कोरोना व्हायरस : राज्यावर आर्थिक संकट, 35 हजार कोटींचा फटका - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या महत्त्चाच्या बातम्या अशा आहेत.
1. राज्यावर आर्थिक संकट, 35 हजार कोटींचा फटका
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च 2019 च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास 25 हजार कोटींचा फटका बसला. आर्थिक वर्षांचा विचार करता 2019-20 मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे 35 हजार कोटींचा फटका बसला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
मार्च 2019 मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे 42 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.
यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाड्यांवरील महसूल आटला आणि मार्च 2020 मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे 17 हजार कोटी रुपये मिळाले.
म्हणजेच सुमारे 25 हजार कोटींचा फटका एकट्या मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
2. '40 कोटी भारतीय कोरोनामुळे दारिद्र्याच्या गर्तेत ढकलले जाणार'
भारतात सुमारे 90 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचा फार गंभीर परिणाम त्यांच्यावर होणार आहे. त्यामुळे सुमारे ४० कोटी भारतीय दारिद्र्याच्या गर्तेत अधिकच खोल जाणार असल्याचं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाझेशनने म्हटलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
जगात 19 कोटी 50 लाख पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याचीही भीतीही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाझेशनने व्यक्त केली आहे. भारत, ब्राझील आणि नायजेरियामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कोव्हिड -19 चा सर्वाधिक फटका बसला आहे.
3. पोलिसांच्या हातात अजूनही पगार नाहीत
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार त्यांच्या पगारात 20 ते 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांचे पगार टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. यामुळे पोलिसांचे पगार लांबले आहेत. मार्च महिन्याचा पगार आता 20 एप्रिलपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी सकाळने दिली आहे.
कोरोनोविरोधाच्या लढाईत आरोग्य आणि पोलिस कर्मचारी फ्रंटलाईनवर लढत असल्याने त्यांच्या पगारात कपात करू नये अशी विनंती कर्मचारी संघटना, तसंच सामाजिक संस्थांना केली होती, पण सरकारने सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

4. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा औषधाचा तुटवडा
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अजूनही कोणत्याच अधिकृत औषधाचा शोध लागला नाही. मात्र भारताकडे मोठ्या प्रमाणात साठा असणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा मोठा पुरवठादार आहे. मात्र सध्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा तुडवडा मेडिकल स्टोअर्समध्ये जाणवत आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताकडे या औषधाची मागणी ही केली आहे. भारताकडे सध्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा साठा मुबलक असल्याचं म्हटलं जातं असं असलं तरी सध्या मेडिकल स्टोअरमध्ये या औषधाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
5. महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही : आरोग्य मंत्री
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जगाच्या तुलनेने भारतात रूग्णसंख्या वाढीचा आलेख हा कमी आहे. ही एक समाधानाची बाब असून, महिनाभरामध्ये प्रगत अमेरिकेचा विचार केल्यास तेथे एक लाख 21 हजार रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र अजून करोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. "राज्यपालांनी समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे," असं राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. शरद पवारांनीही आपल्या भूमिकेचं समर्थन केल्याचं त्यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























