कोरोना व्हायरसः लॉकडाऊन नसतं, तर भारतात 15 एप्रिलपर्यंत 8.2 लाख रुग्ण असते... #5मोठ्याबातम्या

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, SANDEEP RASAL/SOPA IMAGES/LIGHTROCKET/GETTY IMAGES

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत...

1) लॉकडाऊन नसतं, तर भारतात 15 एप्रिलपर्यंत 8.2 लाख रुग्ण असते...

भारतात लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोनची घोषणा केली नसती तर 15 एप्रिलपर्यंत भारतात 8.2 लाख रुग्ण आढळले असते, असा अंदाज आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केलाय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे..

ही आकडेवारी कोणत्याही अहवालातील नाही असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना आकडेवारीचं विश्लेषण करत हा अंदाज व्यक्त केला.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, PRATIK CHORGE/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES

"भारतानं कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी तत्परतेनं पावलं उचलली. शिवाय, परिस्थितीनिहाय दृष्टिकोनही ठेवला," असंही लव अग्रवाल यांनी म्हटलं.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

2) सांगलीतील 26 पैकी 24 रुग्ण बरे, 22 जण घरी परतले

सांगली जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढत असताना, प्रशासनानं त्यावर नियंत्रण मिळवलंय. सांगलीत आतापर्यंत 26 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 24 रुग्ण बरे झाले असून, 22 जणांना घरीही पाठवण्यात आलंय. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

सांगलीतल्या इस्लामपूर शहरातले हे सर्व रुग्ण होते. 23 मार्च रोजी सौदी अरेबियातून परतलेल्या चार जणांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 21 नातेवाईकांनाही संसर्ग झाला. त्यात दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश होता.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

या रुग्णांपैकी एकाचा अहवाल 5 एप्रिल रोजी निगेटिव्ह आला. त्यानंतर बाकीच्या रुग्णांचीही पुन्हा चाचणी घेण्यात आली, तर तेही निगेटिव्ह आले.

दोघांना अजूनही हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलंय, कारण त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अलगीकरण कक्षात आहे.

ज्या रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय, त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनच्या सूचनाही देण्यात आल्यात.

3) उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर 72 तासात 15,500 डॉक्टरांचे अर्ज

कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासेल, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मुंबई मिररनं ही बातमी दिलीय.

उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर 72 तासात तब्बल 15 हजार 500 जणांनी अर्ज दाखल केला असून, यात डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय शिक्षक, तंत्रज्ञानाचे जाणकार यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, CMO Maharashtra

सर्व वयोगटातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय.

दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसतेय. त्यात मुंबई देशभरातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलीय.

4) मुंबईतील ताज हॉटेलच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील ताज हॉटेलच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

कोरोना
लाईन

तसंच, "ज्या कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, त्यांच्यासह कोरोनासदृश लक्षणं आढळलेल्या कर्मचाऱ्यांनाही क्वारइंटाईन करण्यात आलंय. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचनांचं पालन केलं जातंय," असं द इंडियन हॉटेल्स कंपनीनं पत्रकात सांगितलं. ही कंपनी ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाचं काम पाहते.

कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी ताज हॉटेलनं आपल्या इमारतीत व्यवस्था करुन दिली आहे. तसंच, हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खाद्यपदार्थही पोहोचवले जात आहेत.

5) गरजूंना मदत करताना फोटो काढल्यास तुरुंगवास

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं हातावर पोट असलेल्या कामगार वर्ग हालाखीच्या स्थितीत आहे. अशांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. मात्र, काहीजण मदतीचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. राजस्थान सरकारनं अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाईचा निर्णय घेतलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

राजस्थानमधील अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वास मोहन शर्मा यांनी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

मदतीचे फोटो काढणाऱ्यांविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या गुन्ह्याअंतर्गत सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.

गेल्या काही दिवसात मदतीच्या नावानं अनेक सेवाभावी संस्थांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याचं समोर आलं. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)