भारत-चीन सीमावादावर आज चर्चा, तणाव संपणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रा. स्वर्ण सिंह
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
भारत आणि चीन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी आज दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बोलणी होत आहेत.
दोन्ही देशांमध्ये गेल्या महिन्याभरापासून सीमेवर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. हा वाद मुख्यत्वे लडाखच्या पॅंगाँग तलाव (कॉन्क्लेव्ह तळं) आणि पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रदेशावरुन तयार झाला आहे.
भारताने सुचवल्यानुसार आता दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा होत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चुशूल-मोल्दो येथील भारतीय बॉर्डर मीटिंग हटमध्ये ही बैठक होत आहे.
या बैठकीत भारताततर्फे लेह स्थित 14 व्या कोअरचे कमांडर ले. ज. हरिंदर सिंह सहभागी झाले आहेत. याच आठवड्यात भारतीय सैन्याच्या उत्तर दलाचे कमांडिंग ऑफिसल वाय. के. जोशी यांनी लेहचा दौरा केला होता. जोशी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा केला होता.
आता होत असलेल्या चर्चेकडे पाहाता सध्या उत्पन्न झालेला तणाव किती गंभीर आहे हे समजते.
यावेळी प्रकरण गंभीर
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी फौजेद्वारे अतिक्रमण करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. आता चीनतर्फे लहानसहान अतिक्रमणाऐवजी मोठ्या घटना तेथे होत आहेत.
साधारणतः सीमा चौक्यांवर ब्रिगेडियर स्तरावरील चर्चा होत असते. अशा चौकीवर यापूर्वी अशी चर्चा होण्याची घटना फारशी घडली नसावी. आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून सीमा चौक्यांवर लोकल कमांडर्समध्ये दहा फेऱ्यांमधील चर्चा झालेली आहे.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
यातल्या तीन चर्चा मेजर जनरल स्तरावर झाल्या होत्या. दोन्ही देशातील सैन्याधिकाऱ्यांमध्ये गेल्या मंगळवारी चर्चा झाली होती. त्यात मेजर जनरल स्तरावरील अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. मात्र या बैठकांमध्ये चर्चा होऊनही दोन्ही देशातील सीमेवरील तणाव निवळलेला नाही.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन करण्याच्या वर्षभरात 600 वेळा घटना घडल्या आहेत. इतकच नाही तर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तीन वर्षातून एकदा चकमक होत असे आता वर्षातून तीनवेळा अशा घटना घडू लागल्या आहेत. असं असलं तरी हा तणाव विकोपाला गेलेला नाही याचं श्रेय या लेफ्टनंट जनरल्सना दिलं पाहिजे. त्यांनी आपल्या सैन्याला मर्यादेत ठेवलं आहे.
लडाखची नाजूक स्थिती
भारत-चीन सीमेवर चार संवेदनशील ठिकाणी दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आहे. त्यातील पॅंगाँग सरोवर आणि गलवान खोरे यावर दोन्ही देशांनी सांगितलेल्या हक्कामुळे ही ठिकाणं चर्चेत आहेत.
याला दोन्ही देशांतील तणावाचा नवा अध्याय मानला जात आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व लडाख सीमावादाचे मुख्य केंद्र म्हणून उदयाला आला आहे. इथल्या डेमचोक, चुमार आणि त्रिग येथील पर्वतांमध्ये दोन्ही देशांमध्ये चकमक झालेली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तणाव तयार झालेल्या प्रदेशापासून चीनी तुकड्या दोन किलोमीटर तर भारतीय तुकड्या एक किलोमीटर मागे सरकल्या आहेत. वादग्रस्त प्रदेशातून चीनने तुकड्या मागे घेतल्या तर भारतही आपल्या सैनिकांना 4 मेच्या स्थितीनुसार मागे घ्यायला तयार आहे.
चीन यासाठी तायर होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण चीनचे सैनिक अजूनही लडाखच्या फिंगर 4 काही प्रदेशात ठाण मांडून आहेत. हा प्रदेश एकेकाळी भारताच्या ताब्यात होता.
