कोरोना लॉकडाऊन: मुंबई लोकलमध्ये पूर्वीसारखा गर्दीतून प्रवास होणं कठीण – नितीन गडकरी - BBC मुलाखत

फोटो स्रोत, Getty Images
सध्याची वेळ आणि संकट पाहता राजकारण करणं योग्य नाही, असा सल्ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांच्याशी संवाद साधला, तेव्हा कोरोनाचं महाराष्ट्रातलं संकट, लॉकडाऊन आणि एकंदर भविष्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली.
पाहा संपूर्ण मुलाखत -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नही करताना दिसतं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं?
महाराष्ट्रातली परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पण केलं आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यातली परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतंय आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये आमच्या सगळ्यांचं समर्थन आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याबाजूने उभे आहोत.

फोटो स्रोत, Nitin Gadkari/FACEBOOK
माझाही त्यांच्याशी समन्वय आहे. काही त्रुटी आढळली तर मी मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांना फोन करून सांगतो. ही परिस्थिती त्या त्रुटींची जाहीरपणे चर्चा करण्याची नाही आणि तसं करणं योग्यही होणार नाही.
यात राजकारण न करता आम्ही सगळ्यांनी मिळून या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे. राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. भारत सरकार त्यांच्या मागे उभं आहे आणि सगळ्यांनी मिळून कोरोनाविरोधातली लढाई जिंकली पाहिजे, हाच यात भाव आहे.
यात राजकारण करणं, टीकाटिप्पणी करणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, दोष काढणं हे बरोबर होणार नाही. ते या काळात काढू नये. एकदा ही लढाई संपल्यानंतर प्रत्येकाला आपापलं राजकारण करण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे.
तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहात, हे मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं. राजकारण करू नये, असं तुम्ही म्हटल्यांचं त्यांनी त्यांच्या संदेशातही सांगितलं होतं. पण दुसरीकडे तुमच्याच पक्षातले देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, किरीट सोमय्या यासारखे नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. बीबीसी मराठीशी बोलतानाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर स्पष्ट शब्दांमध्ये टीका केली होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही म्हणाला होतात की देवेंद्र फडणवीस तुमच्या धाकट्या भावासारखे आहेत. तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काय सल्ला द्याल?
ते माझ्या भावासारखेच आहेत. माझ्या पक्षातले आहेत आणि महाराष्ट्राचे नेते आहेत. पण मी आजकाल घरीच असल्याने कोणी काय वक्तव्यं केलं, याची माहिती नाही. मला जे वाटतं ते मी सांगितलं आहे. यापेक्षा जास्त काही टिप्पणी करून मला कुठल्याही राजकारणात उडी घ्यायची नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता सुरू आहे आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की यापुढे काय होणार? 17 मे नंतर काय होणार? लॉकडाऊन आणखी वाढणार, शिथील होणार, याबद्दल सरकारची नेमकी एक्झिट स्ट्रॅटेजी काय आहे?
यासंदर्भात पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. आमच्यासारख्या सर्व मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. आम्ही आपापल्या राज्यातून त्यांना फीडबॅक पाठवतो. त्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील वेगवेगळ्या समित्या आहेत. त्याचा रिपोर्ट घेऊन त्यांच्या पातळीवर ते आणि गृहमंत्री यासंदर्भातला अधिकृत निर्णय घोषित करतील.
पण मी एवढंच सांगू शकतो की देशात आणि विशेषतः काही राज्यात आणि काही शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढायचं आणि दुसरीकडे आपलं आयुष्य सुरळितपणे जगायचं, अशी पद्धत विकसित केली पाहिजे. तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शक्यतोवर आपल्या घरीच रहावं. घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे.
दुसरं दोन व्यक्तींमधलं सोशल डिस्टन्स एक मीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे. तिसरं म्हणजे जाता-येता हात सॅनेटायझरने स्वच्छ केले पाहिजे. याशिवाय उद्योजकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या मजुरांमध्ये संक्रमण होणार नाही, यासाठी अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करायला हवी.

