या ऑफिसेसमध्ये अवेअरनेस कॅम्प घेतले. हजारच्या वर लेक्चर्स झाली. इम्युनिटी बूस्टर टॅब्लेट्सचं वाटप करण्यात आलं. स्वतःची सुरक्षितता, स्वच्छता याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.

मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड्स देण्यात आलेल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी आम्ही प्रवाशांना उभ्याने प्रवास न करण्याचं आवाहन केलंय. हॉस्पिटलच्या डेडिकेटेड फेऱ्या करणाऱ्या ड्रायव्हरच्या सुरक्षिततेसाठी त्या बसेसला त्याच्या मागे प्लास्टिकचा पडदाही लावण्यात आलेला आहे. शिवाय ज्यांना आजार झाल्याचं कळतं, त्यांचा सगळा तपशील आमचं मेडिकल डिपार्टमेंट ठेवतं. तर मृतांच्या वारसाला आम्ही लगेच नोकरी दिली. चारजण नोकरीवर रुजूही झालेले आहेत."

मुंबई प्रवास

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुंबई प्रवास

बेस्टच्या एकूण 405 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालाय. यापैकी 260 कर्मचारी बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी मात्र बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेली नाही.

तर कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांवर बेस्ट प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने बेस्टच्या संयुक्त कामगार कृती समिती 11 जून ते 13 जून दरम्यान बस डेपो बाहेर मूक निदर्शनं करणार आहे. या समितीने कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदींचीही मागणी केली आहे.

गर्दीचं काय?

मुंबईमध्ये लोकल्स आणि बसेसना होणारी गर्दी सर्वश्रुत आहे.

ऑफिसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसली तरी मुंबईतल्या रस्त्यांवर सोमवारी गर्दी पाहायला मिळाली होती. अनेक बसस्टॉप्सवर रांगा लागल्या होत्या. तर अनेकांनी प्रवासासाठी खासगी वाहनाचा पर्याय स्वीकारल्याने रस्त्यावर ट्रॅफिकही झाला.

गौरी पाथरे सांगतात, "पहिल्या दिवशी मी घराजवळच्या स्टॉपवरून बस पकडली. सीट्स भरलेल्या होत्या पण उभं राहून प्रवास करणाऱ्या पाच जणांमध्ये नंबर लागला. रस्त्याला ट्रॅफिकही होता. अगदी सगळं नॉर्मल झाल्यासारखं वाटलं तो ट्रॅफिक पाहून. आता मात्र मी दोन स्टॉप्स अलिकडे बस पकडते. साधारण 15 मिनिटांनी बस येते. कधीकधी वेळ लागतो, पण ठीक आहे."

लॉकडाऊनमधली मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊनमधली मुंबई

मुंबईत बेस्ट बस प्रवासासाठी प्रशासनाने काही नियम ठरवले आहेत. दोन जणांच्या सीटवर एकच प्रवासी बसू शकतो आणि बसमधून 5 जणांनाच एकावेळी उभ्याने प्रवास करण्याची परवानगी आहे.

पण बसस्टॉपवर होणाऱ्या गर्दीचं काय? बेस्ट प्रशासनाने या मोठ्या प्रवासीसंख्येचा विचार केला होता का?

काही मार्गांवर बेस्टच्या बसेस उशीरानं धावत असल्याची तक्रार लोकांनी केली होती. भांडूपमध्ये काही प्रवाशांना बेस्ट बससाठी दोन तास वाट पाहावी लागली होती.

याविषयी बोलताना बेस्टचे जनसंपर्क अधिकारी वराडे म्हणाले, "बेस्टनं नव्यानं बसेस सुरू करून तीनच दिवस झाले आहेत. किती संस्था सुरू होणार आहेत आणि त्यांचे दहा टक्के म्हणजे किती लोक याचा कुठलाही डेटा बेस्टकडे उपलब्ध नाही. कुठल्याही संस्थांनी तसा डेटा पुरवला नाही.

जिथे जास्त गर्दी आहे तिथे जास्त सेवा पुरवण्यासाठी बेस्ट प्रयत्नशील आहे. कंपन्या पुन्हा सुरू झाल्यावर अनेकजण स्वतःच्या गाड्या किंवा मोटरसायकलनं प्रवास करत आहेत. त्यामुळं रस्त्यावर अचानक ट्रॅफिक जॅम होत आहेत. त्यामुळं बस ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं वेळेत पोहोचू शकत नाहीत."

बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाल्याचा एक व्हीडिओही व्हायरल झाला होता. पण हा व्हीडिओ मुंबईतला नसल्याचं बेस्टने स्पष्ट केलंय.

याशिवाय बस स्टॉप्सवर सोशल डिस्टंन्सिंग पाळलं जावं यासाठी गर्दीच्या स्टॉप्सवर तिकीट निरीक्षकांना आणि ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना ड्युटी लावण्यात आलेली आहे. रांग लावणं, बसमध्ये प्रवासी चढताना रांग पाळली जाणं याची खबरदारी हे टीसी घेतील.

गर्दीचा असाच अनुभव एसटीद्वारे ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी आला.

कल्याणचे रहिवासी असणाऱ्या स्वप्नील यांनी सकाळी बीबीसी मराठीला त्यांचा अनुभव सांगितला.

"साधारण साडेनऊच्या सुमारास मी कल्याण एस. टी. स्टँडला पोहोचलो. खूप मोठी लाईन होती. सीएसटीला जाण्यासाठी वेगळी रांग होती, ठाण्याला जायला वेगळी रांग होती. मी ठाण्याच्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर लागायला 11 वाजले.

