कोरोना लॉकडाऊन : पेणच्या गणेश मूर्तीशाळांवर परिणाम

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"हजारो गणेशमूर्ती तयार आहेत. अनेकजण गोडाऊन नसल्यानं त्या शेतात वाळवायला ठेवतात. आता पाऊस आला तर अनेक मूर्ती भिजून जातील, त्यांची विटंबना होईल."

पेणच्या हमरापूरचे कुणाल पाटील तिथल्या गणेश मूर्तीकारांची व्यथा मांडतात.

मुंबईजवळ रायगडमधलं पेण शहर आणि हमरापूरसारखी आसपासची गावं ही तिथं घडवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत. तिथल्या गल्ली गल्लीत छोट्या मोठ्या मिळून सुमारे साडेचारशे मूर्तीशाळा किंवा कारखाने आहेत.

गणेश चतुर्थी यंदा 22 ऑगस्टला आहे. गणेशोत्सवाला अवकाश असला, तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम पेणमध्ये जवळपास वर्षभर चालतं. सहा इंचांपासून ते काही फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती इथे बनवल्या जातात. तालुक्यातले जवळपास दोन लाख जण या व्यवसायात आहेत.

पण कोरोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, यंदा गणेशोत्सवावरच परिणाम होईल अशी चिन्ह आहेत. यातून कसं सावरायचं असा प्रश्न कुणाल पाटील यांच्यासारखे व्यावसायिक विचारत आहेत.

गणेशमूर्तींची निर्यात ठप्प

पेणच्या गणेशमूर्तींना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांबरोबरच राज्याबाहेरूनही मोठी मागणी असते. इंग्लंड, अमेरिका, मॉरिशससारख्या देशांमध्येही या मूर्तींची निर्यात होते.

हा सगळा व्यवहार कसा होतो, हे आम्ही शिल्पकार आणि पेणच्या श्री गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांच्याकडून जाणून घेतलं.

देवधर कुटुंबीय चार पिढ्यांपासून या व्यवसायात आहेत आणि पेणला गणपतींचं गाव अशी ओळख मिळवून देण्यात या कुटुंबाचाही वाटा आहे.

ते सांगतात, की साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या काळात निर्यात होणाऱ्या मूर्ती पाठवाव्या लागतात. पुढच्या परवानग्या आणि व्यवहार पूर्ण होऊन मगच मूर्ती गणेशोत्सवासाठी परदेशात दाखल होता.

"यंदा मार्चमध्येच लॉकडाऊन झालं. जगभरातच हे संकट आहे, साहजिकच तिथं यंदा मूर्ती घेणारंही कुणी नाही. त्यामुळं अजिबातच निर्यात होऊ शकलेली नाही. दुसरीकडे आमची मुख्य बाजारपेठ ही पुणे आणि मुंबईत आहे. तसं नाशिक, नागपूरलाही इथून मोठ्या प्रमाणात मूर्ती पाठवल्या जातात.

यातला बराच भाग आता रेड झोनमध्ये आहे. त्यामुळं पुढेही विक्री कशी आणि किती होईल हा प्रश्न आहेच," असं देवधर म्हणतात.

पेणमधल्या त्रिमूर्ती कला केंद्र या मूर्तीशाळेचे भरत पवार यांनाही लॉडाऊनचा फटका बसला आहे. "आमचा तीस टक्के व्यवसाय यंदा झालाच नाही. माझ्या कारखान्यात आत्ता अठरा ते वीस हजार मूर्ती तयार आहेत. पण लॉकडाऊनमुळे आम्ही त्या पाठवूही शकत नाही."

भरत यांच्या त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता. पण हे असं संकट पहिल्यांदाच समोर उभं राहिलं आहे.

"पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि प्रांत अधिकारी अशांना विनंती केल्यावर आता कारखाने सुरू झाले आहेत आणि राहिलेली कामं मार्गी लागतायत. पण ज्या मूर्ती विक्रेते आणि ग्राहकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हा प्रश्न आहे."

भरत तयार मूर्तींचा व्यवसाय करतात. तर हमरापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या मूर्ती तयार केल्या जातात. त्या कोकणात किंवा मुंबई पुण्यात पाठवल्या जातात, जिथे त्यावर पुढचं रंगकाम आणि सजावट केली जाते.

कुणाल पाटील सांगतात, "कोकणातून वाशी मार्केटला आंबा घेऊन गाड्या यायच्या त्या जाताना गणपतीच्या कच्च्या मूर्ती घेऊन जायच्या. पण यंदा लॉकडाऊनमुळे ऐन सीझनलाच मूर्तींची वाहतूक होऊ शकलेली नाही. आता वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे, पण केवळ दहा टक्के व्यवसाय होतो आहे.

कामगारांच्या समस्या

कोव्हिडची साथ, लॉकडाऊन आणि काही प्रमाणात घटलेली मागणी याचा परिणाम इथल्या कारखानदारांपेक्षा कामगारांना जास्त भोगावा लागतोय असं देवधर यांना वाटतं. ते सांगतात, की "एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला पंचवीस जणांच्या हातून जाते. एका कारखान्यात अनेकांना रोजगार मिळतो."

