You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पालघर: लॉकडाऊनमध्ये चोर समजून जमावाने केली तिघांची ठेचून हत्या #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. पालघरमध्ये चोरीच्या संशयावरून तिघांची जमावाकडून ठेचून हत्या
गुजरातमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तिघांची संतप्त जमावाने चोर समजून हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 110 लोकांना ताब्यात घेतलं आहे.
कांदिवली येथील तिघेजण गुजरातमधल्या सुरतला जाऊ इच्छित होते. मात्र चारोटी इथं त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे त्यांनी विक्रमगड-दाभाडी-खानवेलमार्गे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ संतप्त जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली.
काहींना गाडीतून उतरवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक झाल्याने त्यांना परतावं लागलं. जमावाने दगड, काठ्या आणि अन्य साहित्याने मारहाण सुरूच ठेवली.
यात चिकणेमहाराज कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी महाराज आणि नीलेश तेलगडे या तिघांचा मृत्यू झाला.
ही घटना अफवा आणि भीतीमुळे घडल्याचं पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी सांगितलं. "राज्यात लॉकडाऊन असताना चोर, दरोडेखोर आणि मूत्रपिंड काढण्यासाठी वेशांतर करून येत असल्याची अफवा पसरली होती. त्यातून हा प्रकार घडला.
"मी पालघरच्या नागरिकांना विनंती करतो की कृपया घाबरू नका, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुणीही तुमच्या मुलांना किडनॅप करायला, तुमची किडनी चोरून न्यायला येत नाहीये. अशा अफवा पेरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल," असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
2. तीन महिने भाडे न घेण्याच्या घरमालकांना सूचना
घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
यामध्ये 23 मार्च ते 3 मे 2020 या काळात लॉकडाऊन असल्याकारणाने बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने आणि एकूणच आर्थिक व्यवहार बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला असून अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन बंद आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
या बिकट आर्थिक स्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे भाडेकरू कडून थकल्याने त्याला भाड्याच्या घरातून निष्कसित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाकडून घर मालकांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
3. कोरोनाबाबतचं समुपदेशन करणाऱ्या नर्सची वाहने जाळली
लॉकडाऊन असतानाही बाहेर खेळणाऱ्या मुलांना, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे, तो संपर्कामुळे होतो, असं वारंवार सांगणाऱ्या एका नर्सची गाडी जाळण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात घडला.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
सुरेखा पुजारी असं या नर्सचं नाव आहे. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात रोज 8 ते 10 तरुण खेळायचे. या मुलांना कोरोनापासून सावध राहण्यासाठी पुजारी रोज हटकायच्या, पण ही मुलं त्यांना उलट उत्तर द्यायची.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना त्यांच्या घराबाहेरील दोन्ही गाड्या जळालेल्या दिसल्या. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
4. 'त्या' रोहिंग्यांना शोधा, केंद्रीय गृहमंत्रालयाचं राज्यांना पत्र
रोहिंग्या आणि तबलीगी जमातमधील कनेक्शनचा तपास करावा, अशा सूचनेचं पत्र केंद्रीय गृहमंत्रालानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलं आहे.
रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्याशी संबंधीत असलेल्यांची करोना तपासणी करावी. यासंबंधी आवश्यक ती पावलं उचलावी, असं गृहमंत्रालयाने पत्रात म्हटलं आहे. NDTV ने ही बातमी दिली आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी जमातच्या मरकज अर्थात मुख्यालयात एका धार्मिक कार्यक्रमात रोहिंग्याही सहभागी झाले होते. यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलंय.
ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या राहत आहेत त्या राज्यांचा उल्लेखही पत्रात केला आहे. खासकरून नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरयाणा येथे तपास करावा, असं सांगण्यात आलंय.
5. कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे दाखल
राज्यात लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत, तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70,307 फोन आले. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची चुकीची बातमी दिल्यामुळे टाइम्स नाऊच्या पत्रकाराविरोधात कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
हे नक्की पाहा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हालाफेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)