You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका, पण मनसेचा त्यांच्यावरच निशाणा #5मोठ्याबातम्या
1. आदित्य ठाकरेंची भाजपच्या आंदोलनावर टीका, पण मनसेचं लक्ष्य त्यांच्यावरच
कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत भाजपने राज्यभर आंदोलन केलं. पण सत्तेच्या हव्यासापोटी भाजप नेत्यांनी त्यांच्या मुलांनाही भर उन्हात उभं केलं, ते कोरोना विसरले त्यांना राजकारण प्रिय असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.
महाराष्ट्र टाइम्सने याविषयीची बातमी दिलेली आहे.
याविषयीचं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्यांच्या फोटोतल्या लहान मुलांकडे लक्ष वेधलंय. या मुलांच्या चेहऱ्यावर मास्क असले तरी ते तोंडावर लावलेले नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
तर दुसरीकडे मनसेने शिवसेनेवर टीका केलीय. शिवसेनेकडून कुलाबा भागामध्ये सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. या पॅकेट्सवर आदित्य ठाकरेंचा फोटो होता.
"कोणाचा फोटो लावायचा हे कळत नाही का, हे पण आधीच छापलं होतं का," असं ट्वीट मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलंय.
त्यामुळे राज्यात एकंदरच राजकारणावरून राजकारण सुरू झालं आहे.
2. केंद्राचं आर्थिक पॅकेज म्हणजे घोर थट्टा - सोनिया गांधी
केंद्र सरकारने जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज ही घोर थट्टा असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलीय. 22 पक्षांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्या बोलत होत्या.
लोकमतमध्ये याविषयीची बातमी आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फान वादळाने झालेला विध्वंस पाहता ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी आणि पीडित राज्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही या व्हि़डिओ कॉन्फरन्सदरम्यान करण्यात आली.
3. शाळांच्या व्हॅनमधून कोरोना रुग्णांची वाहतूक
रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत असल्याने ठाणे जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळांच्या मिनी बसेस आणि व्हॅनमधून कोरोना रुग्णांची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परिवहन विभागाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात मालकांच्या परवानगीने रुग्णवाहिकांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत, अशी बातमी लोकसत्तामध्ये दिली आहे.
राज्यभरात सध्या शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे शालेय बसच्या जवळपास दोन लाख चालक, मदतनीसांचा रोजगार धोक्यात आला आहे. बहुतेक शाळांनी या शैक्षणिक वर्षांसाठी बसची सुविधा न घेण्याचे ठरवले असून बस मालकांबरोबरील कंत्राटं रद्द केली आहेत, असंही या बातमीत म्हटलं आहे.
4. भुसावळ ते इटारसी मार्गावर रेल्वे खोळंबल्या, प्रवाशांचे हाल
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेस भुसावळ ते इटारसी मार्गावर कोंडी झाल्याने ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या. यामुळे 26 गाड्या ठिकठिकाणी खोळंबल्या.
सकाळने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
गाड्या थांबल्याने प्रवाशांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय केली.
5. झूम अॅपवर बंदी? सुप्रीम कोर्टाने मागवली सरकारची प्रतिक्रिया
झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपवर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीचा विचार करता कार्यालयीन आणि वैयक्तिक कामासाठीही झूमचा वापर बंद करण्यात यावा अशी मागणी दिल्लीतल्या हर्ष चुग यांनी केलीय.
मिंट वर्तमानपत्रात याविषयीची बातमी आहे.
सुप्रीम कोर्टाच्या 3 सदस्यांच्या खंडपीठाने याविषयी केंद्र सरकार आणि झूम कंपनीला नोटीस पाठवून त्यांचं लेखी उत्तर मागवलं आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)