कोरोना : पीपीई किट्सच्या तुटवड्याबद्दल तक्रार केल्यानं डॉक्टरची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये?

फोटो स्रोत, UGC
PPE किट्सच्या तुटवड्याबद्दल आवाज उठवल्यानंतर भूलतज्ज्ञ असणारे डॉ. सुधाकर राव पहिल्यांदा चर्चेत आले होते.
विशाखापट्टणममध्येच राहणारे आणि काम करणारे डॉ. राव आता पुन्हा या आठवड्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय..
पोलीस विशाखापट्टणमच्या हायवेवरून डॉ. राव यांना नेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं. यानंतर त्यांची रवानगी मेंटल हॉस्पिटल - मनोरुग्णालयात करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
हॉस्पिटलमधला संरक्षक वस्तूंचा तुटवडा वा हॉस्पिटलमधल्या निष्काळजीपणाबद्दल आवाज उठवणाऱ्या भारतातल्या काही डॉक्टर्सना सध्या टीकेला सामोरं जावं लागतंय.
डॉ. राव यांच्यासोबत काय घडलं?
सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये अनेक गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी दिसत आहेत. शनिवारी (16 मे) हा सगळा प्रकार घडला.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

यामध्ये सुरुवातीला डॉ. राव त्यांच्या कारमध्ये बसलेले दिसतात. त्यांच्या अंगावर शर्ट नाहीये आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारमध्ये बसून ते पोलिसांवर ओरडतायत.
दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये ते रस्त्यावर पडलेले आहेत, त्यांचे हात मागे बांधलेले आहेत आणि एक पोलिस कॉन्स्टेबल त्यांना दंडुक्याने मारताना दिसतो. या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर शेवटच्या एका व्हीडिओमध्ये पोलिस त्यांना रिक्शामध्ये कोंबताना दिसतात. समोर भांबावलेल्या बघ्यांची गर्दी आहे.
पोलीस घेऊन जाण्यापूर्वी डॉ. राव तिथे जमा झालेल्या स्थानिक पत्रकारांशी बोलले.

फोटो स्रोत, UGC
पोलिसांनी आपल्याला अडवून जबरदस्तीने कारबाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. "त्यांनी माझा फोन आणि पाकिट हिसकावून घेतलं. त्यांनी मला मारहाण केली," राव यांनी आरोप केला आहे.
डॉ. राव यांना ताब्यात घेण्यात आल्याने वादाला सुरुवात झालीय. राज्यातलं सरकार ज्या प्रकारे परिस्थिती हाताळतंय यावर सोशल मीडिया युजर्स आणि इतरांनी टीका केलेली आहे. विरोधी पक्षांनीही या वाद उडी घेतली असून पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप केलाय.
डॉ. राव यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यामुळे हे प्रकरण अजूनच नाजूक झालंय.
डॉ. राव यांना का निलंबित करण्यात आलं?
काम करताना संरक्षण देणारे पुरेसे गाऊन्स आणि मास्क डॉक्टर्सना देण्यात येत नसल्याचं सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. राव यांनी 3 एप्रिलला मीडियाला सांगितलं होतं.
अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये याविषयी बोलल्यानंतर आपल्याला बैठकीतून बाहेर पडायला सांगण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
"एकच मास्क 15 दिवस वापरावा आणि त्यानंतर नवीन मास्क मागावा, असं आम्हांला सांगण्यात आलं. आम्ही आमचे जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार कसे करायचे?" स्थानिक न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी विचारलं. ही क्लिप लगेच व्हायरल झाली.
यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले पण सोबतच डॉ. राव यांना निलंबित करण्यात आलं. अधिकृतरित्या तक्रार दाखल करण्याऐवजी जाहीरपणे बोलल्याने आरोग्य सेवेतल्या लोकांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


यानंतर काही दिवसांनी डॉ. राव यांनी माफी मागणारा व्हीडिओ प्रसारित करत आपलं निलंबन रद्द करण्यात यावं अशी मागणी केली. पण सरकारने याला प्रतिसाद दिला नाही.
डॉ. राव काय म्हणाले?
कोव्हिड- 19 च्या रुग्णांवर उपचार करताना PPE किट्स उपलब्ध होत नसल्याबद्दल डॉ. राव यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांचा छळ होत असल्याचा आरोप डॉ. राव आणि त्यांच्या कुटुंबाने केलाय.
"गेल्या काही दिवसांपासून लोक मला फोनवरून धमक्या देत आहेत," असं डॉ. राव यांनी शनिवारी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, UGC
त्यांना कोणताही मानसिक आजार नसल्याचं त्यांची आई कावेरी राव यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं.
"तो एक नामांकित डॉक्टर आहे. पण त्याने आवाज उठवल्यापासून त्याला अडचणींना सामोरं जावं लागतंय. लोकं जेव्हा मला फोन करून त्याच्याबद्दल विचारतात, तेव्हा वाईट वाटतं. गेले काही आठवडे तो तणावाखाली आहे"
अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे?
हायवेवर एक व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार आल्यानंतर आपण त्याला प्रतिसाद दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही व्यक्ती म्हणजे डॉ. राव असल्याचं अधिकाऱ्यांना माहित नव्हतं, असं विशाखापट्टणमचे पोलीस कमिशनर आर. के. मीना यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं.
राव यांनी रस्त्यामध्ये लावण्यात आलेली बॅरिकेड काढण्याचा प्रयत्न करत दारूच्या बाटल्या भिरकावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोबतच पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी राव यांना पकडून त्यांचे हात दोराने बांधल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणणे आणि नासधूस करण्याबद्दल राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पण ही तक्रार कोणी दाखल केली, हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. पोलिसांनी सांगितलेल्या या घटनाक्रमाला अजून पर्यंत कोणत्याही साक्षीदाराने दुजोरा दिलेला नाही. पण एका व्हिडिओमध्ये एक पोलीस एका नागरिकाच्या मदतीने डॉ. राव यांच्या मुसक्या आवळत असताना दिसत आहे.
"ते पोलिसांशी उद्धटपणे वागले. एका कॉन्स्टेबलच्या हातातला मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांनी तो दूर फेकून दिला. त्यांना मानसिक अडचणी आहेत," मीना यांनी पत्रकारांना सांगितलं.
डॉ. राव यांना पहिल्यांदा पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि त्यानंतर प्राथमिक चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. इथल्या डॉक्टर्सनी राव यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
डॉ. राव यांची प्रकृती स्थिर असून 'त्यांच्या परिस्थितीचं संपूर्ण निदान करण्यासाठी' त्यांना दोन आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं हॉस्पिटलच्या सुपरिंटेंडंट डॉ. राधा राणी यांनी बीबीसी तेलगूला सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