फोटो स्रोत, ANI
त्याचबरोबर वाहतुकीदरम्यान संक्रमण होणार नाही, यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही राष्ट्रीय महामार्ग खुले केले आहेत. 65-70% ट्रॅफिक आलेलं आहे. सगळे पोर्ट्स सुरू झाले आहेत आणि आता हळूहळू कोरोनाच्या संकटामध्ये आपलं जीवनसुद्धा आपल्याला जगायचं आहे.
असं कायमचं घरात बसून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या अनुषांगिक जीवनपद्धती आपल्या सर्वांनाच शिकावी लागणार आहे.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

तुमच्या आत्ताच्या बोलण्यातून आणि मुख्यमंत्र्यांच्या, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांच्या बोलण्यातूनही हे दिसतंय की कोरोना यापुढेही काही काळ राहणार आहे, हे आपण गृहित धरायला हवं. तुम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी, तज्ज्ञांशी बोलत असता. आपण अजून किती महिन्यांची तयारी करायला हवी, याबद्दल तुमचा काय अंदाज आहे?
गोवा आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये कोरोनाचे शून्य रुग्ण आहेत. केरळमध्ये सुरुवातीला रुग्ण वाढत होते, मात्र आता त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मला वाटतं की आपण सर्वात आधी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या आजारावर लस मिळेपर्यंत थोडं असुरक्षिततेचं वातावरण असणार आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्ताची ओळख तात्काळ पटवणं, याबाबतीतली तांत्रिक प्रगती होणं गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर सध्या काम सुरू असल्यामुळे आपल्या सर्वांना थोडा संयम ठेवून अशापद्धतीने जीवन जगण्याची कला आपण हस्तगत केली पाहिजे.
मी जर विरारमध्ये राहणारा किंवा कल्याण-डोंबिवलीमध्ये राहणारा नागरिक असेन. मी गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये बसल्याशिवाय कामावर जाऊ शकणार नसेन. तर येणाऱ्या दिवसांमध्ये मी कशापद्धतीने काम करायचं. तुम्ही म्हणता तशी जीवन जगण्याची कला कशी हस्तगत करायची?
मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी यातूनही मार्ग काढलेला आहे. बरेज जण घरी बसून काम करत आहेत. उदाहरणार्थ, तुमचं ऑफिस दिल्लीत आहे. पण यावेळी तुम्ही तुमच्या घरात आहात आणि मी माझ्या घरात. तुम्ही घरी बसून माझी मुलाखत घेत आहात. अशाप्रकारे आपण घरी बसून मार्ग काढला आहे आणि घराबाहेर जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने अशापद्धतीने मार्ग काढला पाहिजे. ज्यांना शक्यच नाही. त्यांनी गेलं पाहिजे.
आता पूर्वीप्रमाणे खचाखच लोकल भरतील, अशी परिस्थिती होणं कठीण आहे. दुसरं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये रोज हजारो कामगार जात असतील. तर त्यांनी परिसरातच राहुट्यासारखी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल, अशी तात्पुरती व्यवस्था करावी.

फोटो स्रोत, ANI
सुरुवातीला 30-40% मनुष्यबळावर काम सुरू करावं. असे काहीतरी मार्ग काढले पाहिजे. आजही आपली विमानसेवा, रेल्वेसेवा आणि बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे अतिशय गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर संयम ठेवून लॉकडाऊन पाळण्याशिवाय पर्याय नाही. नाही पाळलं तर जीवावर बेतू शकतं.
ही जीवनमरणाची लढाई आहे आणि म्हणूनच आपल्याला काही गोष्टींबाबत तडजोड करावी लागेल. समजून घ्यावं लागेल. मर्यादा लक्षात घेऊन मार्ग काढावे लागतील. याशिवाय दुसरा पर्याय नाही.
तुम्ही म्हणताय समजून घ्यायला हवं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आज लाखो लोकांवर रस्त्यावरून पायी चालत जाण्याची वेळ आली आहे, या सगळ्याला केंद्र सरकारचं नियोजन नसणं कारणीभूत नाही का?
आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी माणसं आली आहेत की काही स्वखुशीने आलेली नाहीत. त्यांच्या गावात, त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या राज्यात त्यांना काम मिळालं नाही, म्हणून ती इतर राज्यांमध्ये आली आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणावर कामं सुरू केली होती. आमच्या खात्याने राष्ट्रीय महामार्ग बांधणीची कामं सुरू केली होती. संबंधित कंत्राटदारांनी साईटवरच्या त्यांच्या मजुरांची मार्गदर्शक तत्त्वांनुसार राहण्याची व्यवस्था केली होती. अशा या मजुरांचा रोजगार सुरक्षित राहिला तर या मजुरांचा आत्मविश्वास वाढेल.
दुसरी गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, ती अशी की सध्या लोकांमध्ये निराशा आहे आणि थोडी भीती आहे. या भीतीमुळे प्रत्येकाला वाटतं की आपण आता आपल्या घरी जावं. त्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. याउपरही कुणाला जायचं असेल तर त्यांच्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांना त्यांच्या राज्यापर्यंत जाण्याची व्यवस्था केली आहे. पण, शेवटी ही जबाबदारी सर्वांची आहे. समाजाची आहे, सरकारची आहे, जबाबदार नागरिकांची आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, नेते सगळ्यांचीच आहे.