इतक्या मोठ्या रांगेत सोशल डिस्टंसिंग पाळलं जाणं शक्यच नव्हतं. बसमध्ये स्टँडिंग प्रवासी नव्हते, पण प्रत्येक सीटवर बाजूबाजूला दोन प्रवासी होते. रस्त्यात भयंकर ट्रॅफिकही होता. ठाण्याला खोपटला पोचायला मला दुपारचा दीड वाजला. तिथून पुढे ऑफिसला पोहोचायला दोन वाजले."

गर्दी कशी टाळता येईल?

मुंबईमध्ये गर्दी टाळून प्रवास करणं शक्य आहे का? याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार म्हणाले,

"मुंबईतले साधारण 50%जण लोकलने प्रवास करतात. तर 35% बसने आणि बाकीचे कार - स्कूटर - ऑटोरिक्षा - टॅक्सीने. आता लोकल्स बंद असल्याने हे सगळे प्रवासी बसकडे येणार. सध्या पहिल्यापेक्षा कमी लोक रस्त्यावर असले तरीदेखील गर्दी जास्त वाटते.

कारण तुलनेने गाड्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. गाड्या वाढल्या की ट्रॅफिक जॅम वाढतो. गाडीला लागते त्यापेक्षा तिप्पट जागा बसला लागते. पण बस कितीतरी जास्त प्रवासी एकावेळी वाहून नेऊ शकते. अगदी अर्धेजरी प्रवासी बसमधून नेले तरी ती कारपेक्षा जास्त 'एफिशियंट' ठरते. त्यामुळे आधीच जास्त जागा व्यापणाऱ्या कारमध्ये एकावेळी दोघेच बसणार असतील, तर ट्रॅफिक वाढणार."

मुंबईतले रस्ते

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुंबईतले रस्ते

"गर्दी कमी करण्यासाठी मी दोन गोष्टी सुचवल्या आहेत. एकतर ऑफिससाठी दोन शिफ्ट सुरू कराव्यात. मुंबईला 'युनिडारेक्शनल फ्लो' आहे. म्हणजे सकाळी उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई आणि संध्याकाळी दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई. त्यात जर दोन शिफ्ट केल्या - सकाळी 9 ते 3वा 4 आणि त्यानंतर 11.30 ते संध्याकाळी 6.30, तर त्याचा फायदा होईल. आता नाहीतरी ऑफिसेसनी वर्क फ्रॉम होम सुरू केलेलंच आहे. तेव्हा अशा शिफ्ट्स करून लोकांना अडचणी सोडवण्यात मदत करता येईल."

"मुंबईत 6000 स्कूल बसेस आहेत. बेस्टच्या बस 3000 आहेत. सध्या शाळा बंदच आहेत. जो पर्यंत शाळा बंद आहेत तोपर्यंत त्यातल्या एक ते दोन हजार बसेस सकाळी आणि संध्याकाळी वापरता येतील. याने बराच मोठा फरक पडू शकतो."

गर्दी टाळण्याचे इतर उपाय

बेस्टच्या बसेस या अनेक आस्थापनांसाठी वापरल्या जातात. एरवी अनेक बेस्ट बसेसचा वापर शाळांसाठीच्या बसेस म्हणूनही केला जातो. लॉकडाऊनच्या काळात संस्थांच्या मागणीनुसार बेस्टने बसेस दिल्या होत्या.

आता लॉकडाऊन उठवतानाही एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा तपशील देत बेस्टशी संपर्क केल्यास अशी सुविधा दिली जाऊ शकते, असं बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

"खासगी आस्थापनांनीही मागणी केली तर त्यांच्यासाठीही विशेष गाड्या सोडण्याबाबत BEST व्यवस्थापन नक्की विचार करेल. याआधीही आम्ही कॉर्पोरेट किंवा शाळांसाठी बसेस चालवल्या आहेत. त्या बसेसमध्ये जास्तीचा चार्ज घेतला जात नाही, नेहमीच्या दरातच तिकीट घेतलं जातं."

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

"एखाद्या कंपनीत कमी माणसं काम करत असतील. पण मुंबईत अनेक इंडस्ट्रियल इस्टेट आहेत जिथे एकाच परिसरात अनेक संस्था काम करत असतात. त्यांनी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांसाठी मागणी केली तर त्यांच्यासाठी विशेष फेऱ्या किंवा डेडिकेटेड बसेस देण्यावर व्यवस्थापन विचार करू शकतं."

बस वाहतुकीसाठी स्वतंत्र लेन देण्याच्या पर्यायाविषयीही दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. BEST प्रशासनानेही यासाठीची मागणी केली होती. ती पूर्ण झाली, तर बसचा प्रवास अधिक वेगवान होऊ शकतो.

अशोक दातार सांगतात, "बस लेन लंडनमध्ये अतिशय कॉमन आहेत. चीनमधल्या अनेक शहरांमध्येही बस लेन आहेत. बस लेन सुरू करायला फार खर्चही करावा लागणार नाही. फक्त रंगवावं लागेल. एका आठवड्यात बस लेन सुरू करता येईल. फक्त दोरखंड वा प्लास्टिकचे डिव्हायडर लावावे लागतील.

तीन महिन्यांपूर्वी बेंगलुरूने असं केलेलं आहे. आठ दिवसांत त्यांनी बस लेन सुरू केली. अशा बिनखर्चाच्या गोष्टी आपण करायला हव्यात. जर आपण बसची संख्या वाढवली आणि बसला लेन दिली, तर तीच बस दुप्पट वेगाने जाईल. लोकंही खुश होतील कारण त्यांचा प्रवास वेगाने होईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)