कोरोना व्हायरसच्या काळात मुंबई मान्सूनच्या पावसाचा सामना कसा करणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पाऊस मुंबईसाठी नवा नाही. दरवर्षी तो कोसळतो, मुंबईला झोडपून काढतो. काही वेळा इतका की मुंबईकर जीव मुठीत धरून ते दिवस काढतात.
पण यंदा पावसाच्या सोबतच कोरोना विषाणूचं संकटही आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या आजारानं आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक जणांना ग्रासलं आहे. पुढच्या काही आठवड्यांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पण मग कोव्हिडच्या काळात येणाऱ्या पावसासाठी मुंबई सज्ज आहे का? हा प्रश्न पडतो. पावसाळ्यात मुंबईसमोर कोणती आव्हानं आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी काही तयारी सुरू आहे का. याचा हा आढावा.
नालेसफाईचं काम कुठवर आलं आहे?
सुमारे 21 किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह ही मुंबईतली नैसर्गिक ड्रेनेज सिस्टीम आहे. मिठी नदी आणि दहिसर नदीसह या शहरातले छोटे नदी-नाले पावसाचं पाणी समुद्रात वाहून नेण्याचं काम करतात. पावसाळ्याआधी त्यांच्यातला गाळ काढणं, नालेसफाई होणं गरजेचं असतं. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत नालेसफाईचं हे काम केलं जातं. त्यासाठी कंत्राटही दिलं जातं.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

पण यंदा लॉकडाऊनमुळे हे काम रखडलं, त्यातच स्थलांतरीत मजूरही गावी गेले. त्यामुळे नालेसफाईचं काम उशीरा सुरू झालं.
मिठी नदीतला गाळ बऱ्याच प्रमाणात काढण्यात आला आहे. पण मुंबईत यंदा नालेसफाईची 40℅ टक्के कामंच झाली असल्याचा दावा वांद्रे पश्चिममधले भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून केला आहे.
"काही ठिकाणी गाळ काढलेला नाही, काही ठिकाणी गाळ उचललेला नाही. त्यामुळेच वजनाची आकडेवारी पालिका जाहीर करीत नाही, डम्पिंगवर किती गाळ टाकला याची माहिती लपवली जातेय, असं नालेसफाईचं चित्र आज आम्ही पाहणी केल्यानंतर समोर आलं," असा आरोप शेलार यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुंबईतल्या मोठ्या नदी नाल्यांची साफसफाई नियमित केली जाते. पण झोपडपट्टीतील छोटी गटारं तुंबण्याचा धोकाही तेवढाच आहे. नेमकी किती कामं बाकी आहेत, याविषयी आम्ही महापालिकेचे अधिकारी आणि महापौरांशी संपर्क साधला. पण त्यांची प्रतिक्रिया अजून मिळू शकलेली नाही.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईन लगतची नदी-नालेसफाईची पावसाळापूर्व कामे निर्धारित वेळेतच करण्याचे तसंच पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप २५ मे पर्यंत बसविण्याचे आदेश दिले होते. त्यांनी 'क्विंट'शी बोलताना पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण झाली असल्याचं म्हटलं आहे.
"कोरोना विषाणूच्या साथीमुळे महापालिकेचा प्रत्येक विभाग परिस्थिती सुधारण्यासाठी काम करत असून प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामात गुंतला आहे. त्यादरम्यानच मान्सूनपूर्व कामंही पूर्ण करण्यात आली आहेत," असं ते म्हणले.
नालेसफाईसोबतच झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती अशी कामंही नियमित सुरू असल्याचं महापालिकेनं म्हटलं होतं. पण निसर्ग चक्रीवादळानंतर सहा जूनच्या सकाळी आलेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचं दिसून आलं होतं.