यात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा कारागिरांसोबतच मूर्तींना पॉलिश करणं, साधा रंग लावणं यापासून ते कारखान्यात झाडलोट करणारे, चहा पुरवणारे अशा लोकांचा समावेश आहे. स्थानिकांप्रमाणेच उत्तर भारतातून आलेले स्थलांतरितही इथं काम करतात.

"कारखानदार एकवेळ तग धरू शकतील. पण अशा लाखो कामगारांचा रोजगार पूर्णतः थांबला आहे. अनेक कारागीर दहा, वीस वर्षं अशा कारखान्यांत काम करत आहेत. अशा परिस्थितीतही त्यांना किमान पगार द्यायलाच हवा, कारखानदार तो देत आहेत."

बहुतेक कारखानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी व्यवसायात ओततात. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर पाच लाख ते पन्नास लाखांपर्यंतचं कर्ज आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुरानं काही कारखानदारांना आधीच नुकसान झालं होतं. त्यातून सावरतात तो हे संकट उभं राहिलं आहे.

कोव्हिडनं बदलली कामाची पद्धत

पेणमध्ये गणेशमूर्ती कारखान्यांना परवानगी मिळाली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत शासनाचे कडक नियम बंधनकारक आहेत. कामगारांमध्ये अंतर ठेवणं, सर्वांनी मास्क लावूनच काम करणं, हात धुण्याची किंवा सॅनिटायजरची सोय असे उपाय कारखानदार करताना दिसत आहेत.

त्यामुळं मुंबईत ऑगस्टपर्यंत दुकानं उघडू शकली नाहीत, तर घरपोच मूर्ती पोहोचवणं, सोसायटीजमध्ये थेट टेंपोतून मूर्ती नेणं, मोकळ्या मैदानात नियम पाळून विक्री करणं, असे पर्याय अवलंबून पाहता येतील, असं मूर्तिकारांना वाटतं.

श्रीकांत देवधर सांगतात, "बाहेरून मूर्ती आणणं काहीजण टाळण्याची शक्यता आहे. पण अजिबातच मूर्ती विकल्या गेल्या नाहीत तर व्यावसायिकांसमोर परिस्थिती कठीण होईल. लोकांनी यावर्षी कमी खर्चात उत्सव करणं स्वाभाविक आहे."

मुंबईतल्या मूर्तीकारांवरही परिणाम

पेणमध्ये वर्षभर गणेश मूर्ती घडवण्याचं काम चालतं, तर मुंबईत साधारण चार महिन्यांचा सीझन असतो. एप्रिल-मेमध्ये गणेश मंडळांसोबत चर्चा होते, मूर्तीचं चित्र ठरवलं जातं, मे महिन्याच्या अखेरपर्यंत कारागिरांची जुळवाजुळव होते आणि जूनपासून मूर्ती घडवण्याचं काम सुरू होतं.

"पण मार्चमध्येच लॉकडाऊन सुरू झालं. अनेकांचे फोन येत होते, पण सगळ्या गणेश मंडळांना, ग्राहकांना आम्ही सांगितलं आहे की लॉकडाऊननंतरच सगळा विचार करू," देवधर सांगतात.

परराज्यांतून येणारा कच्चा माल आणि कामगार यांचा तुटवडाही मूर्तिकारांना जाणवू शकतो. त्यामुळे गणेश मंडळांनीही लहान मूर्तींवर भर द्यायला हवा असं त्यांना वाटतं.

"एरवी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला आहे. पण आता परिस्थिती भयंकर आहे, तर आपण सर्वांनी ते समजून वागलं पाहिजे. लहान गणेशमूर्तींमध्येही तेच देवत्व असतं ना? मूर्तीचा आकार कमी झाला, साधेपणानं सण साजरा झाला, तर आर्थिकदृष्ट्‍या कोणावर भार पडणार नाही, आणि कारागीरांनाही थोडे पैसेही मिळू शकतील. उरलेला पैसा समाजकार्यासाठी देता येईल."

'प्लॅस्टर ऑफ पॅरीस'च्या मूर्तींवर बंदी

गणेशोत्सवाला अजून अवकाश असल्यानं सरकारनं त्याविषयी कुठला निर्णय घेतलेला नाही. मात्र मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनंच साधेपणानं सण व्हावा म्हणून गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली काढली आहे.

त्यात मोठ्या मंडळांनी वर्गणी घेऊ नये आणि मर्यादीत उंचीच्या मूर्तींची स्थापना करावी, शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, कमीत कमी कार्यकर्ते सहभागी व्हावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ अर्थात CPCBनं गणेश मूर्तींसंदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत, ज्याचा फटकाही मूर्तीकारांना बसू शकतो. नव्या निर्देशांनुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पण पेणमध्ये आधीच पीओपीच्या मूर्ती तयार आहेत. त्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. यंदा त्यातून सवलत मिळावी अशी अपेक्षा मूर्तीकार व्यक्त करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)