भारत सरकारच्या संयमित परंतु कठोर भूमिकेनुसार भारताने या प्रदेशात आपल्या सैन्य तुकड्यांची संख्या वाढवली आहे. तर पूर्व लडाखच्या वादग्रस्त प्रदेशात अतिरिक्त तुकड्या, चिलखती गाड्या व तोफा पाठवल्या आहेत.
दोन्ही देश सैन्य आणि चर्चेच्या पातळीवर संवाद साधत आहेत. 2017 साली निर्माण झालेल्या डोकलाम प्रश्नानंतर सध्या तयार झालेली मोठी समस्या लवकर सुटावी यांसाठी त्याचा उपयोग होईल असे सरकारला वाटते.
फिंगर 4ची भौगोलिक स्थिती
पँगाँग सरोवराचा प्रश्न समजून घेण्यासाठी पूर्व लडाखमधील फिंगर 4 ची स्थिती समजणे महत्त्वाचं आहे.
फिंगर 4 प्रदेश पँगाँगच्या किनाऱ्याजवळ आहे. काराकोरम पर्वताच्या पूर्व भागात म्हणजे चँग चेनमोमधून 8 पर्वतीय रस्ते बाहेर पडतात. त्यांना फिंगर म्हणतात.

फोटो स्रोत, yawar nazir
या रस्त्यांमधूनच प्रत्यक्ष ताबा रेषा जाते. भारत आणि चीन यांचे याबाबत वेगवेगळे दावे आहेत. भारतीय सैन्य फिंगर 8च्या प्रदेशात गस्त घालत असतात. परंतु फिंगर 4 वर भारताचा कधीही ताबा नव्हता. तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर 2 मधून जाते असा चीनचा दावा आहे आणि आपले सैन्य फिंगर 4पर्यंत गस्त घालतात असंही त्यांचं मत आहे. कधीकधी चीनचे सैन्य फिंगर 4 पर्यंत येतात मात्र अशी घटना फारशी घडत नाही.
1999 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान चीनने या प्रदेशात 5 किमी लांबीचा रस्ता बनवला होता. भारताने त्यावर हरकत घेतली होती. त्यानंतर 2014 साली फिंगर ४ च्या आसपास काही बांधकामंही चीनने केली होती. भारताने हरकत घेतल्यावर ती पाडण्यात आली. त्यामुळे भारताच्या दाव्याचा अंदाज चीनला आला होता.
तरीही 2017 च्या डोकलाम संकटात चीनची सेना फिंगर 4 पर्यंत येऊन गस्त घालू लागली होती.
आता दोन्ही देशांचे सैन्य फिंगर 4 वर समोरासमोर आले आहे.त्यानंतर प्रोटोक़लनुसार दोन्ही सेना तणाव तयार होण्याच्या जागेपासून मागे गेल्या. मात्र पँगाँग सरोवर, गलवान, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी क्षेत्रामध्ये चीनने आक्रमक भूमिका घेत सैनिकांचा वावर वाढवला.
तसेच या रेषेजवळ काही बांधकामंही केली आहे. मे महिन्यापासून चीनने पूर्व लडाखच्या संवेदनशील भागात 5 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत.
सैनिकांच्या मदतीसाठी काही तात्पुरती बांधकामंही केली आहेत. तसेच रणगाडे, तोफा तैनात केल्या आहेत.
चीनने शस्त्रं आणि राखीव सैनिकांना ताबारेषेच्या अगदी जवळ आणले आहे. या रेषेपासून 180 किमी अंतरावर चीनी सैन्यतळावर हालचाल वाढल्याचे उपग्रहीय चित्रावरुन दिसते.
चीनची नेमकी चिंता काय आहे?
सीमेजवळ भारतानं रस्ता बनवल्यानं चीन नाराज आहे. सध्या भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाचं कारणही हेच आहे.
