कोरोना: शिवसेना योगी आदित्यनाथांवर कडाडली, 'मजुरांना स्वगृही न घेणं हे पालघर हत्याकांडाइतकंच अमानुष'

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. मजुरांना स्वगृही न घेणे हे पालघरमधील साधू हत्याकांडाइतकेच निर्घृण - शिवसेना
लॉकडाउनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांची स्वगृही परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. पण काही राज्ये आता या मजुरांना स्वगृही घ्यायला तयार नाहीत. यावरून शिवसेनेनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे.
सीमेवरून परत जा अशी अरेरावी ज्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकाडांइतकाच हा निघृण प्रकार आहे. असं सामनाने अग्रलेखात म्हटलं आहे.
"लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे," अशा शब्दात योगी सरकारवर शिवसेनेनी टीका केली आहे.
2. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव- अशोक चव्हाण
देशभरात लाखो मजूर, नागरिक विविध राज्यांत अडकलेत याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसनं केलीय.

फोटो स्रोत, Twitter
लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा अचानक लागू न करता आठवडाभराचा वेळ दिला असता तर सर्व नागरिक आपआपल्या घरी वेळीच पोहचले असते असं मत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. लोकसत्ताच्या 'वेबसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. ही बातमी लोकसत्ताच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

कोरोना उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने गोंधळ उडला असंही अशोक चव्हाण म्हणाले. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्याने केंद्र सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशा वेळी सरकार कुणाचं आहे हे बघू नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोना आरोग्य संकटातून आपण खूप काही शिकलो असून मुंबई,पुणे शहरातली गर्दी आपण कमी करायला हवी. नियोजनबद्ध नवीन शहरं विकसित करण्याची गरज असल्याचंही अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवलं.
3. आयटी, मिडिया क्षेत्रात नोकऱ्या जाण्याची भीती, लिंकडिनचा अहवाल
पुढील सहा महिन्यात नोकरीबाबतची अस्थिरता गंभीर होत जाईल अशी भीती लिंकडिनने आपल्या पाहणी अहवालातून व्यक्त केलीय. सकाळ वृत्तपत्राच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC
कोलमडलेली अर्थव्यवस्था, वेतन कपात आणि नवीन संधीची कमतरता यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता दिसून येत आहे. आयटी, मिडिया आणि उत्पादन क्षेत्रात असलेल्या नोकरदार वर्गाला आपल्या नोकरीची चिंता वाटते आहे. लिंक्डइन हे मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे कर्मचाऱ्यांशी निगडित असलेले सर्वात मोठे नेटवर्क आहे.
4. पाच दिवसांत पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर दुप्पट
कोरोना व्हायरसमुळे देशातला सर्वाधिक मृत्यूदर पश्चिम बंगालमध्ये असल्याचे केंद्रीय समिताने आधीच स्पष्ट केले आहे. गेल्या पाच दिवसात पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट झाल्याचं समोर आलंय.
23 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत 33 जणांचा मृत्यू झाल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. त्यानंतर गेल्या पाच दिवसात आणखी 35 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालमध्ये सरकार मृत्यूमागचे कारण कोरोना व्हायरस असल्याचे स्पष्ट करत नसल्याने आकडा समोर येत नाही असा अहवाल केंद्राच्या समितीने दिला आहे. कोरोनाच्या टेस्ट कमी होत असल्याने व्यक्तीच्या मृत्यूचे कारण कोरना असल्याचे दाखवले जात नसल्याची बाबत समितीने समोर आणल्यामुळे प.बंगालने जाहीर केलेल्या आकड्यांबाबत शंका वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थान टाईम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
5. देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल माडियावर ट्रोल करण्यात येत असून त्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार नागपुरातील भाजप आमदारांनी केलीय. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे भाजप आमदारांनी ही तक्रार केलीय. लोकमत वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतही भाजप आमदारांनी अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे केली आहे. विरोधीपक्ष नेतेम्हणून सरकारवर टीका करण्याचा देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण हक्क असल्याचे सांगत असा कोणताही मुद्दा उचलला की त्यांना सोशल मिडीयावर जाणीवपूर्वक ट्रोल केलं जात असल्याचं भाजप आमदारांचे म्हणणे आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























