कोरोना व्हायरसवर मात करून घरी परतलेल्या पोलिसाचा चार तासांत मृत्यू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1) कोरोनावर मात करून परतलेल्या पोलिसाचा तासाभरात मृत्यू
कोरोना व्हायरसची लागण झालेले पोलीस कॉन्स्टेबल दीपक हाटे हे बरे होऊन घरी परतले. आणि अवघ्या काही तासातच मृत्युमुखी पडले. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
पोलीस कॉन्स्टेबल दीपक हाटे यांना वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर तैनात करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आपापल्या गावी जात असताना तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांमध्ये हाटे सुद्धा होते.
त्यानंतर 53 वर्षीय हाटे यांची चाचणी घेण्यात आली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीनं वरळीच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये नेण्यात आलं.
गुरुवारी रात्री ते बरे होऊन घरी परतले. मात्र काही वेळानं त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं आणि शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

2) जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवासास परवानगी, मात्र अटी लागू
जैन समाजाच्या चातुर्मास पर्वास जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. या चातुर्मास काळात जैन समाजाचे साधू-साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचवण्यासाठी पायी प्रवास करीत असतात. लोकमतनं ही बातमी दिलीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यानं अनेक भागातून साधू साध्वी प्रवास करू शकत नाहीत. मात्र चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जैन समाजाच्या साधू-साध्वी आणि सेवक वर्गाला त्यांच्या चातुर्मास स्थळी पोहोचवण्यासाठी काही अटी लावून परवानगी देण्यात आली आहे.
प्रवासादरम्यान आणि मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल, याची जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आलेत.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसरीकडे, केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन-5ची घोषणा केली आहे. त्यानुसार आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासाला कसलीही परवानगी लागणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासंबंधीचे निर्णय राज्य सरकारंही घेऊ शकतात. ही बातमी एबीपी माझानं दिलीय.
मालवाहतूक तसेच व्यक्तींना विनापरवाना आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवास/वाहतूक करता येणार आहे. यासाठी कुठल्याही ई-परमिट किंवा ई-पासची गरज लागणार नाही.
मात्र राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीच्या आकलनानुसार आवश्यक वाटलं तर ते जिल्हांतर्गंत तसेच राज्याबाहेरच्या प्रवासावर निर्बंध घालू शकतात.
3) वरवरा राव मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. वरवरा राव हे जवळपास ऐंशी वर्षांचे असून, त्यांना आरोग्यसंबंधी विविध आजार आहेत. मुंबई मिररनं ही बातमी दिलीय.
आता वरवरा राव यांना नेमक्या कुठल्या आरोग्य समस्येमुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय, ते अद्याप सांगण्यात आलं नाहीय.
दोनच दिवसांपूर्वी वरवरा राव यांच्या मुलीनं महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहून वरवरा राव यांची तळोजा जेलमधून सुटका करण्याची मागणी केली होती.
राव हे वयस्कर असल्यानं कोरोनाची लागण होण्याची भीती त्यांच्या मुलीनं पत्रातून व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK/BHASKER KOORAPATI
तर याच प्रकरणात अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी वैद्यकीय अंतरिम जामिनीसाठी अर्ज केला होता. कारण त्यांच्या सोबत असणाऱ्या कैद्याला कोरोनाची लागण झालीय. मात्र, विशेष कोर्टानं भारद्वाज यांना जामीन देण्यास नकार दिला. भारद्वाज या मुंबईतील भायखळा जेलमध्ये आहेत. द हिंदूनं ही बातमी दिलीय.
4) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आठवड्याभरात पुन्हा एकदा भेट झालीय. या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आला नाहीय. मात्र, लॉकडाऊनबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
लॉकडाऊन 5 बाबत चर्चेसह राज्यातील राजकीय वातावरणाबाबतही चर्चेचा शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभरातच पवारांनी उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा भेट घेतलीय.
दुसरीकडे, शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला विविध पत्र पाठवून शेती, रेल्वे, अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर सूचना केल्या होत्या.
5) पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी महाग
कोरोनाला रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. त्यामुळे वेगवेगळे राज्य आपापल्या परीनं महसुलासाठी प्रयत्न करताना दिसतायत. महाराष्ट्रानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवून आता तिजोरीत पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
महसुलासाठी पेट्रोल-डिझेलच्या मूल्यवर्धित करात प्रति लिटर प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उद्यापासून म्हणजेच, एक जूनपासून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर आकारले जातील.
या दरवाढीमुळं महाराष्ट्राला पुढच्या 10 महिन्यात 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























