पृथ्वीराज चव्हाण: मोदी सरकारचे अपयश दाखवण्यात काँग्रेस कमी पडली #5 मोठ्या बातम्या

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या
1. मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हाण
गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने देशाचे आर्थिक धोरण बदलणारे मोठे निर्णय घेतले. पण नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले.
सरकारचे हे अपयश जनतेला पटवून देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी दिली. लोकसत्तातर्फे आयोजित 'वेबसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.
नोटाबंदी आणि जीएसटीसारखे मोठे निर्णय मोदी सरकारने कुणाचाही सल्ला न घेता घेतले असून त्याची किंमत देशाला आर्थिक स्तरावर मोजावी लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ही बाब संसदेत हिंदीमध्ये मुद्देसूदपणे मांडता आली असती पण हे करण्यात काँग्रेस कमी पडली.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराविषयी वृत्तपत्रांमधील लेखांमधून टीका केली आहे. पण हा विषय पुढे नेत देशभरात जनतेला समजेल अशा स्थानिक भाषेत याची मांडणी करता आली असती, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
2. जनतेवर प्रशासनाचे नियंत्रण असायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळताच सोमवारी स्थानिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केल्याची दृश्य पहायला मिळाली. हे गंभीर असून यावर पोलीस आणि प्रशासनाचे नियंत्रण असलेच पाहिजे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Twitter
मद्यविक्रीला परवानगी दिली म्हणजे लॉकाडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस यांच्यावर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. आपला विभाग ग्रीन झोनमध्ये कसा येईल हे प्रशासनाने पहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
3. योगी सरकारच मजुरांना उत्तर प्रदेशात प्रवेश देत नाहीये - नवाब मलिक
कामगारांना आपल्या राज्यात परत पाठवण्याच्या मु्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद दिसून आले. अशातच कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
द क्विंट हिंदी वेबसाईटने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील जवळपास 25 ते 30 लाख लोक आहेत. या लोकांना परत नेण्यासाठी राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली. पण योगी सरकार यामध्ये अटी शर्ती समोर ठेवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
कामगारांना कोरोनाची टेस्ट करुन पाठवा अशी भूमिका योगी आदित्यनाथ सरकारने घेतल्याचं सांगत लोकांना परत घेण्यास ते टाळाटळ करत असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.
30 लाख लोकांच्या टेस्ट करायला दीड वर्ष लागू शकतं, त्यामुळे अडचणी निर्माण न करता इतर राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही परवानगी द्यावी अशी विनंती राज्य सरकार पुन्हा करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.
4. लॉकडाऊनमुळे नियोजित विकासकामांना कात्री
कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटामुळे राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पण लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे सरकारने नियोजित विकास कामांना कात्री लावली आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे. राज्य सरकारने विकास योजनांवर 67 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक कपात असल्याचं म्हटलं जातंय. तसंच वर्षभरात नियोजित केलेल्या कार्यक्रमांचा नव्याने आढावा घेऊन त्याविषयीची माहिती अर्थ खात्याला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
5. दिल्लीत दारू महागली, खरेदीवर 70 टक्के अधिकचा कर मोजावा लागणार
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही सोमवारपासून केजरावील सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. पण दिल्लीत आता दारू खरेदी करायची असेल तर 'विशेष कोरोना कर'म्हणून 70 टक्के अधिकची किंमत मोजावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी अशा सूचना केजरीवाल यांनी पोलिसांना केली आहे. दारूच्या बाटलीवर असलेल्या एमआरपी किंमतीच्या 70 टक्के अधिक किंमत आता ग्राहकाला द्यावी लागणार आहे.
म्हणजेच 1000 रुपये किमतीची दारूची बाटली 1700 रुपयांची असेल. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असल्याने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दिल्लीतील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















