कोरोना व्हायरस: हायड्रॉक्सिक्लोरोक्विन अर्थात HCQ निर्यात केल्याने भारतीय रुग्णांचे हाल होणार का?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोव्हिड-19वरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची मागणी भारताकडे केली होती. त्यानंतर भारताने या औषधाची निर्यात करण्याचा निर्णय घेतला.
पण भारत सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या मनात चिंता निर्माण केली आहे.
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा HCQ हे मलेरियावरचं औषध आहे. त्याचा वापर ऱ्हुमेटॉईड आर्थ्रायटिस आणि ल्यूपस यांच्यासारख्या ऑटो-इम्यून आजारांवरसुद्धा केला जातो.
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोव्हिड-19 वर परिणामकारक ठरू शकतं, अशी माहिती काही प्रयोगशाळांनी दिली आहे. पण हे अद्याप खात्रीशीरपणे सांगू शकत नाही, असं दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले आहेत.
"हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध सर्वांवर लागू होईल, असंही नाही. त्यामुळे रुग्णांवर इतर दुष्परिणाम दिसू शकतात. अशा स्थितीत ते उपयोगी ठरण्यापेक्षा धोकादायक ठरू शकतं," असंही ते म्हणालेत.
पण राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात हे औषध 'गेम-चेंजर' असल्याचं म्हटलं होतं. जॉन हॉपकिन्स ल्यूपस सेंटरने याची व्याख्या 'ल्यूपस लाईफ इंश्यूरन्स' अशी केलेली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात रोज हजारो लोक हे औषध घेतात, पण सध्या हे औषध खूप चर्चेत आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
पण भारतातील रुग्ण मागच्या दोन आठवड्यापासून चिंताग्रस्त दिसून आले, कारण मेडिकलमधून हे औषध गायब होत चाललंय.
मेडिकलमध्ये दुकानांत औषधाची टंचाई
कोलकात्यात राहणाऱ्या बरनाली मित्रा ल्यूपसने पीडित आहेत. त्या गेल्या 17 वर्षांपासून हे औषध दररोज 200 मिलिग्रॅम या प्रमाणात घेतात. हे औषध त्यांच्यासाठी संजीवनी ठरल्याचं त्या सांगतात.
त्यांनी फोनवर बोलताना सांगितलं, या औषधामुळेच माझे हात-पाय चालू शकतात.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

काही दिवसांआधीपर्यंत मित्रा यांना मेडिकलमध्ये हे औषध मिळायचं. पण मागच्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध विकता येणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
तसंच डॉक्टरांची पावती दाखवल्यानंतरही एक व्यक्ती या औषधाच्या फक्त दहा गोळ्या विकत घेऊ शकतो.

फोटो स्रोत, REUTERS
जवळपास अनेक दुकानं शोधल्यानंतर आणि ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर मित्रा 20 गोळ्या मिळवू शकल्या. पण पुढे काय होईल, याची काळजी त्यांना सतावत आहे.
त्या सांगतात, "मी इतकी अस्वस्थ आहे की माझ्या चेहऱ्यावर चट्टे पडले आहेत. माझ्या डॉक्टरांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, पण औषधाचा शोध घेण्याच्या विचाराने मी चिंताग्रस्त होते."
भारत सर्वात मोठा उत्पादक
भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश आहे. नुकतेच या औषधाच्या निर्यातीवर भारताने निर्बंध घातले होते.
देशातल्या नागरिकांना याची सर्वप्रथम आवश्यकता आहे, असं सरकारने म्हटलं होतं. पण गेल्या मंगळवारी याच्या निर्यातीवरचे निर्बंध हटवण्यात आले.
कोरोना व्हायरसविरुद्ध लढत असलेल्या देशांना याचा पुरवठा केला जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारच्या या निर्णयामुळे मित्रा यांच्यासारख्या अनेक रुग्णांची काळजी वाढली आहे. मात्र भारतीयांनी याची काळजी करू नये, असं इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA)ने सुद्धा म्हटलं आहे.
हे औषध कोव्हिड-19 वरच्या उपचारासाठी वापरलं जातं, या बातम्या कळल्यानंतर विक्रेत्यांनी याचा साठा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच याची टंचाई निर्माण झाली, असं IPAचे अध्यक्ष प्रोफेसर टी. व्ही. नारायण यांनी बीबीसीला सांगितलं.
ही टंचाई तात्पुरती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इप्का आणि झायडस कॅडिला मोठे उत्पादक
टी व्ही नारायण सांगतात, "भारतात इप्का लॅब्स आणि झायडस कॅडिला हे या औषधाचे प्रमुख उत्पादक आहेत. दोन्ही कंपन्या प्रतिदिन 15 लाख टॅबलेट्स बनवू शकतात.
"हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसाठीचा कच्चा माल देशातच मिळतो. सध्या आपल्याकडे पुरेसा माल उपलब्ध आहे. इप्का लॅब्सकडेच 5 कोटी टॅबलेट्सचा साठा आहे," असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
बहुतांश राज्यांकडे 10-20 लाख टॅबलेट्सचा स्टॉक आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होण्याचा प्रश्न नाही.
नारायण पुढे सांगतात, "अमेरिकेने 3 कोटी गोळ्या मागितल्या आहेत. ही मागणी सहजपणे पूर्ण करता येऊ शकते. ज्या रुग्णांना या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांना या गोळ्या मिळण्यात काहीच समस्या नाही. फक्त काही दिवस थोडीफार अडचण येऊ शकते."
बंगळुरुत राहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना शाह वेदनेपासून सुटका मिळण्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनवर अवलंबून आहेत.
शाह यांच्या मते, हे औषध न मिळाल्यास त्यांच्या सांध्यात वेदना होतात. हे औषध मिळालं नाही तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























