विशाखापट्टणम वायू गळती : 13 जणांचा मृत्यू, शेकडो अस्वस्थ

    • Author, विजय गजम
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

विशाखापट्टणम शहराजवळच्या एका केमिकल कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अस्वस्थ आहेत. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना गुरूवारी पहाटे घडली.

मृतांपैकी तीन मृतदेह कंपनीच्या प्लांटजवळ आढळून आले तर अस्वस्थ वाटत असल्यामुळे किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचं आढळून येत आहे.

पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे.

काही जण हा वायू नाकावाटे शरिरात गेल्यामुळे बेशुद्ध झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या गॅस गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

गॅस गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हा केमिकल प्लांट एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं आहे. 1961 मध्ये सुरू झालेलं हे प्लांट हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचं होतं. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली.

200 जण या घटनेमुळे अस्वस्थ झाले आहेत. स्टायरिन गॅस या वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय चांद यांनी दिली आहे.

लॉकडाऊननंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी ही घटना घडल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

पीडित व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 15 जणांना दाखल करण्यात आलं आहे.

गुरुवारी पहाटे 3 वाजता ही गॅस गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आलं नाही. पण हळूहळू गॅसगळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. हा वायू कारखान्यापासून तीन ते पाच किलोमीटरपर्यंत पसरल्याचा अंदाज आहे.

स्टायरिन वायू म्हणजे काय ?

स्टायरिनचा प्राथमिक उपयोग हा पॉलिस्टिरिन प्लास्टिक आणि रेसिन्स (राळ) बनवण्यासाठी होतो. स्टायरिन गॅस हा रंगविरहीत किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा असतो. हा एक ज्वलनशील द्रव्य असून त्याचा गोड वास येतो. या गॅसला स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन म्हणूनही ओळखले जाते.

बेन्झिन आणि इथिलीनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, वापरून टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो.

माणसांवर स्टायरिनचा काय परिणाम होतो?

हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि फुफूस जड होते. हा वायू जास्त प्रमाणात माणसाच्या संपर्कात आला तर त्याला स्टिर्न सिकनेस होतो. यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, चक्कर येणे, शौचात अनियमितपणा येण्याची लक्षणं आढळतात.

काहीवेळा यामुळे ह्रदयाचे ठोके अनियमित होतात आणि माणूस कोमात जाण्याची शक्यता असते.

त्वचा स्टायरिन शोषून घेऊ शकते. अशी व्यक्ती जर अनेकांच्या संपर्कात आली तर केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करते तसंच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशाच प्रकारचा त्रास स्टायरिन गॅस शरिरात गेल्यावरही होऊ शकतो. त्वचा आणि डोळे जळजळ करतात.

स्टायरिनमुळे लूकेमिआ आणि लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो असं साथीच्या रोगाचे संशोधन सांगते. पण अपुऱ्या पुराव्यांमुळे हा दावा सिद्ध होऊ शकलेला नाही.

सामान्य व्यक्तीं स्टायरिन वायूच्या थेट संपर्कात येऊ शकतात का?

स्टायरिन वायूचा उपयोग हा औद्योगिक रसायनांसाठीच होतो. त्यामुळे जर तुम्ही स्टायरिन वायूला कामासाठी हाताळत असाल तरच तुम्ही त्याच्या थेट संपर्कात येऊ शकता. पण सामान्य व्यक्तीशी त्याचा थेट संपर्क होण्याची शक्यता कमी आहे.

प्लॅस्टिक नष्ट न होता त्यापासून राहीलेल्या काही भागापासून अगदी कमी प्रमाणात स्टायरिन वायूशी तुमचा संपर्क होऊ शकतो. किंवा नैसर्गिकरित्या वातावरणातूनही होण्याची शक्यता असते. पण याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

वायूगळती नियंत्रणात

विशाखापट्टमण मध्ये झालेली वायूगळती आता नियंत्रणात आली आहे असं दक्षिण कोरियाच्या LG chem या कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपात्कालीन सेवेच्या लोकांनी आसपासच्या खेड्यातील 3 किलोमीटर च्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

"आम्ही आता परिस्थितीची पाहणी करत आहोत. आसपासच्या परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांची आणि आजूबाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेची आम्ही प्रशासनाच्या सहाय्याने काळजी घेत आहोत." असं LG polymer कंपनीचे प्रमुख एल.जी.केम यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेतली आहे.

विशाखापट्टणममधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाशी चर्चा केली असून याकडे बारीक लक्ष ठेवलं आहे. इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

विशाखापट्टणमध्ये उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनास योग्य कारवाई करण्याची सूचना केली आहे. वायू गळतीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)