रुग्णालयं आणि आरोग्य सुविधांची स्थिती
पावसाळ्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली, तर त्याचा परिणाम रुग्णालयांवर, त्यातही तात्पुरती उभारलेली रुग्णालयं आणि कोव्हिड केअर सेंटर्सवर होऊ शकतो. विशेषतः वांद्रे कुर्ला संकुलात उभारलेलं रुग्णालय जे मिठी नदीपासून फार दूर नाही.

फोटो स्रोत, Getty Images
यंदा मान्सून येण्याआधीच मुंबईत निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला होता. वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या सेंटर्समधल्या रुग्णांना वरळीतल्या NSCIच्या स्टेडियममध्ये हलवण्यात आलं होतं. त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले.
तसंच वादळादरम्यान ज्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, ICU बेड्स आहेत, तिथे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटर्सची सोय करत असल्याचंही सरकारनं सांगितलं होतं.
मुंबईत सहसा वीजपुरवठा खंडीत होत नाही, पण पूरस्थिती किंवा वादळी वारे अचानक आले, तर रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
परळचं केईएम आणि सायनचं लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल ही मुंबईतली दोन मुख्य सरकारी हॉस्पिटल्स आहेत, जिथे सध्या कोव्हिडसोबतच अन्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत या रुग्णालयांमध्ये पावसाळ्यात पाण्याची गळती किंवा पाणी साचून राहणं अशा घटना समोर आल्या होत्या. यंदा या रुग्णालयांवर वाढलेला ताण पाहता, अशा गोष्टी घडू नयेत याकडेही महापालिकेला लक्ष द्यावं लागेल.
डेंगी (डेंग्यू), मलेरियाचं आव्हान
मुंबईवर कोरोना विषाणूच्या जागतिक साथीचं संकट असतानाच इतर आजारही डोकं वर काढण्याची भीती आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत विषाणूतज्ज्ञ डॉ. अनंत भान यांनी ती चिंता व्यक्त केली आहे.
ते सांगतात, "सध्या कोव्हिड-19 वर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे कोव्हिड-19 व्यतिरिक्तच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि तसं झालं तर त्यांचीही साथ पसरण्याची मोठी भीती आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत दरवर्षीच या काळात ठिकठिकाणी पाणी साठल्यानं डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरोसिस, कावीळ, जुलाब, स्वाईन फ्लू असे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. यंदा विशेषतः डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू नये, यासाठी महापालिकेला आणि नागरिकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण कोव्हिडप्रमाणे या आजारांमध्येही तापाची लक्षणं दिसून येतात.
महापालिकेनं मे महिन्यात केलेल्या पाहणीत केवळ नऊ दिवसांमध्ये 1,146 ठिकाणी डेंग्यू आणि 333 ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. तशी माहिती महापालिकेनंच 22 मे रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली होती.
लॉकडाऊनच्या काळातही महापालिकेच्या कीटकनाशक खात्याचे दीड हजार कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मुंबईच्या कानाकोपऱ्यात सर्वेक्षण करत आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यादरम्यान हे कर्मचारी ठिकठिकाणी ही पाहणी करत असतात, पण नागरिकांनीही त्यासाठी जागरूक राहायला हवं असंही या पत्रकात म्हटलं आहे.
आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेलं पाणी असणार नाही, याची काळजी घ्या. पाण्याच्या टाक्या, पिंप, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीत साचलेलं पाणी, परिसरातले पडून असलेले टायर किंवा झाडांच्या कुंड्यांत साचलेलं पाणी, फेकून दिलेल्या बाटल्या, बाटल्यांच्या झाकणांतही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
पुराच्या दूषित पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस तसंच काविळीसारखे आजार पसरू शकतात. त्यामुळे अशा पाण्यातून चालणं, खेळणं शक्यतो टाळावं. अशा पाण्यात भिजलात तर घरी गेल्यावर स्वच्छ आंघोळ करावी आणि पाणी उकळूनच प्यावं असा सल्ला राज्याच्या आरोग्य विभागानं दिला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