फोटो स्रोत, Nitin Gadkari/FACEBOOK
अमेरिकी सरकारने अमेरिकी जनतेसाठी दोन ट्रिलीयन (200 अब्ज) डॉलर्सचं पॅकेज दिलं आहे. आपल्या देशात लघू आणि मध्यम उद्योजकांची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला ठावूक आहे. आम्ही रोज सकाळी 8 वाजता जे CoronaPodcastकरतो त्यात अनेक जण आम्हाला विचारतात की सरकार आम्हाला काही मदत करणार आहे का? त्यामुळे काही पॅकेज देण्याचा सरकारचा विचार आहे का?
मी माझ्या खात्यातर्फे अनेक लोकांशी बोललो. त्यांची निवेदनं स्वीकारली. त्या निवेदनांचा अभ्यास केला आणि त्यानंतर जे काही करण्यासारखं होतं ते आमच्या विभागाच्या पातळीवर आम्ही निर्णय केले आणि जे आमच्या हातात नाही त्याबाबतीत आम्ही केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे शिफारशी केल्या आहेत. मला विश्वास आहे की या सर्वांचा विचार करून सर्वांना दिलासा देणारं एक मोठं पॅकेज सरकारकडून येईल. पण, त्याव्यतिरिक्त आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेले आहेत.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) बाबतीत सांगायचं तर 31 मार्चपर्यंत आम्ही 6 लाख MSME रिस्ट्रक्चर केल्या होत्या. ती मुदत आम्ही 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यात 25 लाख MSME चं रिस्ट्रक्चर होईल. याशिवाय 20% वर्किंग कॅपिटल वाढीचा निर्णय झालेला आहे. तसंच गृहकर्जापासून सर्व प्रकारच्या कर्जासाठी तीन महिन्यांसाठी दिलासा मिळाला. याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी सरकारने केल्या आहे. अजून करेल.
सरकार या संकटावेळी सर्वांसोबत आहे. पण, ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थाचा आकार, जपानच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार, या सर्वांचा आपण विचार केला पाहिजे. आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज सगळेच संकटात आहे. भारतात MSME संकटात आहे, मजूर संकटात आहेत. राज्य सरकारही संकटात आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या महिन्यात पगार देण्यासाठी पैसे नाहीत. केंद्र सरकारचा महसूल कमी झाला आहे. बँकिंग व्यवस्था संघर्षातून मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे प्रत्येकजण अडचणीत आहे.

फोटो स्रोत, ANI
त्यामुळे या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांना सोबत घेऊन, कुणीही घसरणार नाही, याची काळजी घेऊन सर्वांनी मिळून पुढे गेलं पाहिजे. कदम से कदम मिलाकर जाना होगा, या अटलजींच्या कवितेप्रमाणे पुढे जावं लागेल. पण अमेरिकेने जे केलं, जपानने जे केलं ते भारताने केलं पाहिजे, अशी अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तरीही आपल्या सरकारने जनधन योजनेअंतर्गत सर्वांच्या खात्यात पैसे जमा केले. अन्नधान्याची भांडारं खुली केली. नाममात्र किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. तसंच वैद्यकीय क्षेत्रातल्या आयुष योजनेतंर्गत लोकांना मदत करणं सुरू आहे. त्यामुळे सरकारही या सर्वांच्या बाबतीत संवेदनशील आहे. सर्वांच्या मागे आहे आणि जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करील, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















