विशाखापट्टणम वायू गळती : 'पैसा नको, मला माझी मुलं हवीत'

बंतू सीता

फोटो स्रोत, VIJAY GAJAM/BBC

फोटो कॅप्शन, बंतू सीता
    • Author, विजय गजम
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळील आर. आर. वेंकटपुरम परिसरात एलजी पॉलिमर्स कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली.

या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर 400 हून अधिक लोक विशाखापट्टणमच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

अनेक कुटुंब या वायू गळतीच्या घटनेनं धक्क्यात आहेत. विशाखापट्टणमच्या किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दु:खात बुडालेल्या बंतू सीता यांच्याशी बीबीसीनं संवाद साधला. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

विशाखापट्टणम

फोटो स्रोत, Twitter

बंतू सीता यांचा पती आणि मुलगा गॅस गळतीच्या घटनेपासून बेपत्ता आहेत. त्यांचं पूर्ण कुटुंबच विखुरलं गेलंय.

बंतू सीता सांगता...

श्वास घेण्यास अजूनही त्रास होतोय, पण कालपेक्षा आज थोडं बरं वाटतंय. त्यांनी मला औषधं दिली आहेत. त्यांनी मला फ्लूइड दिलंय. आम्ही बारा वर्षांआधी वेंकटपुरम गावात आलो होतो. तेव्हा मी गरोदर होती. मी याआधी कधीच अशाप्रकारच्या घटनेबद्दल ऐकलं नव्हतं.

त्या दिवशी सकाळी एक व्यक्ती मदतीसाठी हाक मारत होता. पण आम्ही तिथं जाण्याच्या स्थितीत नव्हतो. आम्ही घाबरून पळू लागलो. आम्ही कुठे जातोय, हेही आम्हाला माहित नव्हतं. उलट्या झाल्यानंतर थोडं भानावर आलो. काही लोक आमच्या घराच्या दिशेनं धावत आले आणि त्यांनी सांगितलं की, गॅस गळती झालीय. त्यांनीही आम्हाला लवकरात लवकर पळायला सांगितलं.

अंधार असल्यानं घराच्या चाव्याही मिळत नव्हत्या. आम्ही घरात अडकलो होतो. मग आम्ही दरवाजा तोडून बाहेर आलो आणि पळू लागलो. काहीवेळानं आम्ही बेशुद्ध झालो. तिथं एक वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा होता. त्यांच्यासोबत नुकतेच लग्न झालेली 25 वर्षांची व्यक्ती होती.

'पैसा नको, मला माझी मुलं हवीत'

ती दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत होती, तर बाजूला असलेली 25 वर्षांची व्यक्ती मृत्युमुखी पडलेली. ती व्यक्ती आता हॉस्पिटलच्या शवागृहात आहे. कुणालाच त्या व्यक्तीचा पत्ता माहित नाहीय. माझी मुलंही बेपत्ता आहेत. मी त्यांना अजूनही शोधू शकली नाहीय.

विशाखापट्टणम

फोटो स्रोत, Getty Images

बेपत्ता झालेल्या लोकांबाबत सरकारनं अद्याप कुठलीही जाहिरात दिली नाहीय. मुलांबाबत कुठलीही माहिती नाहीये. आठपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याचं सरकार सांगतंय. नेमकं काय झालंय, हेच कळायला मार्ग नाहीय. पैसा कुणाला हवाय? आम्हाला पैसा नकोय.

आम्हाला आमची मुलं हवी आहेत. ते पुन्हा जन्मतील? मला माझ्या पतीबाबतही काही माहिती मिळत नाहीये. काही लोक सांगतायेत की, ते मृत्युमुखी पडले आणि मला धक्का बसेल म्हणून अधिक सांगत नाहीत. मला वाटतंय, मी त्यांना गमावलंय.

'माझी आई नाल्यात पडली आणि श्वास कोंडून तिचा जीव गेला'

वायू गळतीत आपली आई गमावलेल्या पवननं सुद्धा बीबीसीशी आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली.

या वायू गळतीमुळे माझी आई माझ्यापासून दुरावली. मला खूप दु:ख झालंय. आई नाल्यात पडली. श्वास घेऊ न शकल्यानं तिचा मृत्यू झाला.

पवन

फोटो स्रोत, VIJAY GAJAM/BBC

फोटो कॅप्शन, पवन

पहाटेचे तीन वाजले असतील. आमच्या शरीरात खूप वायू शिरला होता. आम्ही धावत धावत गेटजवळ आलो. श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता. आम्ही आणखी पुढे जाणार तोच आम्ही कोसळलो. माझी आई नाल्यात पडली आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्यानं तिचा तिथेच मृत्यू झाला. ती बाहेर येऊच शकली नाही.

'पतीचा मृतदेह सुद्धा पाहिला नाही'

ती सांगते, "माझ्या पतीनं मला ओढीतच घरातून बाहेर आणलं. त्यानंतर आमचं आम्हालाच कळलं नाही की, आम्ही कुठे जातोय. मी बेशुद्धच पडली होती. जेव्हा शुद्धीत आली, तेव्हा मी गोपालपट्टणममधील एका हॉस्पिटलमध्ये होती. त्यानंतर मला केजी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं."

नेबारी

फोटो स्रोत, VIJAY GAJAM/BBC

फोटो कॅप्शन, नेबारी

"त्यांनी मला सांगितलं की, मला माझं कुटुंब इथं मिळेल. माझ्या पतीबद्दल हॉस्पिटलमध्ये कुणीच काही बोलत नव्हतं. मात्र, नंतर सांगितलं गेलं की, पतीचा मृत्यू झालाय. मी माझ्या पतीचा मृतदेह सुद्धा पाहू शकले नाही. त्यांचं नाव नानी आहे. आमची दोन मुलं आहेत. माझे पती रोजंदारीवर काम करत असत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)