गॅलवान खोऱ्याला दारबुक, शयोक, दौलत बेग ओल्डीला जोडणारा 255 किलोमीटरचा रस्ता भारताना बांधलाय आणि याबद्दल चीनची नाराजी आहे. या रस्त्यामुळे लेहहून दौलत बेग ओल्डीपर्यंत पोहोचण्यासाठी आता कमी अवधी लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
दौलत बेग ओल्डी इथं जगातील सर्वात उंच लष्करी हवाई तळ आहे. हा तळ नियंत्रण रेषेच्या सर्वात जवळ असलेला एअर फिल्ड आहे.
लेह ते दौलत बेग ओल्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी दोन दिवस लागायचे. आता नव्या रस्त्यामुळे केवळ सहा तासात हे अंतर पार करणं शक्य झालंय.
चीनने याआधीच त्यांच्या भूभागात हजारो किलोमीटरचे रस्ते बनवलेत. सीमेवर असे रस्ते बनवल्यानं लष्करी शस्त्रांची ने-आण करण्यासाठी किती सोपं होतं, याची चीनला चांगली जाणीव आहे.
त्यामुळेच सीमेवर असे वाद निर्माण करून, भारताला गुंतवून ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. विशेषत: सीमेअंतर्गत भारत ज्या मूलभूत सुविधांचा विस्तार करू पाहतो, त्या रोखणं किंवा त्यांमध्ये उशीर होईल हे पाहणं, हे चीनचं उद्दिष्ट असल्याचं दिसून येतं.
पूर्व लडाखमध्ये चीनने दिलेल्या प्रतिक्रियेमागची मूळ समस्या आणखी वेगळीच आहे. चीनला भीती आहे की, अक्साई चीन भागावरील अवैध ताब्याला भारत आव्हान देण्यासाठी हा रस्ता बनवतोय. तसंच, नियंत्रण रेषेजवळ चीनच्या ल्हासा काशगर हायवेला समांतर भारतानं आपल्या हद्दीत बनवलेला रस्ताही चीनला धोकादायक वाटतोय.
किती भागावर वाद आहे?
या भागाचा इतिहास आणि भूगोल पाहिल्यास भारतासाठी लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा आणखी आव्हानात्मक बनते. कारण हा वाद केवळ दोन देशांच्या सीमेचा वाद नाहीय. तर साम्राज्यवादानंतर पुढे येणार्या दोन देशांच्या क्षेत्रीय अखंडतेशी जोडलेलं प्रकरण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि चीन हे दोन्ही देश आपापल्या भागातील एक इंचही जमीन न सोडण्याची शपथ घेत आलेत. मात्र, दोन्ही देशांमधील नियंत्रण रेषेवर असे काही भाग आहेत, जे पूर्णपणे स्पष्ट नाहीत. या भागांबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे दावे आहेत आणि या दाव्यांमध्येही फरक आहे.
भारताचं म्हणणं आहे की, चीनपेक्षा भारताची सीमा 3488 किलोमीटर लांबीची आहे. मात्र, चीनला हा दावा मान्य नाहीय. चीनच्या मते भारत-चीन सीमा केवळ 2000 किलोमीटरची आहे.
भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील 1 लाख 30 हजार वर्ग किलोमीटर भागावर वाद आहे आणि दोन्ही देशांची या भागावर दावेदारी आहे.
बांगलादेश, निकारगुआ किंवा ग्रीस इतकं हे क्षेत्रफळ आहे. संयुक्त राष्ट्राचे 100 हून अधिक देश असे आहेत, ज्यांचं क्षेत्रफळ भारत आणि चीन दरम्यान वादात असलेल्या भागाएवढे आहे.
चीनचे नेते देंग शाओ पेंग यांचा मंत्र
भारत आणि चीन हे दोन्ही देश सीमावादाच्या या ऐतिहासिक प्रकरणाला चीनचे नेते देंग शाओ पेंग यांच्या मंत्रानुसारच सांभाळत आलेत.
देंग यांचं म्हणणं होतं की, 'आपली ताकद लपवून ठेवा, आपली वेळ येण्याची वाट पाहा आणि नेतृत्त्वावर दावेदारी करू नका.'

