कोरोना व्हायरस : झूम अ‍ॅपचा वापर असुरक्षित – गृह मंत्रालयाकडून सूचनापत्र#5मोठ्याबातम्या

झूम

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. झूम अ‍ॅपचा वापर असुरक्षित – गृह मंत्रालय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनदरम्यान लोक झूम व्हीडीओ कॉलिंग/ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मात्र, झूम अ‍ॅपसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक सूचनापत्र काढले आहे.

झूम अ‍ॅप सुरक्षित नाही. त्यामुळे लोकांनी सतर्क राहून याचा वापर करावा, असं यामध्ये म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

याआधीही केंद्र सरकारने 6 फेब्रुवारी आणि 30 मार्चला लोकांना झूम अ‍ॅप संदर्भात सतर्क राहण्यास सांगितले होतं, असंही गृह मंत्रालयाने या पत्रकात म्हटलं आहे.

कोरोना
लाईन

जर लोक झूम अ‍ॅपचा वापर करत आहेत तर काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

मंत्रालयाच्या सूचना -

  • प्रत्येक मीटिंगसाठी नवा युजर आयडी, पासवर्डचा वापर करा.
  • वेटिंग रुमला एनेबल करा. त्यामुळे कॉन्फरन्स करणारा जोपर्यंत परवानगी देत नाही, तोपर्यंत कोणताही युजर कॉलमध्ये सामील होऊ शकत नाही.
  • जॉइन ऑप्शनला डिसएबल करा.
  • स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन फक्त होस्टजवळ ठेवा.
  • कोणत्याही व्यक्तीसाठी रिजॉइनचा ऑप्शन बंद करा.
  • फाइल ट्रान्सफरचा ऑप्शन कमीत-कमी वापरा.

2. रेशनची दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार- छगन भुजबळ

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दर महिन्याचे धान्य वाटून प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना दिले आहेत.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, Chhagan Bhujbal/Facebook

फोटो कॅप्शन, छगन भुजबळ

हे तांदूळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कुटुंबीयांना, अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी कुटुंबीयांना वाटप करण्याचे आदेश त्यांनी आहेत.

आतापर्यंत 12 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत 4 लाख 60 हजार 387 रेशनकार्डधारकांना या धान्याचे वाटप करून मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे, तर 16 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यत 1 लाख 7 हजार 211 इतक्या रेशन कार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे.

जून 2020 पर्यंत मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3. चीनकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग कीट भारतात दाखल

कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनकडून मागवलेल्या टेस्टिंग किट्सपैकी 5 लाख कोरोना टेस्टिंग कीट भारतात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

सुरक्षा कीट

फोटो स्रोत, Getty Images

चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की, "चीनमधून एकूण साडे सहा लाख टेस्टिंग किट्स पाठवण्यात आल्या आहेत."

दरम्यान, भारतात गुरुवारी (16 एप्रिल) आतापर्यंत एका दिवसांत सर्वाधिक म्हणजेच 30 हजारहून अधिक जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

4. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 15 दिवसात जमले 245 कोटी

दोन आठवड्यात मुख्यमंत्री साहायत्ता निधीमध्ये 245 कोटींची रक्कम जमा झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

कोराना विषाणुविरुद्ध लढतांना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील जनतेने प्रतिसाद दिला.

ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

5. 'स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करा'

सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचं संकट देशात राज्यात वाढत असताना नियोजित एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परिक्षेवर सुद्धा टांगती तलवार आहे.

उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या निकषांमध्ये वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करण्यात यावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)