फोटो स्रोत, Getty Images
देंग यांच्या या मंत्रानुसारच भारत आणि चीन दरम्यान खरी नियंत्रण रेषा शांत आहे. मात्र, नव्या युगाची सुरूवात म्हणत चीनचं लष्कर शेजारी राष्ट्रांच्या भागावरील दावेदारीची प्रकरणं पुन्हा वर काढू लागलीय.
दक्षिणी चीन समुद्र म्हणजे चिनी सैनिकांसाठी 'कॅबेज धोरण' म्हणून उदाहरण ठरलंय. इथे चीन पुढे पुढे सरकत आपल्या ऐतिहासिक दावेदारीला प्रत्यक्षात आणण्यासाठी झटतोय.
चीन आता इतका ताकदवान देश बनलाय की, हातून निसटलेल्या भागांना पुन्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतो, असा विश्वास आता चीनला वाटू लागलाय.
ज्यावेळी चीन कमकुवत होता, त्यावेळी हे भाग दुसर्या देशांच्या ताब्यात गेले होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 'चायना ड्रीम'सोबतच राष्ट्रीय नवनिर्मिती अभियानही सुरू केलंय.
भारतासोबत चीनचा वाद हा त्याच जागतिक वर्चस्वाच्या दिशेनं चीनच्या वाढीचा एक भाग आहे. याचमुळे अमेरिका आणि चीन नव्या शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आहेत.
चीन चर्चेसाठी तयार का झाला?
गॅलवान खोऱ्यातून चीननं आपलं सैन्य मागे घण्याचं कारण असंही असू शकतं की, या वादात अमेरिकेनं रस दाखवण्यास सुरूवात केली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी एलिस वेल्स आणि नंतर स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारत आणि चीनदरम्यान मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, AFP
गुरुवारी ट्रंप यांनी आपल्या या इच्छेचा पुन्हा एकदा उल्लेख केला. त्यामुळेच भारताचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांना पुढे येऊन स्पष्ट करावं लागलं की, भारत आणि चीनमधील वाद सोडवण्यासाठी लष्कर आणि रणनिती व्यवस्था आहे आणि या माध्यमातून हा तणाव दूर करण्याचा प्रयत्नही केला जातोय.
मात्र, या प्रकरणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे.
झाओ लिजियान म्हणतात, "भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांमधील संवाद आणि सल्लानुसार प्रकरण सोडवण्यात सक्षम आहेत. चीन आणि भारत या दोन देशांना इतर तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज आहे."
यानंतरच गॅलवान खोऱ्यातून चिनी सैनिक मागे हटले होते.
दुसरीकडे, भारतानं सीमेवर लष्करी फौज वाढवून एकप्रकारे भारताच्या भूमिकेचे संकेत दिलेत. त्यामुळे वेगानं आक्रमक होत चाललेला चीन आता चर्चेसाठी तयार होऊ लागलाय.
भारत-चीन सीमावाद संपेल?
भारत आणि चीनमधील संवादामुळे, चर्चेमुळे दोन्ही देशातील सीमावाद संपेल, असं म्हणणं घाई ठरेल. कारण नियंत्रण रेषेवरील चीनच्या घुसखोरी आणि अतिक्रमणाचा हा पॅटर्न हा इतर भागात त्यांच्या भौगोलिक विस्ताराच्या रणनितीचा भाग आहे.
तसेही, हा काही भारत आणि चीनमधील शेवटचा सीमावाद नाहीय. एक पाऊल पुढे टाकयचं आणि एक पाऊल मागे टाकायचं, हा चिनी ड्रॅगनच्या रणनितीचा भाग आहे. त्यामुळे भारताला त्यादृष्टीने कायमच तयारीत राहावं लागेल.
(लेखक दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि ते स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज सेंटर फॉर पॉलिटिक्स, ऑर्गनायझेशन अँड डिसआर्मामेंटचे अध्यक्षही आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























